सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेले गाव

सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेले गाव
Published on

01958; 01959

पट्टी ः श्री हनुमान यात्रा विशेष, कोतोली (ता. पन्हाळा)

सामाजिक, सांस्कृतिक
वारसा लाभलेले कोतोली

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पन्हाळा किल्याच्या पश्चिमेस व पश्चिमेकडून दक्षिणेकडे वळसा घालत आलेल्या कासारी नदीच्या उत्तरेस असणारे आणि निसर्गसंपन्न वारसा लाभलेले गाव म्हणजे कोतोली होय. याच कोतोलीची श्री हनुमान चैत्र यात्रा शनिवारी (ता. २५) व रविवारी (ता. २६) होत आहे. त्यानिमित्त...
------------------

पन्हाळा तालुक्यातील बाजारपेठेचे मुख्य ठिकाण असलेले हे गाव तालुक्यात आदर्श गाव म्हणून ओळखले जाते. गावात प्रवेश करताना मोठ्या प्रमाणात विकसित झालेली बाजारपेठ गावाच्या लौकिकात भर टाकते. कोतोलीत मिळणाऱ्या शिक्षणाच्या मूलभूत सुविधा आणि जोडीला शेतीतील आधुनिक प्रगती या गोष्टींमुळे गावाच्या अर्थकारणाला दिशा मिळाली आहे. त्यामुळे बाजारपेठ, टोलेजंग इमारती, मोठमोठे टॉवर, सुसाट धावणाऱ्या गाड्या, माणसांची गर्दी अशी अनेक कारणे गावाला शहरीकरणाची जाणीव करून देत आहेत.

मंदिरे आणि सांस्कृतिक वारसा

पन्हाळा तालुक्यातील सर्वात मोठे गाव अशी जरी गावाची ओळख असली तरीही गावाला सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा पूर्वीपासून आहे. गावात छोटी-मोठी अनेक मंदिरे असून हनुमान ग्रामदैवत आहे. येथे रोज पहाटे होणाऱ्या पूजेवेळी मंदिरात ग्रामस्थ आवर्जून उपस्थित असतात. संध्याकाळी नियमित होणारी आरती, वारकऱ्यांचे नित्य पाठ न चुकता होतात. मंदिरात श्रावण व नाथषष्ठीला ज्ञानेश्वरी पारायण होते. यामध्ये होणाऱ्या काकडारती, हरिपाठ, भजन, कीर्तन सोहळ्यात सर्वजण सहभागी होतात.
दरवर्षी ग्रामदैवत हनुमानाची यात्रा उत्साहात होते. अक्षय्यतृतीयेनंतर येणाऱ्या पहिल्या शनिवारी यात्रा भरवण्याचा रिवाज पूर्वीपासून आहे. गावाबद्दल अनेक आख्यायिका आहेत, राजदरबारी कोतवाल या गावचे असावेत अशी मते काहींची मते आहेत म्हणून गावाला कोतोली असे नाव पडले असावे. श्री हनुमानाची मूर्ती ज्या वस्तीत सापडली त्या वस्तीला आजही हनुमंतवाडी असे संबोधले जाते. काही वर्षापूवी सापडलेल्या जुन्या प्राचीन मूर्ती आणि ग्रामदैवत हनुमानाची स्वयंभू मूर्ती ही समर्थ रामदासाच्या काळातील असाव्यात; असाही मतप्रवाह आहे.
मंदिरामागे पुरातन दगडी गुंड आहे. ही गुंड जो कोणी कोणाचा आधार न घेता खांद्यावर घेईल त्याला मानाचा फेटा बांधला जातो. त्यामागे श्री हनुमंताच्या भूमीत बलवान तरुणाची मांदियाळी निर्माण व्हावी; असा उद्देश असावा. तीन पिढ्या अभिमानाने ही गुंड उचलली; असा अभिमान बाळगणारे धुळाप्पा शेलार यांच्यासह शेलार, चौगुले, पाटील असे अनेक परिवार आहेत. अलीकडे तरुण पैलवानही गुंड उचलण्याचा प्रयत्न करतात.

