
कोवाडला भटक्या कुत्र्यांची दहशत
कोवाडला भटक्या कुत्र्यांची दहशत
अशोक पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कोवाड, ता. २६ ः किणी (ता. चंदगड) हद्दीतील कोवाड बसस्थानकावर भटक्या कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस अधिक गडद होत आहे. ३० ते ४० कुत्र्यांची झुंड बसस्थानक परिसरात आहे. रात्री त्यांचा वावर भीतीदायक आहे. लोकांच्या अंगावर धावून जाणे, मोठ्याने ओरडणे, वाहनांचा पाठलाग करणे असे वारंवार प्रकार सुरू असल्याने लोकांत भीती आहे. स्थानिक प्रशासनाने तातडीने यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी लोकांतून होत आहे.
इचलकरंजी येथे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात काल (ता. २५) महिला ठार झाल्याने भटक्या कुत्र्यांचा प्रश्न सर्वत्रच ऐरणीवर आला आहे. वेळीच त्यांचा बंदोबस्त करण्याची वेळ स्थानिक ग्रामस्थ व प्रशासनावर आली. कोवाड बाजारपेठेत साधारण ५० भटकी कुत्री आहेत. किणी हद्दीतील कोवाड बसस्थानक परिसरात यांची संख्या जास्त आहे. याकडे दुर्लक्ष झाल्याने दिवसेंदिवस यांची संख्या वाढत आहे. दिवसभर बाजरपेठेसह बाहेर शेतातून ही कुत्री फिरतात. रात्र झाली की बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर ठाण मांडतात. मध्यरात्री या परिसरात एकट्याने जाणेही धोकादायक झाले आहे. चिकन व मटण दुकानातील टाकाऊ पदार्थांवर ही कुत्री डल्ला मारत असल्याचे निदर्शनाला आले. त्यामुळे त्यांच्यात हिंस्त्रपणा वाढत आहे. मॉर्निंग वॉकवेळी हातात काठी घेऊन लोक फिरत असतात. कुत्र्यांची संख्या जास्त असल्याने स्थानिक प्रशासनाने याची दखल घेऊन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
----------------------------------------
कोवाड येथे भटक्या कुत्र्यांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्या संख्येकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांची संख्या वाढली. रात्री त्यांची सर्वांना भीती वाटते. पहाटे व रात्री काही कुत्री हल्ला करीत आहेत. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न लोकांच्या जीवावर आला.
- संभाजी वांद्रे, कोवाड