

तंटामुक्त समितीमुळे उचगावमध्ये सौहार्द
लीड.....
स्व. आर. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या तंटामुक्त समित्यांनी गावपातळीवरील वाद सामोपचाराने मिटवून सामाजिक सलोखा जपण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. उचगाव (ता. करवीर) येथील तंटामुक्त समिती २००७ पासून कार्यरत असून, गावातील अनेक तंटे न्यायालय, पोलिस ठाण्यापर्यंत न जाता गावातच मिटविले आहेत. त्यामुळे गावात सामाजिक सौहार्दाचे वातावरण असून, ग्रामस्थांच्या सहभागातून समिती प्रभावीपणे काम करीत आहे.
.................
गावातील वाद गावातच मिटवावेत, जेवढे वाद सामोपचाराने मिटतील तेवढे गावपातळीवर मिटवून जो न्यायालयीन खर्च होतो व व्यक्तिद्वेष, वादविवाद विनाकारण होऊन द्वेश, मत्सर निर्माण होतो तो होऊ नये यासाठी १५ ऑगस्ट २००७ पासून तत्कालीन ग्रामविकास मंत्री स्व. आर. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रात तंटामुक्त समित्या स्थापन करण्यात आल्या. राज्यात गावपातळीवर तंटामुक्त समिती स्थापन केल्यामुळे गावातील वादविवाद गावातच मिटवून गाव सुखी, समाधानी, शांततेत राहण्यासाठी तंटामुक्त समितीचे कार्य फार मोलाचे ठरत आहे.
शासनाच्या आदेशाप्रमाणे १५ ऑगस्ट २००७ रोजी उचगाव (ता. करवीर) ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत पहिली तंटामुक्त समिती स्थापन केली. तंटामुक्त समितीचे पहिले अध्यक्ष दिनकर शंकर पोवार यांची एकमताने निवड केली. त्यांच्या कार्यकाळात अनेक तंटे दिवाणी असोत वा अन्य पोलिस ठाण्याकडे न जाता गावपातळीवर मिटवले आहेत. तसेच त्यावेळी उचगाव तंटामुक्त समितीला शासनाचा पुरस्कारही मिळालेला आहे. त्या पुरस्कारातून गावामध्ये काही विकासकामे केली आहेत. त्यानंतर तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी राजेंद्र चौगुले, उमेश पाटील, संजय निगडे व सध्या दत्तात्रय यादव हे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष म्हणून, तर सचिव म्हणून पोलिसपाटील स्वप्नील साठे काम पाहत आहेत. दर महिन्याला ग्रामपंचायतीच्या सभागृहात याबाबत सभा बोलावली जाते व गावातील किरकोळ तंटे सामोपचाराने मिटविले जातात.
सद्यःस्थितीत तंटामुक्त समित्यांना शासनाकडून कोणतेही सहकार्य मिळत नाही तसेच त्यासाठी असणारे पुरस्कारही दिले जात नाहीत; परंतु अजूनही काही ठिकाणी तंटामुक्त समित्या कार्यरत आहेत हे विशेष! सुरुवातीला तंटामुक्त समितीच्या सभेसाठी तलाठी, ग्रामविकास अधिकारी यांना उपस्थित असणे अनिवार्य होते; परंतु सध्या तशी परिस्थिती नाही. शासनाचे कोणतेही आदेश नसल्याने ग्रामपंचायत प्रशासनातील कोणीही अधिकारी जबाबदारीने तंटामुक्त समितीमध्ये सहभागी होत नाहीत. असे असूनही अनेक ठिकाणी तंटामुक्त समित्या कार्यरत आहेत.
उचगावमधील तंटामुक्त समिती अजूनही पूर्णक्षमतेने काम करीत असून, अनेक जण त्यामध्ये हिरीरीने सहभाग घेऊन गावातील तंटे मिटविण्यासाठी पुढाकार घेतात. त्यामध्ये सरपंच, उपसरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, आजी-माजी ग्रामपंचायत पदाधिकारी गावातील ज्येष्ठ मंडळी यांचा सहभाग असल्याने या समितीला एक चांगले महत्त्व आले आहे.
....
कोट...
तंटामुक्त समितीमध्ये गावातील सर्व पक्षांच्या प्रमुख लोकांचा समावेश आहे, हे या समितीचे वैशिष्ट्य आहे. शासनाने समितीला कायदेशीर अधिकार, अनुदान दिल्यास समित्या पुन्हा सक्षमपणे सुरू राहतील. गावात १५ ऑगस्ट २००७ पासून तंटामुक्त समिती कार्यरत असून, समितीची मासिक बैठक दर महिन्याला होते. त्यामध्ये छोटे-मोठे घरगुती वाद, जमीन विषयक व अन्य वादविवाद सामोपचाराने मिटवितो. जमीनविषय वाद असेल तर प्रत्यक्ष जागेवर जाऊन मिटविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात आम्हाला ९९ टक्के यश मिळते. त्यामुळे गावातील वादविवाद, तंटे पोलिस ठाणे व शासन दरबारी प्रलंबित न राहता सामोपचाराने मिटवलेले आहेत. यासाठी पोलिसपाटील, सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य व तंटामुक्त समितीचे सहकार्य लाभते.
दत्तात्रय यादव, अध्यक्ष, तंटामुक्ती समिती, उचगाव
* तंटामुक्त समितीचे फायदे
गावातील वाद गावातच सामोपचाराने मिटतात.
न्यायालयीन खर्च व वेळेची बचत होते.
व्यक्तिगत द्वेष, मत्सर व तणाव कमी होतो.
गावात शांतता व सामाजिक सलोखा टिकून राहतो.
पोलिस ठाणे व न्यायालयांवरील ताण कमी होतो.
ग्रामस्थांमध्ये संवाद व समन्वय वाढतो.
सर्वपक्षीय सहभागामुळे निर्णयांवर विश्वास निर्माण होतो.
गावाच्या विकासासाठी सकारात्मक वातावरण तयार होते.