गावाचा आठवडी बाजार
गावाचा आठवडी बाजार मंगळवारी भरतो. कोतोली परिसरातील शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी करण्यासाठी हे हक्काचे ठिकाण आहे. आठवडी बाजाराचीही आख्यायिका आहे. गावाला किल्ले पन्हाळगडाचे सान्निध्य लाभल्यामुळे तरुण शिलेदार शिवरायांच्या स्वराज्यात सेवेत असावेत. कारण अनेकांच्या घरात जुन्या तलवारी आणि दांडपट्टे ही हत्यारे आहेत. गावातील पट्टेवाले यांच्या घरातील तरुण दांडपट्ट्याचे थरारक सादरीकरण करताना राजर्षी शाहू महाराजांनी पाहिले होते. त्यावेळी महाराजांनी त्याचे कौतुक करताना बक्षिसी मागायला सांगितली. तेव्हा त्या तरुणाने बक्षीस म्हणून काहीही न मागता आठवडी बाजार मागितला होता. तेव्हा महाराजांनी आठवडी बाजार भरवावा; असे आदेश दिले, आणि गावाचा आठवडी बाजार सुरू झाला.

बारा बलुतेदार
कोतोलीत बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार वर्षानुवर्षे गुण्यागोविंदाने नांदत आहेत. मातीची कलाकुसरीची भांडी तयार करणारा कुंभार समाज, नाभिक समाज, सुतार समाज असे अनेक समाजबांधव काळानुसार व्यवसायाला आधुनिक जोड देत आहेत. येथील सुतार कारागिरीला पूर्वी समाजमान्यता लाभली होती. शेती अवजारांबरोबर कधीकाळी बैलगाडी व्यवसाय जिल्ह्यात प्रसिद्ध होता. सुतार समाजाने वस्तूविनिमय पद्धतीने बलुतेदारीच्या परंपरेत अनेक पिढ्या व्यवसाय जपले आहेत. अलीकडे पुढच्या पिढ्यांनी व्यवसाय आधुनिक जगाशी संधान साधून बदल केले आहेत. एक्स्पोर्ट क्वालिटीचे फर्निचर सुतार कारागीर करत असून त्यांनी तयार केलेल्या फर्निचरला जिल्ह्यात मागणी वाढत आहे.

शैक्षणिक सुविधा
येथील शिक्षणाच्या सुविधाही चांगल्या आहेत. तीन माध्यमिक शाळा, ज्युनिअर कॉलेज, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यलय, संगणक वर्ग असा मोठा विस्तार झाला आहे. शिक्षणाचा पाया खऱ्या अर्थाने रचला गेला तो मराठी शाळेत. शंभर वर्षापूर्वी जीवनपयोगी शिक्षण देणारी ‘जीवन शिक्षण विद्यामंदिर’ निर्माण झाली आणि या भूमीत शिक्षणाचा पाया रचला गेला. या शाळेने अनेक सुपुत्र गावाला दिले आहेत. या शाळेत शिकलेले अनेक विद्यार्थी वकील, प्राध्यापक, उद्योजक, क्रीडाधिकारी, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू, सनदी अधिकारी अशा विविध पदांवर कार्यरत आहेत.
काळाच्या ओघात या कौलारू शाळेनेही बदल स्वीकारला असून एम्पथी फाउंडेशनच्या माध्यमातून शाळेचा कायापालट झाला आहे. प्रयोगशाळा, ग्रंथालय, खेळाचे मैदान अशा सुविधा आहेत. मराठी शाळेबरोबर जनता शिक्षण संस्थेचे नेहरू विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज गावाचे भूषण आहे. बाबासाहेब पाटील हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आणि ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळ, माळवाडी यांचे श्रीपतराव चौगुले आर्टस् आणि सायन्स कॉलेज, विधी कॉलेज अशा शैक्षणिक सुविधा येथे आहेत. या शैक्षणिक संस्थांतून शिकलेले विद्यार्थी अनेक क्षेत्रांत काम करत आहेत.

