
कोवाड - विज कंपनी
दोन कायमस्वरूपी वायरमनची
कोवाडला आवश्यकता
कोवाड, ता. १७ ः येथे महावितरणचे सबस्टेशन आहे. मोठ्या बाजारपेठेचे गाव असल्याने ग्राहकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे वीज कंपनीने नोकरीत कायम असलेल्या आणखी दोन वायरमनची नियुक्ती करुन ग्राहकांची गैरसोय दूर करावी,अशी मागणी होत आहे.
कोवाड परिसरातील छोट्या गावातून नोकरीत कायम असलेल्या वायरमनची नियुक्ती केली आहे. कोवाडसारख्या सबस्टेशन असलेल्या बाजारपेठेच्या व अधिक महसूल देणाऱ्या गावात फक्त दोन कंत्राटी वायरमनांवर कार्यभार आहे. येथे घरगुती, शेती, व्यापारी व उद्योगाचे मोठे ग्राहक आहेत. महावितरणची दुरुस्तीची कामेही असतात. वाकलेले खांब व लोंबकळणाऱ्या विद्युत वाहिन्यांचा प्रश्न गहन आहे. उघड्यावरील डीपी धोकादायक आहेत. बाजारपेठेच्या गावात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने उद्योग-व्यवसाय अडचणीत येत आहेत. वेळेवर वीज नसल्याने कृषी पंपधारकही वैतागले आहेत. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे वेळेत काम होत नसल्याने ग्राहकांत नाराजी आहे. वेळेत सेवा देण्यासाठी महावितरणने कायम असलेल्या दोन वायरमनची नियुक्ती करुन ग्राहकांची गैरसोय दूर करावी,अशी मागणी होत आहे.
-------------------------
कोवाडला दोन कंत्राटी कामगार आहेत. आणखी एक नोकरीत कायम असलेल्या वायरमनची नियुक्ती केली आहे. प्रत्यक्षात तसे होत नसेल तर नक्कीच माहिती घेऊन ग्राहकांच्या गैरसोयी दूर करू.
- विशाल लोदी, उपकार्यकारी अभियंता, चंदगड