

निवासी फुटबॉल केंद्रासाठी एकत्र या...
...............
15440
चंद्रकांत सुतार
कोल्हापूरबाबत शासन धोरण कधी बदलणार?
मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आदी मोठ्या शहरांच्या तुलनेत कोल्हापूर छोटे आहे. मात्र, देशभरात या शहराची ओळख ‘क्रीडानगरी’ म्हणूनच आहे. विशेषतः फुटबॉलची तिसरी पंढरी म्हणून गोवा, कोलकाता नंतर कोल्हापूर शहराचा विचार फुटबॉल क्षेत्रात होत आहे. झपाट्याने कोल्हापूर फुटबॉल क्षेत्रात भरारी घेत आहे. मात्र, या खेळासाठी शास्त्रोक्त असे एकही फुटबॉल प्रशिक्षण केंद्र किंवा निवासी फुटबॉल अकादमी नाही. त्यामुळे नवोदितांना केवळ शाळांमधून आणि स्थानिक संघांमधून जे प्रशिक्षण मिळते, त्याच शिदोरीवर ही मुले अगदी बाराव्या वर्षांपासून पुढे वरिष्ठ गटातही खेळतात. यात चूक काय, बरोबर काय याची पारख या मुला-मुलींना नसते. त्यामुळे त्यांना जी मंडळी शिकवतात, त्याप्रमाणेच ही मुले त्याप्रमाणे खेळत असतात. अनेकदा चूक की बरोबर, याची माहीत नसल्यामुळे शारीरिक इजा होण्याची शक्यता अधिक असते. खेळ चुकीच्या पद्धतीने खेळला जातो. त्यासाठी खेळाडूंना शास्त्रोक्त प्रशिक्षित दर्जेदार प्रशिक्षकाची गरज लागते. किंबहुना प्रशिक्षण केंद्राची गरज भासते. खेळाची आधुनिक तंत्रकौशल्ये आत्मसात करण्यासाठी पुणे, मुंबई किंवा अन्य शहरांचा आधार घ्यावा लागतो. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, अशा खेळाडूंचे पालक आपल्या मुला-मुलींना पुणे, मुंबईतील खासगी फुटबॉल प्रशिक्षण केंद्रात प्रवेश मिळवून देतात. कोल्हापूर क्रीडानगरी आणि त्यातल्या त्यात फुटबॉलनगरी म्हणूनही सर्वश्रुत आहे. या शहरातील मुला-मुलींमध्ये जन्मजात टॅलेंट आहे. मात्र, त्याला योग्य त्या प्रशिक्षणाची जोड मिळाली तर हीच मुले देशाचे फुटबॉल खेळामधील भवितव्य ठरतील. शासनाने सर्व क्षेत्रांत धोरणात्मक निर्णय घेऊन त्या निर्णयाची अंमलबजावणीही सुरू केली आहे. अशाच पद्धतीने गेली बरीच वर्षे हा अनुत्तरित असलेला प्रश्न शासनाने सोडवून कोल्हापूरला दर्जेदार फुटबॉल प्रशिक्षण केंद्राची सोय करावी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी फुटबॉल निवासी केंद्र पुन्हा सुरू करण्याची हीच वेळ आहे. त्यामुळे फुटबॉलप्रेमी मंडळी त्यांच्या या निर्णयाचे स्वागत करतील.
- चंद्रकांत सुतार, ज्येष्ठ फुटबॉल संघटक
................
15441
गौरी चव्हाण
खेळाच्या प्रगतीवरच शहराचा विकास
एखाद्या शहराच्या विकासाचे मोजमाप करायचे ठरले तर त्या शहरात किती आंतरराष्ट्रीय पदकविजेते खेळाडू आहेत, यावरून ठरविले जाते. त्यामुळे चीन, जपान, अमेरिका ,ऑस्ट्रेलिया, जर्मनी, फ्रान्स आदी देशांची प्रगती किती झाली आहे, ही आपल्यासमोर मोठी उदाहरणे आहेत. त्यानुसार भारतातही अशा सुविधा पुरविल्या तर आमच्यासारखे खेळाडू ऑलिंपिकसारख्या स्पर्धेत चमकतील. कोल्हापुरात मुलांच्या फुटबॉलसोबत मुलींचाही फुटबॉल बहरला आहे. आज पुण्यासारख्या ठिकाणी कोल्हापूरच्या मुली व्यावसायिक फुटबॉल संघातून प्रतिनिधित्व करीत आहेत. कोल्हापुरात क्रीडा प्रबोधिनीअंतर्गत मुलांसाठी फुटबॉल निवासी केंद्र झाले तर मुलींसाठीही केंद्र व्हावे; जेणेकरून आमच्यासारख्या फुटबॉलपटूंना पुणे, मुंबई, बंगळूर, गोवा, कोलकाता यांसारख्या शहरांची वाट धरावी लागणार नाही. मोठ्या शहरांत आमच्या पालकांना येथील खासगी फुटबॉल अकादमीचा खर्च परवडत नाही. जर हीच सोय कोल्हापुरात झाली तर मुलांसोबत मुलींचाही फुटबॉल देशाच्या कानाकोपऱ्यांत पोहोचेल. याच प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून मुलींसाठीही व्यावसायिक फुटबॉलची दारे खुली होतील. त्यासोबत शास्त्रोक्त फुटबॉल प्रशिक्षण मिळेल. उच्च दर्जाचे प्रशिक्षण तसेच प्रशिक्षक भेटतील. याच क्रीडा प्रबोधिनीअंतर्गत अन्य खेळांच्या निवासी केंद्रातूनच भारताचे सुपरस्टार तयार झाले आहेत. नुकत्याच झालेल्या पॅरिस ऑलिंपिकमध्ये याच केंद्राच्या नेमबाज स्वप्नील कुसाळेने कांस्यपदकाचा वेध घेतला आहे. इतक्या सुविधा या केंद्रात प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडूंना मिळतात. त्यामुळे असे केंद्र कोल्हापुरात व्हायलाच हवे. कोल्हापुरात केवळ मुलांचाच फुटबॉल बहरला नाही तर मुलींचाही फुटबॉल तितकाच विकसित झाला आहे. त्यामुळे माझ्यासारख्या अन्य महिला खेळाडूही पुणे, मुंबईसह अन्य मोठ्या शहरांतून व्यावसायिक फुटबॉल संघातून खेळत आहेत. हाच आलेख आणखी उंचावेल आणि कोल्हापूरचे नाव मुलींच्या फुटबॉलमध्येही देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल.
- गौरी चव्हाण, राष्ट्रीय फुटबॉलपटू
...............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.