००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००
आफ्रिद अत्तार
एका हाताने दिव्यांग;
तरीही जलतरणात ‘शिवछत्रपती’चा मान
लीड....
उचगाव (ता. करवीर) येथील आफ्रिद मुख्तार अत्तार याने एका हाताने दिव्यांग असतानाही जलतरणात राज्य व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विविध पॅरालिंपिक स्पर्धांमध्ये सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके पटकावत त्याने महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळविला. कठोर मेहनत, जिद्द आणि पालकांच्या पाठबळामुळे आफ्रिदने उचगावच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
..........
उचगाव (ता. करवीर) येथील आफ्रिद मुख्तार अत्तार हा जलतरणपटू एका हाताने दिव्यांग असूनही चमकदार कामगिरी करून राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवर अनेक स्पर्धांतून विजेता ठरला आहे. त्याची जलतरणातील गुणवत्ता पाहून महाराष्ट्र शासनाने त्याला ‘शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार’ देऊन सन्मानित केल्याने उचगावच्या शिरपेचात त्याने मानाचा तुरा खोवला आहे. उचगाव आणि परिसरात शिवछत्रपती पुरस्कार मिळविणारा तो एकमेव जलतरणपटू आहे
अत्तार कुटुंबीय मूळचे निपाणीचे; परंतु सध्या ते उचगावमध्ये स्थायिक झाले आहे. छोट्याशा भाड्याच्या दुकानात बांगड्या विक्रीचा व्यवसाय करतात. मुलगा आफ्रिदमधील जलतरणमध्ये असणारी कौशल्ये पाहून विविध ठिकाणी स्पर्धेला पाठवून जलतरणात करिअर करण्यासाठी प्रोत्साहित केले. आफ्रिद लहानपणापासूनच प्रत्येक खेळांत आवडीने भाग घ्यायचा. एका हाताने दिव्यांग असला तरी, त्याचे ध्येय उत्तम होते. एका हाताने सायकल चालविण्याचे कसब तर त्याच्याकडे वाखाणण्याजोगे आहे. शाळेला तो सायकलीवरून जात असे. तो सरनोबतवाडी येथील राजाराम तलावात पोहायला शिकला. अवघ्या बारा मिनिटांत तो राजाराम तलाव आरपार करायचा. एक हात नसतानाही त्याला पोहताना पाहून सर्वजण आश्चर्य व्यक्त करायचे. त्यातून त्याला जलतरणात तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्याचा विचार आला.
कोल्हापुरातील राजर्षी शाहू जलतरण तलावात प्रशिक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तो जलतरणातील धडे घेऊ लागला. त्यातून तो एक उत्कृष्ट जलतरणपटू बनला. त्याचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण कोल्हापुरात जय भारत हायस्कूलमध्ये, तर महाविद्यालयीन शिक्षण शाहू कॉलेजमध्ये झाले.
त्याने औरंगाबाद येथे झालेल्या पॅरालिंपिक स्पर्धेत बटरफ्लाय, बॅकस्ट्रो, बेस्ट स्ट्रोक, फ्री स्टाइल अशा चारही प्रकारांत सुवर्णपदक मिळवले आहे तसेच बेळगाव येथे झालेल्या पॅरालिंपिक स्पर्धेत दोन रौप्य, दोन कांस्य पदके मिळवली आहेत. त्याने दिल्ली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय पॅरालिंपिक स्पर्धेतही भाग घेतला आहे. वडील मुख्तार, आई रेहाना आपल्या छोट्याशा व्यवसायातून पदरमोड करून त्याच्या शिक्षण व खेळासाठी सातत्याने मदत करत आहेत.
आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याचे त्याचे ध्येय असून, आशियाई जलतरण स्पर्धेसाठी अखंड मेहनत घेत आहे. सध्या तो कोल्हापुरात रमण मळा येथील पोस्ट कार्यालयात कार्यरत आहे.
आई
००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००
गणेश महाडिक
गणेशच्या यशाला
आईच्या कष्टाची किनार
लीड....
उचगाव (ता. करवीर) येथील गणेश महाडिक यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवून उपजिल्हाधिकारीपद गाठले. वडिलांच्या निधनानंतर आई लता महाडिक यांनी कष्टाने मुलांचे शिक्षण पूर्ण केले. अपयशाने न खचता सातत्यपूर्ण अभ्यास, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर गणेश यांनी २०१५ मध्ये राज्यसेवा परीक्षेत यश मिळवत प्रेरणादायी प्रवास घडविला.
........................
उचगाव येथील मंगेश्वर कॉलनी परिसरात राहणारे गणेश महाडिक यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या राज्यसेवा परीक्षेतून २०१५ मध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाली. त्यांनी अत्यंत खडतर परिस्थितीतून मिळविलेले यश निश्चितच प्रेरणादायी आहे. यामागे त्यांच्या आईचे कष्ट वाखाणण्याजोगे आहे तसेच त्यांनी आपल्या जिद्द, धडाडी व कष्टाच्या जोरावर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून गरुडझेप घेतली आहे, त्याचा सार्थ अभिमान उचगावकरांना आहे. सध्या ते जालना येथे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
गणेश महाडिक उचगाव येथे मंगेश्वर कॉलनीत पोलिसपाटील गल्लीत राहतात. त्यांचे वडील भिकाजी महाडिक एमएसईबीमध्ये वायरमन म्हणून नोकरीत असताना विजेचा धक्का बसून मरण पावले. त्यानंतर आई लता महाडिक यांनी एक मुलगी आणि दोन मुलांचा सांभाळ करीत चार घरची धुणीभांडी, शिवणकाम करून मुलांच्या शिक्षणात कोणतीही कमतरता ठेवली नाही. पतीच्या निधनाचा धक्का त्यांनी पचविला आणि मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी धडपड केली. त्याचेच फळ म्हणून मुलगा गणेश यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून गरुड झेप घेतली.
वडिलांच्या जागी गणेश यांचा लहान भाऊ महेश नोकरीला लागला. मात्र, दुर्दैवाने वयाच्या २८ व्या वर्षी वडिलांप्रमाणेच त्याचाही विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ही दोन्ही संकटे झेलत मोठ्या धैर्याने न डगमगता आपल्या मुलांसाठी आईने भरपूर कष्ट घेतले. गणेश यांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण; परंतु वडिलांच्या नोकरीच्या निमित्ताने ते उचगावमध्येच स्थायिक झाले. गणेश यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण कोल्हापुरात शा. कृ. पंत वालावलकर हायस्कूलमध्ये झाले. दहावीला ७५ टक्के आणि बारावीला ८५ टक्के गुण मिळवून ते उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांनी कोल्हापुरात डी. वाय. पाटील कॉलेजमधून प्रॉडक्शन इंजिनिअरिंगची पदवी घेतली. कॉलेज जीवनात फायटर्स स्पोर्टस् क्लबकडून क्रिकेट खेळही चांगला खेळत होते. तसेच दर रविवारी जोतिबा डोंगरावर चालत जाण्याचा छंद जोपासला होता.
इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून उच्च अधिकारी व्हायचे, या ध्येयाने त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले. त्यासाठी त्यांनी अभ्यास सुरू केला. त्यांनी प्री आयएएस ट्रेनिंग सेंटरमध्ये तीन वर्षे झपाटून अभ्यास केला. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दोनवेळा मुलाखत दिली. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही; परंतु अपयशाने खचून न जाता पुन्हा दररोज सात ते आठ तास नियमित अभ्यास, अवांतर वाचनावर भर देत राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेत दुसऱ्या प्रयत्नांत उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाली. सध्या ते जालना येथे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००
शांतिनगर ः फासेपारधी समाजाच्या एकतेतून फुललेले नंदनवन
लीड....
उचगाव (ता. करवीर) येथील शांतिनगर परिसर हा स्वच्छता, शिस्त, सामाजिक एकोपा आणि पर्यावरण संवर्धनाचा आदर्श नमुना ठरला आहे. फासेपारधी समाजाच्या या वसाहतीत हिरवाई, स्वच्छता, सुंदर घरे आणि सामाजिक सलोखा अनुभवायला मिळतो. माजी सरपंच गणेश काळे यांच्या नेतृत्वातून परिसराचे नंदनवन झाले असून, मद्यपानमुक्त वातावरण व सामंजस्यपूर्ण जीवनशैलीमुळे शांतिनगरने वेगळी ओळख निर्माण केली आहे.
..............................
प्रत्येक घराच्या दारात चार ते पाच फुला-फळांची झाडे, एकसारखी घरे, प्रत्येक घरामध्ये थोडेसे अंतर, एका धाटणीची एका ओळीत असणारी सर्व घरे,
सर्वत्र हिरवाईने दाटलेला परिसर, प्रशस्त मैदान, देखणे मंदिर, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी वेगळा हॉल, गेस्ट हाऊस. एका कॉलनीतच असे तुम्हाला पाहायला मिळेल, हे अन्य कुठे नसून उचगावमध्येच आहे. फासेपारधी समाजातील लोक राहात असलेल्या या परिसराचे नाव आहे शांतिनगर.
शांतिनगरमध्ये फासेपारधी समाजाची ११० घरे असून, १३०० लोकसंख्या आहे. या समाजाचे प्रमुख आहेत उचगावचे माजी सरपंच गणेश बाबू काळे. ही वसाहत कोणत्याही उच्चभ्रू लोकांची नसून, कष्ट करणाऱ्या फासेपारधी समाजाची आदर्श लोकवस्ती. राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या दरबारात असणाऱ्या फासेपारधी समाजातील लोकांना ही जागा मोफत दिली आहे. राजर्षी शाहू महाराज, राजाराम महाराज यांच्यासोबत शिकारीसाठी असणारे तगडे, चपळ आणि विश्वासू लोक फासेपारधी समाजातील असत. आज या समाजाची सर्वांगाने सुधारणा झाली असून, अनेक जण शासकीय नोकरीत उच्च पदांवर कार्यरत आहेत.
मनमोहक, स्वच्छ शांतिनगर
शांतिनगर परिसरात फेरफटका मारल्यास तेथील स्वच्छता पाहण्यासारखी आहे. कुठेही कचरा दिसणार नाही की, कुठेही कोंडाळा दिसणार नाही.
स्वच्छता काय असते हे शांतिनगरमध्ये येऊनच पाहायला हवे. कित्येक वर्षांपासून या समाजाचे नेतृत्व गणेश काळे करत आहेत. समाजाला एकसंध ठेवून समाजाच्या विकासासाठी व परिसराच्या सुशोभीकरणासाठी त्यांनी ग्रामपंचायत निधी, स्वनिधी व काही देणगीदारांच्या देणगीतून या ठिकाणी विविध विकासकामे करून या भागाचे नंदनवन केले आहे. शांतिनगर परिसरात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने माजी मंत्री शिवाजीराव मोघे आले असता, त्यांनी हा परिसर पाहून त्या ठिकाणी एक दिवस राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. असा हा मनाला मोहवून सोडणारा मनमोहक परिसर पाहून कुणाच्याही मनामध्ये उत्साह संचारतो.
परिसराचे श्रद्धास्थान दुर्गामाता
शांतिनगर व परिसराचे श्रद्धास्थान म्हणून दुर्गामाता मंदिराकडे पाहिले जाते. या मंदिराचे सुशोभीकरण व भव्य देखणे मंदिर या ठिकाणी आहे. शांतिनगरमधील सर्व फासेपारधी समाज दरवर्षी दुर्गामाता यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करतो. या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे यात्रा पूर्ण शाकाहारी असते तसेच कोणतेही मद्यपान या ठिकाणी केले जात नाही. सर्वात मोठा महाप्रसाद या ठिकाणी घातला जातो. दोन ते तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम साजरे केले जातात.
