रिपोर्ताज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिपोर्ताज
रिपोर्ताज

रिपोर्ताज

sakal_logo
By

85523
रिपोर्ताज
संदीप खांडेकर

महिला वाहकांची
तारेवरची कसरत...!

इंट्रो
मध्यवर्ती बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी. महिला वाहकाकडे (कंडक्टर) तिकीट काढण्यासाठी मोठी लागलेली रांग. एका प्रवाशाने तिकिटासाठी पैसे दिले. महिला वाहकाने सुटे पैसे देण्याचा आग्रह केला. ‘सुटं नाहीत,’ एवढे बोलून तो थांबला. त्याला तिकिटाचे पैसे देताना महिला वाहकाची कसरत सुरू झाली. तेवढ्यात एसटीची बेल वाजली. घाईघाईने तिने शेजारच्या केबिनमध्ये धाव घेतली. शंभर रुपये सुटे करुन घेत प्रवाशाचे उर्वरित पैसे दिले आणि सुटकेचा नि:श्वास सोडला. महिला वाचकांच्या जगण्याचा एक पदर उलगडला. त्यांचा दिवसभरातील प्रवास जाणून घेण्याची उत्कंठा वाढली. त्यासाठी मध्यवर्ती बसस्थानक गाठलं...

---------------

दिवसाची सुरुवात पहाटे चार वाजता...
मध्यवर्ती बसस्थानक गजबजलेलं होतं. प्रत्येक फलाटावर प्रवासी बसले होते. शेजारच्या स्थानकावरील दोन केबिनमध्ये तिकिटाचे बुकिंग सुरू होते. दोन्ही केबिनमध्ये महिला वाहक तिकीट प्रवाशांना देत होत्या. तिथे महिला वाहक अरुणा प्रशांत पाटील यांची भेट झाली. त्या मूळच्या कोल्हापुरातील लक्ष्मीपुरीतल्या. कॉमर्स कॉलेजमधून वाणिज्य शाखेची पदवी मिळविल्यानंतर त्यांनी वाहकाची नोकरी स्वीकारली. त्या वाहक म्हणून २००९ ला रुजू झाल्या. स्थानकावर त्यांची चाललेली कसरत पाहून थेट त्यांच्याशी संवाद सुरू केला. ‘पहाटे चार वाजता माझा दिवस सुरू होतो. घरातील कामे आवरून पावणेसहा वाजता स्थानकावर यावे लागते. सांगली, इस्लामपूर, जोतिबा, पाटीलवाडी यापैकी ज्या मार्गावर ड्युटी असेल ती करावी लागते. बसमध्ये तांत्रिक बिघाड झाला तर ड्युटीची वेळ आपोआप वाढते. घरी जाऊन कामाची आवरावर करावी लागते. जमिनीवर पाठ टेकल्यावर झोप लागते आणि पुन्हा पहाटे चार वाजता उठावे लागते.’ त्यांच्याशी संवाद आटोपून पुन्हा स्थानकावर फेरफटका मारला.

राज्यात सात हजार महिला कर्मचारी...
महिलांना स्वतंत्र विश्रांतीगृह उपलब्ध नसल्याची तक्रार आहे. पूर्वीच्या दहा बाय दहाच्या रूममध्ये त्यांना बसावे लागते. कोल्हापूर जिल्ह्यातील आगारांत कार्यरत महिलांचा आकडा साडेसातशे आहे. महिला वाहकांची संख्या २२६ इतकी आहे. राज्यातील आगारांत २००४ पर्यंत कमी प्रमाणात एसटी सेवेत होत्या. आजघडीला राज्यातील आकडा साडेसहा ते सात हजार इतका आहे. यात महिला वाहक, लिपीक, तांत्रिक व तिकीट चेकर यांचा समावेश आहे. महिलांची संख्या वाढल्याने त्यांना आवश्‍यक सोयी-सुविधा मिळण्याची गरज आहे. तिकिटाच्या हिशेबात चूक झाली तर त्यांना दंडाला सामोरे जावे लागते. पहिल्या चुकीस पन्नास पट, दुसऱ्या शंभर पट, तर तिसऱ्या चुकीस तीनशे पट दंड आकारला जातो. त्यानंतर बदली अथवा पोलिसांत तक्रार दिली जाते. काही वेळेस महिलांना वस्तीची ड्युटी मिळते. तेथे पिण्यायोग्य पाणी, स्वच्छतागृहे चांगल्या दर्जाची उपलब्ध नसतात. सॅनिटरी वेंडिंग मशिनही नसते. ड्युटी कशी करायची, असा प्रश्‍न महिला कर्मचाऱ्यांसमोर निर्माण होतो.

निर्भया समितीद्वारे प्रश्‍नांची सोडवणूक...
महिला कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, लैंगिक अत्याचार, धक्काबुक्कीसारख्या घटनांना सामोरे जायला नको, यासाठी महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेची निर्भया समिती काम करते. कोणी महिलांचा अवमान करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्याविरोधात लेखी तक्रार करते. ही माहिती ऐकून बरे वाटले. पुन्हा स्थानकावरील फलाट क्रमांक दोनवर उभ्या असलेल्या एस. टी.मध्ये गेलो. प्रवाशांची गर्दी होती. गर्दीतून पुढे सरकताना महिला वाहकाची कसरत सुरू होती. प्रवाशाने थेट पाचशे रुपयांची नोट काढल्याने तिच्या कपाळावर आठ्या उमटल्या. ते पाहून गाडीतून पायउतार झालो. स्थानकावर दोन-तीन महिला वाहक चर्चा करताना दिसल्या. त्यांची कोणत्या विषयावर चर्चा सुरू आहे, हे कळाले नाही. त्यांना रोज द्याव्या लागणाऱ्या नवनव्या प्रसंगांनी मन मात्र गलबलून गेलं.
-----------------

कोट...
विभागीय उपाध्यक्षपदावरील महिलांकडून प्रश्‍नांचे संकलन करून त्या शासनासमोर मांडल्या जातात. महिलांच्या गणवेशाचा प्रश्‍न होता. तो उचलून धरल्यानंतर खाकी कापड देण्याचा तोंडी निर्णय झाला आहे. राज्यात काही ठिकाणी विश्रांतीगृहे आहेत. तेथे पिण्याचे पाणी, पंखा, स्वच्छतेचे प्रश्‍न आहेत.
- शीला नाईकवडी, महिला आघाडीप्रमुख, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना

कोट
महिलांची ड्युटी, बालसंगोपनाच्या रजा असोत की, विश्रांतीगृहाचा प्रश्‍न. आम्ही सातत्याने आवाज उठवत आलो आहोत.
- उत्तम पाटील, जिल्हा सचिव, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना