
दिलबहार चा विजय
85973
अधिकच्या वेळेत
‘दिलबहार’चा विजय
उपांत्य फेरीत प्रवेश; बीजीएम स्पोर्टस् संघाचा झुंजार खेळ
कोल्हापूर, ता. २८ : बीजीएम स्पोर्टस् संघाच्या झुंजार खेळामुळे कठीण झालेला दिलबहार तालीम मंडळचा विजय अधिकच्या वेळेत निश्चित झाला. ‘दिलबहार’ने ''बीजीएम''वर २-१ असा विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. सतेज चषक फुटबॉल स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे.
''दिलबहार'' व ''बीजीएम'' संघा दरम्यानच्या सामन्यात सुरुवातीपासून ‘दिलबहार’ने आक्रमक चाली रचल्या. यात दिलबहारला मिळालेल्या पेनल्टीच्या संधीचे रूपांतर गोलमध्ये होऊ शकले नाही. इम्यानुअलने मारलेला फटका गोलजाळीवरून गेला, तर ‘बीजीएम’च्या आघाडी फळीने अधिक आक्रमकता दाखवत ‘दिलबहार’ची बचाव फळी भेदली. मात्र, मोक्याच्या क्षणी प्रयत्न फसल्याने सामना पूर्वार्धात गोलशून्य बरोबरीत राहिला.
उत्तरार्धात आक्रमण- प्रति आक्रमणाचा दोन्ही संघांचा खेळ सुरूच राहिला. यात सामन्याच्या ७५ व्या मिनिटाला ‘दिलबहार’चा खेळाडू पवन माळी याला प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूने धोकादायकरीत्या अडवल्याने पंचांनी ''दिलबहार''ला पुन्हा पेनल्टी किक बहाल केली. या संधीचा फायदा उठवत संडे ओबेम याने गोल नोंदवून ‘दिलबहार’ला १ गोलची आघाडी मिळवून दिली. पाठोपाठ सामन्याच्या ७६ व्या मिनिटाला बीजीएमच्या वैभव राऊतने मैदानी गोल नोंदवत सामना १-१ असा बरोबरीत आणाला, तर सामन्याच्या अधिकच्या वेळेत ‘दिलबहार’च्या पवन माळी याने गोल नोंदवून संघाला २-१ असा विजय मिळवून दिला. बीजीएमचा वैभव राऊत याला लढवय्या खेळाडू म्हणून गौरवण्यात आले.
चौकट
आजचा सामना
पाटाकडील तालीम मंडळ
विरुद्ध प्रॅक्टीस फुटबॉल क्लब