सरपंचपदाचा तीनदा मान
गणेश काळे यांची दूरदृष्टी व सौंदर्यदृष्टी प्रत्यय या ठिकाणी येतो. त्यांच्या शब्दाला येथे फार मोठी किंमत आहे. उचगावच्या पहिल्या लोकनियुक्त सरपंच बनण्याचा मान गणेश काळे यांच्या पत्नी मालुताई काळे यांना मिळाला. लोकनियुक्त सरपंच होण्याअगोदर त्यांनी एक वर्ष सरपंचपद भूषविले होते. त्यांच्या सरपंचपदाच्या काळात गावामध्ये त्यांनी अनेक सोयीसुविधा तसेच कचरा, पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
शांतिनगर परिसरातील फासेपारधी समाजातील तिघांना तीनवेळा उचगावच्या सरपंचपदाचा मान मिळाला आहे. सुरुवातीला लैला अण्णाप्पा चव्हाण काही काळ सरपंच होत्या. त्यानंतर गणेश बाबू काळे सरपंच झाले व लोकनियुक्त सरपंच म्हणून मालुताई काळे निवडून आल्या.
मद्यपान केल्यास स्वच्छतेची शिक्षा
शांतिनगरमध्ये चुकून कोणीतरी मद्यपान करून आलाच तर त्याला सर्वांसमक्ष बोलावून घेऊन योग्य ती समज देण्यात येते, तसेच दुसऱ्या दिवशी संपूर्ण परिसर स्वच्छ करण्याची शिक्षा दिली जाते. त्यामुळे एकही तरुण किंवा ज्येष्ठ मद्यपान करून घरी येत नाही. त्यामुळे घरगुती वादविवाद, पती-पत्नीमधील भांडण या ठिकाणी पाहायला मिळत नाहीत, हे या परिसराचे वैशिष्ट्य आहे. काही किरकोळ वाद झाल्यास गणेश काळे यांच्यासमोर तडजोडीने व त्यांच्या शब्दावर अनेक वाद या ठिकाणी मिटवले जातात.
एखाद्या परिसराचे नंदनवन झाले असे म्हटले जाते, पण नंदनवन म्हणजे काय, याची अनुभूती प्रत्यक्षात शांतिनगरमध्ये आल्यानंतरच मिळते. त्यामुळे शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, समाजसेवक, वृक्षप्रेमी, पर्यावरणप्रेमींनी या भागात एकदा फेरफटका मारून शांतिनगरचा अभ्यास करावा व नव प्रेरणा घ्यावी.
कोट.......
करवीर तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणूनच उचगावकडे पाहिले जाते. उचगाव ग्रामपंचायतीत काम करण्यास फार आनंद मिळतो. कारण येथील सरपंच, उपसरपंच, सदस्य विकासात्मक कामासाठी एकत्र येऊन सकारात्मक दृष्टिकोन रुजविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तसेच गावातील विकासकामांसंदर्भात एकजुटीने, एकमताने प्रश्न सोडविण्यासाठी धडपडत असतात. प्रशासन पातळीवर सर्व कर्मचारी, ग्रामपंचायतीमधील सर्व कर्मचाऱ्यांचे नेहमीच सहकार्य लाभते. गावच्या विकासात मोलाची कामगिरी बजावण्यात खारीचा वाटा मिळाल्याचा आनंद आहे.
- आर. एन. गाढवे,
ग्रामपंचायत अधिकारी, उचगाव
............
कोट....
उचगावचा उपसरपंच होण्याचा मिळालेला मान मला आत्मिक आनंद देणारा आहे. मी ज्या प्रभागातून निवडून येतो, तो शांतिनगर पूर्व भाग ९ नंबर परिसराचे मी गेली दहा वर्षे प्रतिनिधित्व करत आहे. अनेक विकासात्मक बाबी मी ग्रामपंचायत सभेत मांडून माझ्या परिसरासाठी व गावासाठी नेहमीच कार्यरत राहीन.
- संदीप पाटलोबा पाटील
उपसरपंच, उचगाव
०००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००
अखंड हरिनाम सप्ताहाची
सव्वाशे वर्षांची परंपरा
लीड....
उचगाव (ता. करवीर) येथील प्राचीन विठ्ठल मंदिरात १९०१ पासून अखंड हरिनामाची परंपरा सुरू आहे. हरिपाठ, कीर्तन, भजन व धार्मिक कार्यक्रमांमुळे मंदिर आध्यात्मिक केंद्र बनले आहे. उचगाव ते पंढरपूर पायी दिंडीची २५ वर्षांची परंपराही आजही भक्तिभावाने जपली जात आहे.
.......
उचगाव (ता. करवीर) येथील विठ्ठल मंदिर हे एक महत्त्वाचे आध्यात्मिक केंद्र असून, मंदिर फार जुने आहे. येथे विठ्ठल, हनुमान व गणेश अशा तीन देवतांच्या मूर्ती प्रतिष्ठापित केल्या आहेत. तीन देवता एकत्र असलेले हे वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे. मंदिरात नेहमी ‘राम कृष्ण हरी’चा जप तसेच विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतात.
प्रत्येक शनिवारी येथे हरिपाठाचे वाचन केले जाते. येथे अखंड हरिनामाची सुरुवात १९०१ मध्ये चैत्र कृष्ण ५ पासून झाली. याची सुरुवात उचगावचे प्रतिष्ठित नागरिक लिंगोजी पंत बाळाजी कुलकर्णी यांनी केली. आजतागायत रामचंद्र घोरपडे काका, पांडुरंग भोसले, हनुमंतराव सुतार, ह.भ.प. रंगराव वाळवेकर, बंडा भोसले, बाबूराव यादव, बाबू भोसले, बाळू पाटील, सदाशिव महाकवे, शिवाजी पाटील, दत्तात्रय यादव, विठ्ठल कदम, विठ्ठल सुतार, अनंत लाड, शंकर जंगम, यशवंत मोरे, पै. विष्णू भोसले, मारुती कदम, राजाराम जाखले आदींनी पुढाकार घेऊन ज्ञानेश्वरी वाचन, हरिपाठ, कीर्तन व भजनाची परंपरा अखंडपणे सुरू ठेवली आहे. उचगाव ते पंढरपूर पायी दिंडीला २५ वर्षे पूर्ण झाली असून, दिंडीचे आयोजन दिंडीप्रमुख रघुनाथ ऊर्फ बाळू वाईंगडे करतात.
