महिला बचत गट रिपोर्ताज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिला बचत गट रिपोर्ताज
महिला बचत गट रिपोर्ताज

महिला बचत गट रिपोर्ताज

sakal_logo
By

79379
कठीण समय येता
बचत गट मदतीला...

‘माझे पती रिक्षा ड्रायव्हर. मुलगी दहावीला तर मुलगा सहावीला. मुलांच्या शिक्षणाचा खर्च, घरखर्च अशा गोष्टीही कमाईतून भागेनात, अशा कठीण प्रसंगात महिला बचत गट मदतीला आला. शिलाईकामाचा मला थोडा अनुभव होताच. त्यातूनच पिकोफॉल मशीन घ्यायचे ठरवले. बचत गटाने मला २० हजार कर्ज दिले. पिको फॉल मशीन घेतले आणि ते कर्ज वर्षभरात फेडले. माझी कमाई सुरू झाली आणि घरखर्चही भागू लागला,’ अशा भावना शीतल यादव यांनी व्यक्त केल्या. बालिंगा येथील सद्गुरु स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या मासिक बैठकीतील हा क्षण. बचत गटाच्या माध्यमातून महिला वर्गाला आणि पर्यायाने कुटुंबाला मिळणारा पाठिंबा या प्रसंगातून उलगडला...
..........................

दोन दिवसांत कर्ज
बालिंगा येथील सद्गुरु स्वयंसहाय्यता महिला बचत गटाची दर महिन्याला होणारी बैठक संक्रांतीनंतर आयोजित केली होती. दर महिन्याला ती सात तारखेला होते. मात्र सणानिमित्त हळदी-कुंकवाचा सोहळाही महिलांनी साजरा केला. बचत गटाच्या एकूण ११ सदस्या. महिन्याला एका सदस्याच्या घरी बैठक आयोजित केली जाते. जिच्या घरी बैठक तिच्या घरी चहापान होते. अवघ्या दोनशे रुपयांची बचत जमा केली जाते. त्याच दिवशी कोणाला कर्ज हवे असल्यास कोणाची काही नड असल्यास विचारली जाते. अवघ्या दोन दिवसांत तिला कर्जपुरवठा केला जातो. ऐन वेळी कोणाकडे हात पसरण्याऐवजी बचत गटच मदतीला धावतो आणि दोन हजारांपासून ते ३० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. वर्षभरात ते कर्ज फेडण्याची मुभा दिली जाते.

स्वप्न साकारण्यासाठी मदत...
बुधवारी दुपारी महिला एकत्र जमल्या. हळदी-कुंकू एकमेकींना देत वाणही दिले. सर्वांनी २०० रुपयांची बचत गोळा केली. जमा झालेली रक्कम बँकेत कोणी भरायची याची जबाबदारी एका महिलेकडे दिली. नव्या वर्षात कोणाला पैशांची गरज आहे का, याचा कानोसा घेतला. बचत गटाचे पुढील नियोजन झाल्यानंतर त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. बचत गटामुळे झालेल्या मदतीतून कोणी टीव्ही घेतला तर कोणी फ्रीज. तर कोणाच्या घरात अचानक आजारपण उद्भवल्यावर बचत गटाचे पैसे कसे मदतीला आले याचा अनुभव सांगितला. कोणाच्या घराचे बांधकाम पैशांअभावी थांबले होते. बचत गटातून मिळणाऱ्या थोड्याशा रकमेतून बांधकामाला जोर मिळाला आणि आयुष्य भरासाठीचे स्वप्न साकार झाले.
चार महिला एकत्र आल्या की फक्त फालतू गप्पा होतात. त्यातून निष्पन्न काही होत नाही, अशा चर्चा ऐकायला मिळतात. मात्र याच महिला एकमेकींना आधार देत छोट्या-मोठ्या गोष्टींत आर्थिक पुरवठा करत संसाराची काळजी घेतात. ही गोष्ट छोटी वाटत असली तरी त्या महिलेच्या आयुष्याला मात्र वेगळीच दिशा मिळत असते. याचीच प्रचिती हळदी कुंकू आणि बचत गटाच्या मीटिंगमध्ये हजेरी लावल्यानंतर मिळाली.

गावागावांत बचतगट
जिल्हा परिषदेच्या उमेद अभियानांतर्गत गावागावांत महिलांचे स्वयं सहायता समूह स्थापन केले. महिलांना आर्थिक बाबीचे ज्ञान मिळावे यासाठी जिल्हा परिषदेतर्फे प्रशिक्षणही दिले. एखादा उद्योग, व्यवसाय उभारण्यासाठी कर्ज देण्याची सोय केली. गावातील महिला बचत गटांनी संधीचे सोने करत छोटे-मोठे उद्योगधंदे उभारले तर संसारातील छोट्या मोठ्या गरजाही भागवल्या.

चौकट
बचत गटाच्या सदस्या
अध्यक्षा गीता चौगुले, सचिव पुनम आयरेकर, पूजा चव्हाण, अर्चना आयरेकर, सुजाता आयरेकर, शीतल यादव, भारती वाकरेकर, मनीषा चौगुले, नेहा भाट, श्वेता यादव, सोनाली चव्हाण

ााकोट
दोन हजार अशी किरकोळ रक्कम असो किंवा ३० हजार पर्यंत ची नड असली तरी आम्हा महिलांना बचत गटातून भागवता येते. सर्व महिलांना विचारात घेऊन कोणताही निर्णय घेतला जातो त्यामुळे व्यवहारात पारदर्शकता राहते.
- पुनम आयरेकर, सचिव
.........

दर महिन्याला भरणारी मीटिंग म्हणजे आमच्यासाठी आनंदाचा मेळा असतो. एकाचं गावात राहत असलो तरी प्रत्येकीचे व्याप वेगळे असतात. त्यामुळे सहसा भेटायला वेळ मिळत नाही. मात्र बैठकीत बचतीसोबतच गप्पा होतात, तेवढाच वेळ आम्हाला आमच्या आनंदासाठी देता येतो.
- सोनाली चव्हाण, सदस्या