बीग स्टोरी '' जुनं ते सोनं ''
लोगो बीग स्टोरी
बावनकशी नाणं
जुनं तेच ‘सोनं’
------
पाश्चिमात्यऐवजी पारंपरिक
दागिने खरेदीकडे कल
लग्न सराईत नववधूची साज,
चपलाहार, ठुशीला पसंती
लग्न म्हटले की, नववधूच्या दागिन्यांची खरेदी ओघाने आलीच. लग्नातच स्त्रिया आयुष्यभराचा दागिना एकदाच करून घेतात. दागिने खरेदी म्हणजे लग्न सोहळ्यातील महत्त्वाचा भाग असतो. विशेषतः महाराष्ट्रीय लग्नांमध्ये दागिन्यांचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. मध्यंतरी कुंदन, अमेरिकन डायमंड अशा पाश्चिमात्य दागिने खरेदीकडे ओघ वाढला होता. त्यात सोने नकोसे वाटत होते. आता याला फाटा देत इतर कोणत्याही नव्या डिझाइनच्या पाश्चिमात्य दागिन्यांपेक्षा वेगवेगळ्या पेहरावावर पारंपरिक दागिने घालण्याचा एक ट्रेंड आला आहे. मग प्रति तोळा सोने ऐंशी हजार का असेना. यात कोणी कोल्हापुरी साज, तर कोणी चपलाहार, तर कोणी चंदनहार, शाहीहार, टेम्पल ज्वेलरी, ठुशी, शिंदे शाही अशा अनेक प्रकारच्या दागिन्यांच्या व्हरायटी सराफाकडून तयार करून घेतल्या जात आहेत. दिवसेंदिवस अशा जुन्या पद्धतीच्या पारंपरिक दागिन्यांना पुन्हा मागणी वाढत आहे.
------------------
कोरोनानंतरचा नवा ट्रेंड
तुळशी विवाहानंतर लग्नाचे अनेक मुहूर्त सुरू झाले आहेत. लग्न म्हटले की आपसूकच नववधूचे दागिने हा विषय जिव्हाळ्याचा बनतो. विशेषतः नववधूच्या गळ्यातील दागिन्यांच्या खरेदीकडे घरादाराचे लक्ष असते. हव्या त्या डिझाइननुसार दागिने सराफाकडून बनवून दिले जात आहेत. आता जुन्या पद्धतीच्या दागिन्यांना सर्वाधिक मागणी आहे. त्यानुसार वर्षापूर्वीच असे दागिने तयार करून घेतलेली जणू प्रथाच सुरू झाली आहे. विशेषतः ठुशी, शिंदेशाही तोडे, चपलाहार, चंदनहार, साज, शाहीहार, टेम्पल ज्वेलरी, राणीहार, चीताग, लक्ष्मीहार, मोहन माळ, गोलमणी, तुलसी माळ, बुगडी पुतली हार अशा पारंपरिक जुन्या पद्धतीच्या सुवर्ण अलंकारांना मागणी वाढत आहे. हा नवा ट्रेंड कोरोनानंतर ग्राहकांमध्ये रुजू लागला आहे.
--------------+
अँटिक दागिन्यांना मागणी वाढली
जुन्या काळातील राजे घराण्यातील स्त्रियांच्या अंगावरील घणसार दागिने असत. त्यांच्यासारखेच दागिने करून पाहिजेत, अशी मागणी वाढत आहे. दागिना जुन्या पद्धतीच्या पारंपरिक लूकसारखा दिसावा. त्यामुळे सराफांकडे राजस्थानी, गुजराती अशा पद्धतीच्या आणि दक्षिणेकडील दागिन्यांसारखे दागिने घडवून हवेत, अशी मागणी वाढली आहे. यासाठी सहा-सहा महिने ऑर्डर देऊन थांबण्याची ही तयारी ग्राहकाकडून होती. विशेषतः आगाऊ पैसे भरून हे दागिने सहा महिन्यांनंतर घेण्याची तयारी ग्राहकांची असते.
-------
दागिन्यांची रचना अशी
राणीहार
महाराष्ट्रीय मराठमोळ्या दागिन्यांमध्ये राणीहार सगळ्या हरांपेक्षा वेगळी शान आहे. हा हार घातल्यानंतर घालणाऱ्या महिलेचा गळा संपूर्ण भरल्यासारखा दिसतो. हार दोन किंवा तीन पदरी असतो. त्याच्या प्रत्येक पदराला बारीक बारीक नाजूक अशी नक्षीकाम असते. त्यामुळे हा हार घसघशीत दिसतो. लग्न समारंभात या हाराला मागणी आहे.
-
चपलाहार
चपट्या नाण्यांप्रमाणे गुंफलेला हा हार म्हणजेच चपलाहार, तर पुतळी आहारामध्ये चपटी नाणी लावल्यानंतर हा हार पृथ्वीच आपला हार बनतो.
-
कोल्हापुरी साज
नावातूनच कळेल की संपूर्ण कोल्हापुरी ठासून भरलेला दागिना आहे. यात वेगळ्या आकाराची पाने गुंफली आहेत. चंद्र, शंक, कासव आणि शुभशकुन गोष्टी अंतर्भूत आहेत.
-
बोरमाळ
या माळेमध्ये लहान बोराच्या आकारासारखे मनी गुंफलेले असतात. आज ग्रामीण भागामध्ये या बोरमाळेला सर्वाधिक मागणी आहे.
-
ठुशी
हा हार गळ्यालगत घातला जातो. त्यात बारीक मनी अक्षरशा ठासून भरलेले असतात. यात मोरनी ठुशी, साधी ठुशी असे प्रकार आहेत.
-
मोहनमाळ
तीन पदरी असलेल्या माळेमध्ये कंठहार, काशीतळी, गहूमाळ, चिताक, चपला कंठी, चाफेकळी, जोंधळी पोत, डोरले, तांदळी पोत आधी भरभरून समावेश असतो.
-----------------------
चौकट
कोल्हापुरातून खरेदी वाढली
कोल्हापूर सराफ संघाने कोरोना कालावधीनंतर कोल्हापुरातील रंकाळा, महालक्ष्मी मंदिर, न्यू पॅलेस, कोपेश्वर मंदिर, नृसिंहवाडी, जोतिबा, आदी पर्यटनस्थळांचे चित्रीकरण आणि त्याची क्लिप व्हायरल केली होती. ही क्लिप वर्ल्ड गोल्ड कौन्सिललाही सादर केली होती. यात कोल्हापुरात बनणारे दागिने आदींवर चित्रीकरण केले होते. त्यांचा फायदा होत आहे. त्यामुळे देशासह परदेशी पर्यटक कोल्हापुरात दागिना खरेदी करताना दिसत आहेत. विशेषतः पारंपरिक पद्धतीच्या दागिन्यांना मागणी अधिक आहे.
----------
कोट
पाश्चिमात्य पद्धतीच्या दागिन्यांना यापूर्वी मागणी होती. कोरोना कालावधीनंतर आणि हल्लीच्या लग्नांमध्ये नववधू आणि तिच्या पालकांकडून पारंपरिक जुन्या पद्धतीच्या दागिन्यांची मागणी वाढली आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलला कोल्हापुरातील पर्यटनस्थळांचं कोल्हापुरात बनवणाऱ्या दागिन्यांची चित्रफीत सराफ संघाने सादर केली होती. ही चित्रफीत जगभरात प्रसिद्ध झाली आहे. त्याचा फायदा कोल्हापुरातील सराफ व्यावसायिकांना होत आहे.
- राजेश राठोड, अध्यक्ष, कोल्हापूर सराफ संघ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