०००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००
‘सहकारातील दीपस्तंभ’
उचगावची शिव गणेश पतसंस्था
लीड.....
उचगाव (ता. करवीर) येथील शिव गणेश ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था रौप्य महोत्सवाकडे वाटचाल करत असून, सहकार क्षेत्रात आदर्श ठरत आहे. ऑडिट वर्ग ‘अ’, कोट्यवधींच्या ठेवी आणि कर्जवाटपासह संस्था सामान्य कामगार, लघुउद्योजकांना आर्थिक उभारी देण्याचे काम सातत्याने करत आहे.
.....
रौप्य महोत्सवाकडे वाटचाल करणारी उचगाव (ता. करवीर) येथील शिव गणेश ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था सहकारातील अग्रगण्य म्हणून समोर येत आहे. सहकार खात्याचे नियम पाळत अनेक पतसंस्थांसाठी ही पतसंस्था दीपस्तंभ ठरत आहे. उचगाव-शांतिनगर परिसरात अशोक आनंदा तुपे यांनी माजी आमदार संपतबापू पवार यांच्या प्रेरणेतून १२ जुलै १९९६ रोजी संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. उचगाव परिसरातील गडमुडशिंगी, वसगडे, सांगवडे, सांगवडेवाडी, नेर्ली, तामगाव, उजळाईवाडी परिसरात संस्थेचे कार्यक्षेत्र आहे
संस्थेचे भाग भांडवल ९४ लाखांवर आहे. संस्थेत विविध प्रकारच्या ठेव योजना असून, एकूण ठेवी ५ कोटी २० लाखांच्या पुढे आहेत. एकूण कर्ज ३ कोटी ८५ लाखांवर दिलेले आहे. संस्थेची सभासद संख्या ९४५ आहे. संस्थेच्या स्थापनेपासून सतत ऑडिट वर्ग ‘अ’ आहे. उचगाव पूर्व भागात संस्थेची भव्य तीन मजली इमारत आहे
प्रामाणिक संचालक आणि विश्वासू सभासद लाभलेलल्या करवीर तालुक्यातील शिव गणेश ग्रामीण बिगर शेती नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून आम्ही सामान्य कामगार, लघुउद्योजक यांना कर्जपुरवठा करून त्यांना उभारी देण्यासाठी गेली अनेक वर्षे प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहोत. पतसंस्था सतत ऑडिट वर्ग ‘अ’ मध्ये असून, नेहमीच नफ्यामध्ये आहे. संस्थेची स्वतःची अद्ययावत इमारत असून, संस्थेच्या माध्यमातून ग्राहकांना विविध सेवासुविधा दिल्या जातात.
* दृष्टिक्षेपात संचालक मंडळ
संस्थापक-अध्यक्ष ः अशोक आनंदा तुपे
उपाध्यक्ष ः भाऊसाहेब शंकर खडके
संचालक ः सुनील रामचंद्र गायकवाड
भागोजी बाळू शिंत्रे
सागर साहेबराव चव्हाण
शीतल राहुल तुपे
अमोल रमेश पारकर
शोभा कुमार माळी
कमल नारायण चव्हाण
परशुराम भिकाजी हज्जे
सोमनाथ बाबू कोळेकर
व्यवस्थापक ः वैष्णवी प्रशांत परीट
वसुली अधिकारी ः दिलीप एस. पाटील
०००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००
भक्ती, संस्कार अन् समाजप्रबोधनाचा संगम
उचगावातील मंडळांकडून समाजजागृतीचा संदेश
लीड....
उचगावातील विविध भक्त मंडळे व भजनी मंडळांच्या माध्यमातून धार्मिक उत्सवांसह समाजप्रबोधनाचे कार्यक्रम राबविले जात आहेत. व्यसनमुक्ती, सामाजिक सलोखा, देशभक्ती व संस्कारांची जपणूक करत तरुणाईला सकारात्मक दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या मंडळांकडून केले जात आहे.
- अजित माने
....................
उचगाव (ता. करवीर) येथे गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामदैवत मंगेश्वराच्या आशीर्वादाने त्रिमूर्ती दत्तभक्त मंडळ, हुंकार कॉलनी हनुमान मित्र मंडळ, महादेव मंदिर, मोळे कॉलनी, साई मंदिर, साईनाथ कॉलनी, विठ्ठलाई मंदिर, विठ्ठलाई कॉलनी, श्री गणेश मंदिर, गणेश कॉलनी, त्रिमूर्ती भक्त भजनी मंडळ, ओम साई भक्त भजनी मंडळ, हरी ओम मिलिटरी भजनी मंडळ, श्री संत बाळूमामा भजनी मंडळ, साईनाथ कॉलनी महिला भजनी मंडळ, हरिपाठ करणाऱ्या सर्व महिला भक्त सभासद छत्रपती शिवाजीनगरमध्ये समाजप्रबोधनाचा नवा आदर्श घालून देत आहेत.
