

60679 एआय चित्र
किंवा
60681
--
जेथे झोपडी, तेच त्यांचे गाव
भटक्या-विमुक्तांचे स्थलांतरित आयुष्य; रोजच्या कमाईवर पेटते चूल, योजनांपासून दूर
--
लीड
विकासाच्या युगात प्रत्येकाचे एक गाव, घर व कायमचा पत्ता आहे. भटक्या-विमुक्त समाजातील अनेक कुटुंबांना अजूनही ‘आपले गाव कोणते?’ या प्रश्नाचे उत्तर देताना ‘जेथे झोपडी, तेच आमचे गाव’ असे सांगावे लागते. पोटाची खळगी भरण्यासाठी आठ-दहा महिने गावोगाव भटकंती, गावाबाहेर उभारलेली झोपडी किंवा पाल, रोज मिळणाऱ्या मजुरीवर पेटणारी चूल हेच त्यांच्या आयुष्याचे वास्तव आहे.
- संदीप खांडेकर
रोजगाराच्या शोधात
आठ-दहा महिने गावाबाहेर
काही समाज स्थिरावले असले तरी अनेक जातींतील कुटुंबांचे स्थलांतर आजही सुरू आहे. रोजगाराच्या शोधात अनेक कुटुंबे आठ-दहा महिने गावाबाहेर राहतात. शेत, गावाच्या कडेला किंवा मोकळ्या जागेत पाल, राहुटी अथवा झोपडी उभारली जाते. काही महिने काम, काही दिवसांची कमाई आणि पुन्हा पुढच्या गावाचा रस्ता, असे त्यांचे जीवनचक्र सुरू राहते.
-
रोज कमाई,
रोज चूल
अनेक कुटुंबांकडे अन्नधान्य साठवून ठेवण्याची परिस्थितीच नसते. आज काम मिळाले तर आजची चूल पेटते. काम मिळाले नाही तर उद्याची चिंता सुरू होते. हातावर पोट असलेल्या या कुटुंबांसाठी बचत, विमा, कर्ज, गुंतवणूक शब्द अजूनही दूरचे आहेत. सरकारी योजनांची माहिती नसणे, कागदपत्रांचा अभाव व कायमचा पत्ता नसल्याने अनेकांना योजनांचा लाभ घेणेही कठीण जाते. बँकेत कर्जासाठी गेल्यावर क्रेडिट इतिहास नसल्याने अडचणी येतात. व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असली तरी त्यासाठी लागणारे भांडवल उभे करणे मोठे आव्हान आहे.
१९६७ चा पुरावा आणायचा कुठून?
भटक्या-विमुक्त समाजातील अनेक कुटुंबांसमोर जात प्रमाणपत्र मिळविण्याचेही आव्हान आहे. काही जातींसाठी जुन्या नोंदी, कागदपत्रे किंवा १९६७ पूर्वीचा पुरावा मागितला जातो. मात्र, ज्यांच्या पिढ्या गावोगावी फिरत राहिल्या, ज्यांच्या पूर्वजांच्या नावावर घर-जमीन नव्हती, त्यांनी एवढ्या जुन्या काळातील कागदपत्रे आणायची कोठून?, हा प्रश्न कायम आहे. जात प्रमाणपत्राच्या अभावामुळे शिक्षण, शिष्यवृत्ती, नोकरी, आरक्षण आणि इतर शासकीय योजनांचे दरवाजे अनेकांसाठी बंदच राहतात. सततच्या स्थलांतरामुळे समाजाची अचूक लोकसंख्या निश्चित करणेही आव्हानात्मक ठरते. प्रत्येक जातीच्या स्वतंत्र बोलीभाषा, रुढी-परंपरा व सामाजिक व्यवस्था आहेत. आजही जातपंचायतीच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांवर निर्णय घेतले जातात.
--
मोबाईल आला; जगणे बदलले नाही
काळ बदलला. काही जातीतील तरुणांच्या हातात मोबाईल आला. पूर्वी संपर्कासाठी मैलोनमैल प्रवास करणाऱ्या या समाजाला आता फोनच्या माध्यमातून एकमेकांशी जोडले जाण्याची संधी मिळाली. लग्न, सण, रोजगार व इतर कारणांसाठी संपर्क साधणे सोपे झाले. मोबाईल हातात आला म्हणून कष्टाचे जगणे संपलेले नाही. बैलगाडी, पाल व डोक्यावरचे ओझे घेऊन निघालेला हा समाज आज दुचाकी, छोट्या वाहनांतून अथवा इतर साधनांनी स्थलांतर करतो. मोबाईलने त्यांच्यातील अंतर कमी झाले असले तरी दारिद्र्याचे अंतर तसेच आहे.
..........
दृष्टिक्षेपात
- भटक्या-विमुक्त समाजात एकूण जाती - ४८
- कायम स्थलांतरामुळे निश्चित लोकसंख्या मिळत नाही
- हेळवी, डवरी, गोसावी, कुडमुडे जोशी, वासुदेव, नंदीवाले, कडकलक्ष्मी, गोपाळ, डोंबारी, कोल्हाटी यांसारख्या जाती भटक्या समाजात
- पारधी, कंजारभाट, रामोशी, कैकाडी, कुचकोरवी आदी जाती विमुक्त समाजात
कोट
कंजारभाट समाजातील मुले शिक्षित होत असून, सरकारी सेवेत कार्यरत आहेत. जातीचा दाखला मिळविण्यासाठी तरुणांचा गट कार्यरत आहे. सरकारी योजनांचा लाभ मिळण्यासाठी मात्र समाजातूनच कोणी प्रयत्न करत नाही.
- शक्ती माटुंगे, माजी जिल्हाध्यक्ष, कंजारभाट समाज.
--
कोट
भटक्या समाजात शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प आहे. अजूनही काही जातींना भिक्षा मागून उदरनिर्वाह करावा लागतो. गाढवगोती सोनार मूर्ती तयार करतो. त्यांचे राहण्याचे ठिकाण मात्र स्थिर नाही.
- प्रा. विश्वनाथ शिंदे , माजी मराठी विभागप्रमुख, शिवाजी विद्यापीठ.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.