पतसंस्थांचे जाळे
कोतोलीत १९८० नंतर सहकार चळवळ रुजायला सुरुवात झाली. काही प्रतिष्ठीत लोकांनी पतसंस्थांची उभारणी केल्याने गावकऱ्यांच्या हाती पैसा येऊ लागला. समाजकारण आणि एकता टिकवून ठेवण्याचे काम श्रीपती अर्जुना पाटील, बंडोपंत खांडेकर, गोपाळ जोशी, महादेव जोशी, संगाप्पा सरुडकर, दादासाहेब चौगुले, जयसिंग पाटील अशा अनेक ज्येष्ठांनी केले. त्यांच्या विचारांचा वारसा डी. जी. पाटील, बळवंत पाटील यांनी पुढे सुरू ठेवला आहे. गावात ५५ पेक्षा अधिक सहकारी संस्था आहेत. विशेष म्हणजे गावात तंटा निर्माण होऊ नये म्हणून सामंजस्याने सहकारी संस्थांचा कारभार सुरू आहे.

क्रीडा परंपरा
कोतोलीला कुस्तीची मोठी परंपरा आहे. पैलवान सरदार पाटील, सुरेश चौगले, अरुण पाटील, प्रसाद लव्हटे, राज माने, गब्बर शेलार, कृष्णात फिरींगे, शुभम मस्कर, रघुनाथ फिरींगे यासारख्या अनेक पैलवानांनी गावचे नाव आखाड्यात उज्ज्वल केले आहे. श्रावणी लव्हटेसारख्या मुलीदेखील कुस्तीत नाव कमवत आहेत. गावात राजर्षी शाहू महाराज यांच्या नावाने कुस्ती संकुल निर्माण झाले आहे. कुस्तीबरोबर इतर खेळांनाही मोठा प्रतिसाद आहे. आप्पालाल आत्तार, रवी लव्हटे, सागर वरपे यांच्यासारख्या खेळाडूंच्या मार्गदर्शनात केपीएल, केसीएलसारख्या स्थानिक क्रिकेट लीग स्पर्धा आयोजित केल्या जात असून यातून अनेक गुणवंत खेळाडू निर्माण होत आहेत. खो-खो आणि कबड्डीसारख्या व्यावसायिक स्पर्धांचेही आयोजन केले जाते.

आध्यात्मिक वारसा
आदर्श गाव निर्माण करायचे झाले तर तेथील पिढ्या निर्व्यसनी, सात्विक आणि विवेकशील असाव्या लागतात. हाच वसा वारकरी संप्रदायाने अनेक दशके जपला आहे. स्व. डॉ. नामदेव कळंत्रे सारख्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाने गावाला अध्यात्मिक अधिष्ठान दिले आहे. त्यातून वारकरी संप्रदाय वाढत असून गावात गेली अनेक वर्षे पारायणे होत आहेत. नियमित महाआरती आणि एकादशीला होणारे प्रवचन आणि कीर्तन हा सांस्कृतिक ठेवा नव्या पिढीला भक्तीची वाट जतन करायला सांगत आहे. भूपाल गांजवे, डॉ. संदीप कळंत्रे भागवत संप्रदायाचा अनमोल ठेवा सेवाभावीपणाने जतन करत आहेत.

सामाजिक, राजकीय
येथे मराठा समाजासह सुतार, कुंभार, बहुजन, वैश्य, मुस्लिम मोठ्या प्रमाणात आहे. गावात विविध जाती-धर्मांतील लोक असले तरीही कधीही भांडण तंटा किंवा कलह झालेला नाही. निवडणुकांच्या काळात राजकीय रणधुमाळीत जिल्ह्याचे लक्ष कोतोलीकडे असते; पण येथे एकोप्याने आणि सामंजस्याने निवडणूक लढवली जाते. डी. जी. पाटील, बळवंत पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर पाटील, माजी सरपंच प्रकाश पाटील, सुभाष पाटील, सज्जन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या पिढीतील अनेक तरुण राजकारणात सक्रिय आहेत. सरपंच वनिता प्रकाश पाटील आणि जिल्हा परिषद सदस्या वर्षाराणी अरुण पाटील यांच्याकडून अनेक विकासकामे सुरू आहेत. गावाचा विकास होताना गावपण कुशलतेने सांभाळत वाद आणि कलह यांना वेशीबाहेर ठेवून सर्वांच्या भल्यासाठी सदैव कार्यरत राहणाऱ्या कोतोलीचा आदर्श घेतला तर प्रत्येक गावात नंदनवन निर्माण होईल.

पुरवणी संकलन
संग्राम रंगराव पाटील, तिरपण-कोतोली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com