मालिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालिका
मालिका

मालिका

sakal_logo
By

11937

मालिका लीड
''इकिगाई'' ही जपानी संकल्पना. आवडत्या क्षेत्रात झोकून देऊन आनंदाने काम करणे हा त्याचा अर्थ. या संकल्पनेच्या वाटेवर चालणाऱ्या माणसांच काम अनोखं आहे. जगण्यातला आनंद शोधत ही माणसं उत्कृष्ट कार्य करतात. ना प्रसिद्धी, ना केलेल्या कामाचा गाजावाजा तसेच क्षेत्र कोणतंही असो पाय जमिनीवर ठेवून काम करणे हे त्यांच्या जगण्याचं सूत्र. अशा माणसांचा घेतलेला हा शोध...
-
लोगो- भन्नाट माणसं प्रेरक कहाणी- भाग - १
-

जंगलातल्या माणसांनी बदलंल आयुष्य !
निसर्ग शिक्षक सुहास वायंगणकर यांचा पर्यावरण जागृतीचा आदर्शवत प्रवास

संदीप खांडेकर : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ : ‘कोयना-चांदोली जंगल फिरायला गेलो होतो. तेथे रेडिओ नव्हता की, कोणता धर्मग्रंथ नव्हता. पारंपरिक ज्ञानाच्या आधारे धनगरवाड्यातली माणसं आनंदाने जगत होती. वीस-वीस किलोमीटर पायी जात होती. त्यांच्या जगण्याची पद्धत भावली. मला जगण्याचे निदान सापडले. पुढे टीक नेचर क्लबचा सदस्य झालो आणि पर्यावरणविषयक कामात स्वत:ला गुंतवून घेतले,’ निसर्ग शिक्षक ओळख असणारे सुहास वायंगणकर सांगत होते.
पर्यावरण जागृतीचे काम म्हटले की, हा तहान-भूक हरणारा माणूस. शाळा-शाळांत जाऊन विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व पटवून देतो. कोणाला टेरेस गार्डन, जैवविविधता पार्क अथवा फुलपाखरू उद्यान साकारायचे असेल, तर त्यांच्या मदतीला धावतो. पदव्युत्तर पदवी वाणिज्य शाखेतून मिळवली असली तरी त्यांचे पर्यावरणविषयक काम आदर्शवत आहे.

श्री. वायंगणकर स्वभावाने नम्र तितकेच अबोल वाटणारे. निसर्गाच्या कुशीत विसावल्यावर मात्र ते भरभरून बोलतात. एम.कॉम.नंतर ते पीएच.डी. करू शकले असते किंवा शासकीय नोकरीच्या मागे लागले असते. पर्यावरण प्रेमाने झपाटल्याने त्यांनी त्या वाटेवर जाणे पसंत केले नाही. पर्यावरण हेच जीवन, हे सूत्र त्यांनी मनाशी घट्ट केले. प्रा. डॉ. अनिलराज जगदाळे यांच्या टीक नेचर क्लबचे सदस्य म्हणून त्यांनी पर्यावरणविषयक कामाला सुरुवात केली. डिप्लोमा इन एनव्हायर्मेंट अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ते वर्ल्ड वाईल्ड फंडच्या (डब्ल्यूडब्ल्यूएफ) कोल्हापूर प्रादेशिक्षक कार्यालयात सहाय्यक शिक्षण अधिकारी म्हणून रूजू झाले. नॅशनल नेचर क्लबच्या कार्यात मोलाचे योगदान देत त्यांनी दोनशे शाळांत नेचर क्लब स्थापन केले. पश्‍चिम घाटाचा परिवैज्ञानिकी शाखेच्या अभ्यासावर त्यांनी लक्ष केंद्रित केले.
डब्ल्यूडब्ल्यूएफचे कार्यालय बंद झाल्यानंतर पुढे काय, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर होता. अहमदाबादच्या सीईई संस्थेत काम करण्याची त्यांना संधी मिळाली. पश्‍चिम घाट विशेषतः इको क्लब योजनेंतर्गत त्यांनी शाळांसमवेत काम केले. रानमेव्याचा त्यांचा अभ्यास पक्का झाला. फ्री लान्स कन्सल्टंट म्हणून त्यांनी काम केले आणि दांडेली, उत्तर कॅनरा, सोलापूर, भंडारा, गोवा, कोल्हापूर येथील फुलपाखरू उद्याने उभारण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. अभिनेता सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई प्रकल्पात ते सल्लागार आहेत, तसेच अमीर खानच्या पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धत पाणलोट क्षेत्रात कोणती झाडे लावायची, याचे मार्गदर्शन केले आहे. त्यांचा पर्यावरण जागृतीचा प्रवास अखंडपणे सुरू आहे. शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन तरुणाई असो की, ज्येष्ठ नागरिक त्यांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्यात ते कमी पडत नाहीत.