हनुमान जयंती नुकतीच सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजीनगरमधील हुंकार भक्त मंडळाच्या वतीनेही हनुमान जयंती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. हनुमान जयंतीच्या मुख्य दिवशी श्रींच्या मूर्तीस अभिषेक, श्रींचा जन्मोत्सव सोहळा, दुपारी महाप्रसाद, सकाळी-सायंकाळी भजन असे भरगच्च कार्यक्रम झाल्यानंतर तीन एप्रिलला विराट हिंदू संमेलन व समाजप्रबोधनात्मक भारुडाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
छत्रपती शिवाजीनगर, मणेर मळा येथे विविध जयंती, पुण्यतिथी, जन्मोत्सव मोठ्या उत्साहात अत्यंत शिस्तबद्ध व धार्मिक वातावरणात पार पडले जातात. हुंकार भक्त मंडळाच्या वतीने हनुमान जयंती साजरी केली जाते. यामध्ये सर्व कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी, सण साजरे करताना समाजप्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करून समाजाला एक नवी दिशा देण्यासाठी एकमेकांप्रती असणारा राग, द्वेष, मत्सर कसा दूर होईल, नात्यांमधील दुरावा कमी होऊन गोडवा कसा वाढेल, तरुण पिढीला व्यसनांपासून दूर कसे ठेवता येईल, शिक्षणाचे महत्त्व, महिलांवर होणारे अत्याचार, भांडणतंटे, हिंसाचार, तरुणाईच्या मनामध्ये इतरांप्रती आदर, देशभक्ती रुजवायची असेल तर समाजप्रबोधनाचे कार्यक्रम घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यातून समाजाला एक नवी दिशा देण्याचे काम हे समाजप्रबोधनपर कार्यक्रम करत असतात.
गावातील सर्व मंडळे दत्त जयंती, गणेश जयंती, रामनवमी, हनुमान जयंती, महाशिवरात्र असो वा सणासुदीच्या वेळी विविध सांस्कृतिक समाजप्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करून समाजप्रबोधनाबरोबरच मनोरंजनाचे व्यासपीठ निर्माण करून समाजात एक आदर्श निर्माण करत आहेत. ही सर्व मंदिरे, कार्यकर्ते, सेवेकरी यांच्या माध्यमातून होणारी समाजाची ही सेवा खरोखरच कौतुकास्पद आहे. अशीच सेवा प्रत्येकाकडून घडो, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना!
चौकट...
भारुडातून मनोरंजनासह समाजप्रबोधन
हनुमान जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सादर केलेले भारुड हेसुद्धा एक समाजप्रबोधनाचे व्यासपीठ होते. त्यातून कार्यक्रमासाठी जमलेल्या बहुसंख्य माता-भगिनींचे मनोरंजन तर झालेच, शिवाय भारुडकर्त्यांनी व्यसनमुक्ती, भांडणतंटा याचबरोबर अनेक गोष्टींचे समाजप्रबोधन केले. साउंड सिस्टीमच्या तालावर, नशेच्या जोरावर अमाप पैसा खर्च करून थिरकणाऱ्या तरुणाईने हुंकार भक्त मंडळाच्या कार्यक्रमांतून आदर्श घेऊन आगामी प्रत्येक उत्सवामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून समाजप्रबोधन, देशभक्ती, राष्ट्रभक्ती रुजवणाऱ्या समाजात बदल घडडिणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करावे.
०००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००
उचगावची मंगेश्वर यात्रा
भक्ती, परंपरा अन् एकतेचा संगम
लीड....
उचगाव हे धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक परंपरा जपणारे गाव म्हणून ओळखले जाते. ग्रामदैवत मंगेश्वराच्या भव्य मंदिराभोवती गावाची श्रद्धा केंद्रित असून, तीन वर्षांनी होणारी जळयात्रा ग्रामएकतेचा उत्सव ठरते. श्रमदानातून उभारलेले मंदिर, पालखी सोहळे, विविध धार्मिक कार्यक्रम आणि सर्वधर्मसमभावाची परंपरा यामुळे मंगेश्वर मंदिर ग्रामस्थांचे श्रद्धास्थान व ऊर्जास्थान बनले आहे.
कोल्हापूर शहरापासून पाच किलोमीटरवर शहरी संस्कृतीचा पगडा असलेले, पण ग्रामीण बाज टिकवून ठेवलेले सुंदर गाव म्हणजे उचगाव. येथे शेतकरी, कष्टकरी, कामगार वर्ग मोठ्या संख्येने राहतो. श्री मंगेश्वराच्या कृपेने सर्व सुखी समाधानी आहेत. अशा या मंगेश्वराची यात्रा जळ यात्रा तीन वर्षांनी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
उचगावला धार्मिकतेची मोठी परंपरा आहे. गावात व परिसरात अनेक मंदिरे आहेत. यामध्ये ब्रह्मनाथ, दौलूबाबा, रेणुका, मारुती, बिरदेव, साई अशी भव्यदिव्य मंदिरे आहेत. बिरदेव मंदिराची पूजा लांडगे परिवाराकडे आहे. उचगावचे अस्तित्व १८ व्या शतकाच्या सुरुवातीला दिसून येते. पंचगंगेच्या तीरावर जुन्या घरांच्या बनलेल्या वाड्यांवर हे छोटे गाव होते. यामध्ये निगडेवाडी, मन्नाडे मळा, यादववाडी, जाधववाडी, कदमवाडी, भोसलेवाडी, कुंभारवाडी या वाड्यांचा समावेश होता. याचा उल्लेख आणि कागदपत्रे शाहूकालीन ग्रंथांमध्ये व करवीर माहात्म्यातील काही उताऱ्यांमध्ये दिसून येते.
कथा मंगेश्वर गादीची
देव मंगोबा आपल्या धर्माच्या बापाची अमुक सिद्धाची सेवा करू लागला. त्याने सेवेत कशाचीही उणीव ठेवली नाही. ढोल व कैताळदेखील वडिलांच्या सेवेसाठी आणले. असा नित्यक्रम सुरू असताना सात गावांच्या लोकांनी मंगोबाला हरविण्यासाठी सात गावांच्या यात्रा एकाच दिवशी करण्याचा बेत आखला. या यात्रेसाठी मंगोबालाही आमंत्रण दिले; पण मंगोबाच्या वडिलांनी दोन गावचे भंडारे घेतले होते. मंगरायांनी ते मान्य न करता प्रत्येक गावाला येण्याचे वचन दिले. अंगावर कांबळा, भंडाऱ्याचा वाटवा घेऊन चालू लागला. ते प्रथम हरिपूरनंतर आलेजोगळ तेथून मिरजेच्या मीरासाहेबांच्या दर्ग्यात व शेवटी सदलगा, बोरगावला मंगोबांनी सात कड्या कुलपांच्या आतून इशारा देत आपला मान आपल्या हातात घेतला. तेव्हा मंगरायाला मारण्याचा राक्षसांनी कट केला, पण तो त्यांच्यावर उलटवला व ते राक्षस अंकलीच्या रानात मृत्यू पावले. मंगरायाने आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले तेव्हा सिद्ध मंगोबा आपले भक्त शोधण्यासाठी फिरत प्रथम तेरवाडला गेले. तेथे त्यांनी गादी स्थापन केली. नंतर ते कोथळी, चिपरी, सांगलवाडी, मंगरायाचीवाडी, घुणकी, दुधगाव, कसबा बावडा अशा अनेक गावांत गाद्या स्थापन केल्या. शेवटी ते कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर क्षेत्रातील पंचगंगेच्या तीरावर वसलेल्या सुजलाम् सुफलाम् अशा उचगावनगरीत आले व तेथेच खडकावर त्यांनी गादी स्थापन केली, अशी आख्यायिका आहे.
