सुमंगलम- मुलाखत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुमंगलम- मुलाखत
सुमंगलम- मुलाखत

सुमंगलम- मुलाखत

sakal_logo
By

फोटो 83304
-
फोटो 83814

येणारा प्रत्येक दिवस पुनर्निर्मिती, पुनर्वापराचा...
अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी; पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी लोकोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन
...............
येणाऱ्या सात ते दहा वर्षांत आपण जर सुधारलो नाही, तर पृथ्वीचा विनाश अटळ आहे आणि हे आता वैज्ञानिकांनी विविध माध्यमांतून सिद्ध केले. साहजिकच, वसुंधरेला वाचविण्यासाठी आपल्या प्रत्येकाचा येणारा प्रत्येक दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. वैयक्तिक आणि सामूहिक अशा दोन्ही पातळ्यांवर पर्यावरणपूरक कृतिशील पाऊल उचलताना नवनिर्मितीपेक्षा पुनर्निर्मिती, पुनर्वापरावर भर द्यावा लागेल... हीच वेळ आहे जागे होण्याची. अन्यथा, पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. पर्यावरणाबाबत समाजातील सर्वच घटकांतील लोकांमध्ये जागृती वाढावी, पर्यावरणीय प्रश्नावर उत्तर शोधण्यासाठी मंथन व्हावे, यासाठी सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवाचे आयोजन केले आहे. त्यात सर्वांनी सहभागी होऊया. आपल्या पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठीचा वज्रनिर्धार करूया... कणेरी मठावर अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी संवाद साधत असतात आणि या लोकोत्सवाच्या उपयुक्ततेबरोबर त्यातून मंथन होणाऱ्या ‘पंचमहाभूतांचे संतुलन’ या विषयाचा सर्वांगीण वेध ते घेत असतात.

...तर मातीतले विष खाऊन जगायची वेळ
जगभरातील विविध ठिकाणी होत असलेल्या चक्रीवादळ, अतिवृष्टी आणि त्यातून होत असलेल्या नुकसानीबाबत लक्ष वेधत स्वामीजींशी संवाद सुरू होतो आणि ते तितक्याच तळमळीने बोलतात. ते सांगतात, ‘‘शेतीत रासायनिक खतांचा वापर आपण इतका केला, की आता जमिनीचा पोत बदलला आहे. हवेतील प्रदूषण १९५० ते २००० या ५० वर्षांत जितके झाले नाही, त्याच्या दुपटीने या दहा वर्षांत झाले आहे आणि जसजसे तापमान वाढायला लागले, तसे विविध प्रश्नांची मालिका सुरू झाली आहे. तापमानात आणखी चार डिग्री सेल्सिअस वाढ झाल्यास चार फूट मातीची रेती होईल. दोन डिग्री सेल्सिअस तापमान वाढल्यास २५ टक्के उसाच्या उत्पादनात घट होणार आहे. एकूणच, परिस्थितीचा विचार केला तर मातीतले विष खाऊन आपल्याला जगायची वेळ येणार आहे.’’

आतापासूनच उपाययोजना राबवाव्या लागतील
सध्या आपला देश मधुमेहात क्रमांक एकवर असून, लवकरच तो कर्करोगातही क्रमांक एकवर जाईल, अशी भीती आहे. कारण, हवेतील कार्बनचे कण वाढले आणि ते तापायला लागले. त्यामुळे हिमखंड वितळायला लागले. समुद्राच्या पाण्याची पातळी वाढू लागली. हवेतील ओझोनचा थर कमी होऊ लागला आणि त्यामुळेच माणूस व प्राण्यांनाही कर्करोगाचा अधिक धोका निर्माण झाला आहे. साहजिकच, आपल्या अस्तित्वाबरोबरच पुढच्या पिढीसाठी आतापासूनच विविध उपाययोजना राबवाव्या लागणार असल्याचे स्वामीजींनी नमूद केले.

माणसं कमी, उपभोग अधिक
माणसं कमी आणि प्रत्येक गोष्टीचा उपभोग अधिक, असे चित्र जगभर आहे. उर्जेचा विचार केला तर जगातील केवळ पाच टक्के लोकसंख्या अमेरिकेची आहे आणि संपूर्ण जगाला लागणाऱ्या उर्जेच्या २५ टक्के ऊर्जा हा देश वापरतो. एकूणच, केवळ भारत नव्हे, तर जगभरातील विविध पर्यावरणीय प्रश्नावर लोकोत्सवात मंथन होणार आहे. त्यासाठी पंचमहाभूतांचे संतुलन किती महत्त्वाचे आहे, हे सर्वांनाच माहिती व्हावे, यासाठी पाच महाभूतांची माहिती देणारी भव्य दालने उभारण्यात आली आहेत. अगदी तिसरी-चौथीच्या मुलालाही समजेल, इतक्या सोप्या पद्धतीने विविध मॉडेलचा वापर करून त्याची मांडणी केली आहे. रिसायकलिंग गॅलरीच्या माध्यमातून प्लास्टिक, कापड, काच, कचरा, ई वेस्टचा पुनर्वापर कसा करता येईल, याच्या विविध पर्यावरणपूरक पद्घतीवर भर दिला आहे, असेही स्वामीजी आवर्जून सांगतात.

ही चतु:सूत्री महत्त्वाची...
पर्यावरणाच्या जतन आणि संवर्धनासाठी नवनिर्मितीपेक्षा आता पुनर्निर्मिती, पुनर्वापरावर भर द्यावा लागणार आहे. शक्य त्या सर्व गोष्टींचे रिसायकलिंग, त्यातून रोजगाराची निर्मिती, प्रदूषण मुक्तीसाठी प्रत्यक्ष कृती कार्यक्रम आणि टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंची निर्मिती करून त्यातून उत्पन्नाचे विविध पर्याय, या चार गोष्टींवर येत्या काळात अधिक भर द्यावा लागेल. २०२३ ते २०३३ या दहा वर्षांच्या काळात आपण स्वतः बदललो नाही, तर निसर्ग आपल्याला रोज नवीन-नवीन धक्के देतच राहणार आहे. या धक्क्यांची संख्या वाढली, तर आपण आपले अस्तित्वच संपवून बसणार आहोत, असेही स्वामीजी सांगतात.