

महाराजस्व ‘दारी’, लाभ मिळतोय ‘भारी’!
गडहिंग्लज तालुका; १२५ महिलांना शेतकरी दर्जा, पाच हजार जणांना लाभ
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १२ : महसूल विभागासह शासनाच्या विविध खात्यांच्या सेवांचे विकेंद्रीकरण करण्याच्या हेतूने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अलीकडील काही वर्षांपासून होत आहेत. शहरासह प्रत्येक मंडल ते विधानसभा मतदारसंघ मर्यादित झालेल्या या अभियानात तालुक्यातील चार हजार ९४० जणांना लाभ मिळाला आहे. त्यामुळे महाराजस्व आले दारी, लाभ मिळतोय भारी अशी प्रतिक्रिया जनतेतून व्यक्त होत आहेत.
महसूल विभागाच्या पुढाकाराने महाराजस्व अभियानाची अंमलबजावणी दरवर्षी केली जाते. हे अभियान मंडलनिहाय राबविले जाते. या वर्षी, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एका ठिकाणी या अभियानाची अंमलबजावणी केली. या अभियानामध्ये महसूलतर्फे विविध दाखले, ॲग्रीस्टॅक, संजय गांधी निराधार, जीवंत सातबारा, महिलांना शेतकरी दर्जा, फेरफार शुल्क माफीचे उतारे, वारसा नोंद आदींची सेवा देण्यात आली. याशिवाय कृषी विभाग, जिल्हा परिषद, वीज महावितरण, बचत गट, आरोग्य विभागासह नगरपरिषद आदी विभागांचे स्टॉल लावून जनतेला सेवा उपलब्ध करून दिल्या. अनेक दिवसांपासून तटलेले प्रश्नही यानिमित्ताने तडीला नेले. विशेष करून घरकुल योजना, पीएम किसान, ॲग्रीस्टॅक नोंदणी, ई- केवायसी, कृषी यांत्रिकीकरण, संजय गांधी योजना, आधार कार्ड दुरुस्ती, नवीन काढणे आदींची सेवा प्रभावी ठरत आहे. प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे, तहसीलदार ऋषिकेत शेळके यांच्या मार्गदर्शनाने मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवकांसह विविध विभागांचे प्रतिनिधींकडून नियोजन केले होते.
दरम्यान, शासकीय विभागातील कामे म्हणजे ‘सहा महिने थांब...’, अशी अवस्था असल्याचा अनुभव जनतेला येतो. हा शिक्का पुसून काढण्यासाठीच शासनाने अभियानाद्वारे जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याची उपयुक्तताही वाढत चालली आहे. अभियानात काम करून घेण्याचा चांगला अनुभव जनतेला येत असल्याने प्रतिसादही मिळत आहे. यामुळे शेकडो लाभार्थींच्या उपस्थितीत हे अभियान यशस्वी होत असल्याचे चित्र आहे. एकाच छताखाली सर्व शासकीय विभागांच्या योजनांचा लाभ मिळत असल्याने ग्रामीण भागातील जनतेचे तालुक्यापर्यंतचे हेलपाटेही वाचत आहेत. परिणामी महसूल विभागाने दरवर्षी शहरासह प्रत्येक मंडलमध्ये अभियान राबवून जनतेच्या दारात योजनांचा लाभ दिला जात आहे.
--------------
चौकट...
दृष्टिक्षेपात दिलेले लाभ
- राज्य-केंद्राच्या योजना ३०४४
- जिवंत सातबारा ३६०
- महिलांना शेतकरी दर्जा १२५
- मुख्यमंत्री पाणंद ११२५
- स्थानिक स्वराज्य संस्थाच्या योजना १७१
--------------
कोट
महाराजस्व अभियान ग्रामीण जनतेला आधारवड ठरली आहे. प्रत्येक योजनेचा लाभ मिळत असल्याने जनतेचा प्रतिसादही चांगला आहे. सेवांचे विक्रेंद्रीकरण केल्याने अधिकाधिक जनतेपर्यंत योजना पोहोचण्यास मदत होत आहे. यापुढेही अभियानाची अंमलबजावणी प्रभावीपणे होईल.
- ऋषिकेत शेळके, तहसीलदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.