श्रमदानातून साकारले भव्य मंगेश्वर मंदिर
मंगेश्वर म्हणजे साक्षात शंकराचा अवतार मानला जातो, तर काही ठिकाणी विष्णू अवतार म्हणून ओळखले जाते. या खडीच्या मंगोबाची नित्यनेमाने नारोबाबा व दौलूबाबा यांनी सेवा केली. त्यांनीच नंतर येथे मंदिर उभे केले. हे मंदिर समस्त उचगावकरांचे श्रद्धास्थान ठरले. मन्नाडे मळ्यालगत असणाऱ्या उंच भागावर मंगोबाचे छोटेखानी मंदिर होते. तेथे नित्यनेमाने पूजाअर्चा होत असे. उचगावमधील माळी समाजाकडेही सुरुवातीच्या काळात याची पूजाअर्चा होती. पंचगंगेला येणाऱ्या पुरामुळे अनेक दिवस या परिसरात पाणी साठून राहायचे. त्यामुळे पूजेला अडथळा निर्माण होत असे. त्यावेळी सिद्ध दौलूबाबा यांनी गावकऱ्यांच्या मदतीने उचगावच्या माळावर पूर्वीचे मंदिर उभारले. त्यानंतर १९९७-९८ च्या सुमारास सध्याचे हे भव्य दिव्य मंदिर धनगर समाज, गावातील सामाजिक कार्यकर्ते, देणगीदार, मानकरी, ग्रामस्थ यांच्या देणगीतून व श्रमदानातून साकारले आहे.
तीन वर्षांनी जळयात्रा
मंगेश्वराची त्रैवार्षिक यात्रा दर तीन वर्षांतून एकदा होते, त्याला जळयात्रा असेही म्हटले जाते. चैत्र महिन्यातील कामदा एकादशीला देव जळास जाण्याचा सोहळा होतो, तर दुसऱ्या दिवशी देवाला प्रसाद म्हणून पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. संपूर्ण गावातून हा नैवेद्य मंगेश्वरचरणी अर्पण केला जातो
नुकताच मंगेश्वर मंदिर परिसरात कामदा एकादशीच्या निमित्ताने मंगेश्वरांच्या सर्व कुळाचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला होता. तीन दिवस भव्यदिव्य कार्यक्रम मंगेश्वर मंदिरासमोर पार पडला, तसेच महाप्रसादही सलग तीन दिवस सुरू होता, त्याचाही लाभ अनेकांनी घेतला. पालखी सोहळा गावात प्रथमच झाला. त्याची उत्सुकता होती. अतिशय भव्य दिव्य कार्यक्रम झाला. याला स्वर्ग सोहळा म्हटले जाते. याचे आयोजन समस्त धनगर समाजाने व ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी, विविध मंडळांच्या सहकार्यातून मोठ्या उत्साहात साजरे केले. उचगावमध्ये प्रथमच यानिमित्ताने गावात योगी अमोघसिद्ध कसूर, श्री महासिद्ध गुरू गौरी सोमलिंग माय मकनापूर, श्री करनी मलकारसिद्ध लवंगा, श्री परमानंद माळी मल्लाप्पा, श्री हालसिद्ध श्री महासिद्ध, श्री रुद्र सिद्ध, श्री अमरसिद्ध तेरवाड, श्री मारुती उचगाव, श्री महासिद्ध अश्व चंदूरसह अनेक पालख्या आल्या होत्या. त्यांचे भव्यदिव्य स्वागत उचगावकरांनी केले तसेच मंदिरामध्ये सर्व पालख्यांचे विधिवत स्वागत करून ग्रामस्थांना दर्शनासाठी ठेवल्या होत्या. संपूर्ण गाव भंडाऱ्यात न्हाऊन निघाले होते.
यात्रेतून जपले जाते गावचे गावपण
यात्रा-जत्रा हा ग्रामीण संस्कृतीचा एक भाग आहे. शेती संस्कृतीतून यात्रा-जत्रा उदयास आली. यात्रेतून गावचे गावपण खऱ्या अर्थाने जपले जाते. गावच्या ग्रामदैवतांची मनोभावी पूजा करून सुखी समाधानी ठेवण्याची प्रार्थना या निमित्ताने केली जाते. यात्रेनिमित्ताने माहेरवाशिणी न चुकता यात्रेला येतात. यात्रेनिमित्त गावातील सर्वजण एकत्र येऊन नियोजन करतात. कोणताही गट-तट-पक्ष न पाहता सर्वच घटक मोठ्या मनाने एकत्र यात्रा शांततेत व चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करतात. यानिमित्ताने होणाऱ्या विविध स्पर्धांच्या माध्यमातून खेळाला प्रोत्साहन दिले जाते, तसेच मुलांमध्ये असणाऱ्या कलागुणांना वाव मिळतो. यात्रेत पालखी सोहळा तसेच विविध मानाचे कार्यक्रम, सर्व जातीधर्मांना विभागून दिलेले असतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने सर्वधर्मसमभाव या तत्त्वाची जपणूक यात्रेतून करण्यात येते. हीच बंधुभावाची प्रेरणा गावाला पुढे नेते.
