नवोदितांची मैदानाकडे पाठ धोकादायक

नवोदितांची मैदानाकडे पाठ धोकादायक
Published on

42607
गडहिंग्लज : युनायटेड फुटबॉल असोसिएशनमार्फत सुरेश कोळकी यांनी के. व्ही. सुजित यांचा सत्कार केला. सोबत बिपिनचंद्र, अजमल आदी. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)
--------------------------------
नवोदितांची मैदानाकडे पाठ धोकादायक

के. व्ही. सुजित : मंगळूर येनेपोया विद्यापीठ निवड चाचणी

सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १० : ‘लहान मुलांना मोबाईलमुळे मनोरंजन सहज उपलब्ध झाले आहे. पालकही मुलांना सतत मोबाईल देऊन जबाबदारी झटकत आहेत. परिणामी, मुलांमध्ये खेळांचे आकर्षण कमी झाल्याने मैदाने ओस पडू लागली आहेत. मात्र, नव्या पिढीसाठी ही गंभीर बाब आहे. त्यामुळे मैदानाकडे नवोदितांची पाठ धोकादायक आहे,’ असे मत मंगळूरच्या येनेपोया विद्यापीठाचे मुख्य क्रीडा संचालक के. व्ही. सुजित यांनी व्यक्त केले.
येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनमार्फत येनोपोया विद्यापीठासाठी येथील एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर निवड चाचणी झाली. १० ते २४ वर्षांखालील एकूण ७० फुटबॉलपटू सहभागी झाले होते. प्रशिक्षक दीपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविकात येनेपोया विद्यापीठाची फुटबॉल क्षेत्रातील भरारीची माहिती दिली. युनायटेडचे अध्यक्ष सुरेश कोळकी यांच्याहस्ते के. व्ही. सुजित यांचा शाल, रोपटे देऊन स्वागत करण्यात आले.
सुजित म्हणाले, ‘खेळ केवळ आरोग्यच देतो असे नाही. शिस्त, प्रतिस्पर्धी व पंचांबद्दल आदर, यशासाठी संघर्ष आदी जीवनकौशल्ये खेळातूनच आपल्याला शिकता येतात. निरोगी राहायचे असेल तर शेवटपर्यंत मैदानाशी नाते कायम राखा’
यावेळी सहायक प्रशिक्षक बिपिनचंद्र, अजमल, सौरभ पाटील, प्रसन्न प्रसादी, ओमकार जाधव, यासीन नदाफ, सौरभ जाधव, तानाजी देवेकर, सागर पोवार, आदर्श दळवी यांच्यासह खेळाडू, पालक उपस्थित होते. सश्रुत सासने यांनी आभार मानले.
...................
चौकट...
मंगळूर एफसीशी करार
येनेपोया विद्यापीठांतर्गत मंगळूर एफसीने गेल्या दशकभरात दक्षिण भारतात फुटबॉलमध्ये झेप घेतली आहे. यूथ लीग, बंगळूर लीगमधील प्रतिभावान संघ म्हणून ओळख निर्माण केली आहे. दरवर्षी अखिल भारतीय फेरीसाठी हे संघ पात्र ठरत आहेत. गडहिंग्लज युनायटेड असोसिएशनचा मंगळूर एफसीशी करार करण्याचे यावेळी निश्चित झाले. खेळाडू, प्रशिक्षकांना संधी आणि प्रशिक्षण, स्पर्धांचे आयोजन यासाठी सहाय्य करण्याचे कोळकी यांनी भाषणात आवाहन केले.

Marathi News Esakal
www.esakal.com