पंचगंगा प्रदुषण

पंचगंगा प्रदुषण

04413
...
पंचगंगा नदी प्रदूषणप्रश्नी अधिकारी धारेवर
तेरवाड बंधाऱ्यावर वादावादी : न्यायालयीन लढा देण्याचा इशारा
कुरुंदवाड, ता. १४ : पंचगंगा नदी प्रदूषणप्रश्नी सद्य:स्थितीचा अहवाल तयार करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यां‍ना आज पंचगंगा नदी प्रदूषणविरोधी आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यावेळी आंदोलकांनी प्रश्नांची सरबत्ती करीत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. वादावादी, अंगावर धावून जाण्याच्या प्रकाराने तेरवाड बंधाऱ्यावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. बंधाऱ्या‍च्या परिसरात राहणाऱ्या‍ महिलांनीही अधिकाऱ्यां‍ना प्रदूषणप्रश्नी जाब विचारला. नेहमीप्रमाणे अधिकाऱ्यां‍नी वरिष्ठांना अहवाल पाठवतो, असे जुजबी उत्तर दिले. तर आंदोलकांनी याबाबत आता न्यायालयीन लढा देण्याचा इशारा दिला.
पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून, याबाबत प्रजासत्ताक संस्था (कोल्हापूर)चे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायालयात पंचगंगा नदीची सद्य:स्थिती कशी आहे, याचा अहवाल सादर करण्यासाठी आज प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी सचिन हरबट, इचलकरंजी महानगर पालिकेचे कार्यकारी अभियंता एम. एस. देशपांडे, शिरोळचे नायब तहसीलदार योगेश जमदाडे तेरवाड बंधाऱ्यावर पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी प्रजासत्ताक संस्थेचे दिलीप देसाई, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बंडू पाटील, विश्वास बालिघाटे, विद्याधर कुलकर्णी, दीपक पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी पाहणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यां‍ना आंदोलकानी अक्षरशः धारेवर धरले. ‘पंचगंगा नदी प्रदूषणाला जबाबदार असणाऱ्या‍ इचलकरंजी महानगरपालिका व औद्योगिक वसाहतीतून सांडपाणी सोडण्यात येते. त्यांच्यावर कारवाई करणार की नाही की झोपेचं सोंग घेणार? असा प्रश्न उपस्थित करीत स्वाभिमानीचे बंडू पाटील व विश्वास बालिघाटे यांनी इचलकरंजी महानगरपालिका आयुक्तांना इथे बोलवा व वस्तुस्थिती दाखवा. कार्यकारी अभियंता देशपांडेंना काय अधिकार आहेत?’ असा प्रश्न उपस्थित केला. त्याच दरम्यान अहवालावर सही करणार नाही, अशी भूमिका देशपांडे यांनी घेतल्यानंतर देसाई, पाटील व आंदोलक संतप्त झाले. सही करणार नसाल तर कशाला आलाय? काय करायचे ते आम्ही बघतो, असे सुनावले.
प्रत्येकवेळी पाण्याचे नमुने घेऊन जाता. अहवाल पाठवतो, कारवाई करतो म्हणता. मग, किती वेळा कारवाई केली? चौकशी अहवालाचा फार्स कशासाठी? असा प्रश्न प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या क्षेत्र अधिकाऱ्यां‍ना करण्यात आला. शेवटी अहवालात वस्तुस्थिती मांडण्याचा आग्रह आंदोलकांनी धरला. त्यावरूनही शाब्दिक चकमक उडाली.
...
एक दिवस इथे थांबून दाखवा ...
अधिकाऱ्यांचे पथक बंधाऱ्या‍वर आल्याचे पाहून बंधारा परिसरातील पाणदारे मळ्यातील महिला संतापून आल्या व प्रदूषणप्रश्नी अधिकाऱ्यां‍ना जाब विचारुरू लागल्या. ‘वर्षानुवर्षे आम्ही इथे राहतोय. दूषित पाणी, दुर्गंधी व मृत माशांचा खच या सगळ्यांचा त्रास आम्हाला होतो. तुम्ही एक दिवस इथे थांबून दाखवा. मग, काय त्रास असतो ते तुम्हाला समजेल’, असे सुनावले. अचानक आलेल्या महिला व त्यांच्या प्रश्नावर अधिकारी निरुत्तर झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com