मंगेश्वर मंदिर ग्रामस्थांचे ऊर्जास्थान
मंगेश्वर मंदिर गावच्या सौंदर्यात भर घालते. मंदिर परिसरात असणारी अनेक मंदिरे ग्रामस्थांची श्रद्धास्थाने आहेत. खऱ्या अर्थाने हा परिसर ऊर्जा देणारा आहे. मंदिराला महाराष्ट्र शासनाने ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा दिल्याने परिसरात अनेक विकासकामे झाली आहेत, तसेच भविष्यातही मंदिर परिसर सुशोभीकरण करण्यावर ग्रामस्थ व ग्रामपंचायतीचा भर आहे.
.......................................................
शिव शंभू जिजामाता केंद्रातून घडते
संस्कारांची नवी पिढी
लीड.....
उचगावमधील छत्रपती शिवाजीनगर येथे सुरू असलेल्या शिव शंभू जिजामाता संस्कार केंद्राने विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, देशभक्ती आणि संस्कृतीची जपणूक करण्याचे उल्लेखनीय कार्य केले आहे. योग, व्यायाम, श्लोक, युद्धकला, वाचन संस्कार, पथनाट्य आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून बालकांना सकारात्मक दिशा देत केंद्र नव्या पिढीला संस्कारित करण्याचे कार्य प्रभावीपणे करत आहे.
........................
गुणांचा गुणाकार आणि दोषांचा भागाकार करणे यालाच संस्कार म्हटले जाते आणि हीच उक्ती खऱ्या अर्थाने सार्थ ठरवली जाते ती उचगाव पैकी छत्रपती शिवाजीनगर म्हणजेच मणेर मळा येथे सुरू असणाऱ्या शिव शंभू जिजामाता संस्कार केंद्राच्या माध्यमातून. यावर्षी गुरू पौर्णिमेला या संस्कार केंद्राला दोन वर्षे पूर्ण होत आहे.
विद्यार्थी संख्या ७ वरून ५०
२१ जुलै २०२४ रोजी या संस्कार केंद्राची सुरुवात झाली. केवळ सात मुलांच्या सहभागातून सुरू झालेल्या या केंद्रातील विद्यार्थी संख्या आता ५० झाली आहे. संस्कार केंद्रात दर रविवारी सकाळी सात ते नऊ ३० मुली व २० मुले नित्यनेमाने येतात. राष्ट्र व विश्व कल्याणार्थ घेतल्या जाणाऱ्या प्रार्थनेबरोबरच सर्वांगसुंदर व्यायाम, सूर्यनमस्कार, भूमी नमस्कार, जोर, दंड बैठका, प्राणायाम, योगासने, ओंकार साधना, हिंदू धर्म संस्कृतीमधील विविध श्लोक, स्तोत्र, देशभक्तीपर व राष्ट्रभक्तीपर गीते, महापुरुषांच्या बोधकथा यासोबतच स्मरणशक्ती वाढीसाठी विविध सांघिक खेळ मुलांकडून घेतले जातात.
याशिवाय भारतीय शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण, लाठी-काठी शिबिर, पारंपरिक लेझीम खेळ, वक्तृत्व स्पर्धा, शिवचरित्र पारायण, उन्हाळी निवासी संस्कार शिबिर, सामाजिक प्रश्नांवर प्रबोधनात्मक पथनाटिका, आषाढी एकादशीनिमित्त पालखी दिंडी रिंगण सोहळा असे विविध उपक्रम राबविले जातात. मुलांना आपल्या संस्कृतीचे महत्त्व कळण्यासाठी प्रत्येक सण, उत्सवाचे महत्त्व विशद केले जाते.
बालसंस्कार वाचन मंदिर
याबरोबरच मुलांना मोबाईलपासून परावृत्त करण्यासाठी व त्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून बालसंस्कार वाचन मंदिरही या केंद्रामार्फत गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सुरू केले आहे. प्रथम वर्धापन दिनाच्या निमित्ताने मोफत बाल आरोग्य तपासणी शिबिरही भरविण्यात येणार असून, सध्या संदीप जंगम, आनंद घाटगे, सुनील माने, कमल पवार, अश्विनी ढेरे हे या केंद्राचे मुख्य शिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. शिवाय समाजातील प्रतिष्ठित नागरिकांचेही सहकार्य लाभत आहे.
मोफत ढोल-ताशा पथक
दातृत्वांच्या आर्थिक मदतीतून तसेच हे केंद्र चालविणाऱ्या आयोजकांकडून पदरमोड करून या संस्कार केंद्रामार्फत ४० बालकांसाठी मोफत ढोल-ताशा पथक तयार केले आहे. संस्कार केंद्राच्या वतीने ‘रणसंग्राम पावनखिंडीचा’ हे महानाट्य बसविले होते. यामध्ये संस्कार केंद्राच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी शिवजयंतीच्या निमित्ताने त्याचे सादरीकरण केले.
कोट.....
आगामी काळात मुला-मुलींचे बाल भजनी मंडळ, हरिपाठ मंडळ बनविण्यात येणार आहे. बालपणापासूनच शासकीय सेवेबाबत मुलांच्या मनात जिद्द निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून लवकरच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. संस्कार केंद्राच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांच्या, बौद्धिक व चिंतनीय वर्गांच्या माध्यमातून पाल्यांच्या बुद्धीमध्ये विवेक धारण करून देव, देश व धर्मकार्यासाठी चारित्र्यसंपन्न, तत्त्वनिष्ठ, शिस्तप्रिय, आदर्श अशी बलशाली सशक्त राष्ट्र निर्माणासाठी संस्कारक्षम युवा पिढी घडविण्याचा मानस आहे.
- संदीप जंगम,
मुख्य संकल्पक, शिव शंभू जिजामाता संस्कार केंद्र
०००००००००००००००००००००००००००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.