बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बातमी
बातमी

बातमी

sakal_logo
By

‘अलमट्टी’ उंचीप्रश्नी प्रतिकात्मक
जलसमाधी आंदोलनाचा इशारा

कुरुंदवाड, ता. २४ ः अलमट्टी धरणाची उंची ५१९ मीटरवरून ५२४ मीटर करण्याची तयारी कर्नाटक शासनाने सुरू केली आहे. महाराष्ट्र शासनाने अलमट्टी धरणाच्या या प्रस्तावित उंचीला विरोध करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातून स्थगिती घ्यावी, अन्यथा १८ फेब्रुवारीला घंटानाद व ११ मार्चला प्रतिकात्मक जलसमाधी आंदोलन करणार असल्याची माहिती निवृत्त उपअभियंता प्रभाकर केंगार यांनी पत्रकार बैठकीत दिली.
कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समिती व आंदोलन अंकुश यांच्यावतीने बोलविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कृष्णा महापूर नागरिक कृती समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील, ‘आंदोलन अंकुश’ चे धनाजी चुडमुंगे, जिल्हाध्यक्ष राकेश जगदाळे यावेळी उपस्थित होते.
केंगार म्हणाले, ‘राज्य सरकारने महापुराची कारणे शोधण्यासाठी वडनेरे यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समिती नियुक्ती केली. कोल्हापूर-सांगलीच्या महापुरास अलमट्टी धरण जबाबदार नाही, असा अहवाल त्यांनी दिला होता. नुकताच त्यांनी आपला अहवाल बदलत शासनाला अलमट्टीच्या बॅक वॉटरचा नव्याने अभ्यास करायची गरज असून अलमट्टी, हिप्परगी व नदीपात्रातील भराव महापुरास जबाबदार आहे, तसेच याचाही तांत्रिक अभ्यास करणे गरजेचे असल्याचे पत्राद्वारे राज्य सरकारला कळविले आहे. त्यामुळे या बाबीचा हायड्रॉलिक तंत्रज्ञानाने अभ्यास करण्यासाठी उत्तराखंडमधील रुरकी येथील संस्थेची राज्य सरकारने नेमणूक केली आहे. अहवाल येईपर्यंत कर्नाटक सरकारने उंची वाढवण्याचा निर्णय घेऊ नये, यासाठी राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून स्थगिती घ्यावी, अन्यथा १८ फेब्रुवारीला सर्व पूरबाधित गावात घंटानाद आंदोलन आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानदिनी ११ मार्चला पूरबाधित नागरिकांसह नृसिंहवाडी येथील कृष्णा पंचगंगा घाटावर प्रतिकात्मक जलसमाधी आंदोलन करण्यात येईल.’