रेडिमेडच्या जमान्यात टेलरिंग व्यवसायाला घरघर

रेडिमेडच्या जमान्यात टेलरिंग व्यवसायाला घरघर

रेडिमेडच्या जमान्यात टेलरिंग व्यवसायाला घरघर

तरुणाईची क्रेझ, शिवणकामचे वाढलेले दर, ऑनलाईन शॉपिंगमुळे फटका

रमेश पाटील ः सकाळ वृत्तसेवा
म्हाकवे, ता. ८ : रेडिमेड कपड्यांच्या जमान्यात कपडे शिवून देणारा टेलर व्यवसाय अडचणीत आला आहे. खास करून तरुणवर्गात निर्माण झालेली क्रेझ आणि त्यात ऑनलाईन घरपोच शॉपिंगची पडलेली भर, शिवणकामचे वाढलेले दर यामुळे टेलरांच्या आयुष्याचे धागे उसवू लागले आहेत. आता बचत गटातील महिला आणि जुनी कपडे शिवण्यासाठीच घरगुती शिलाई यंत्राचा वापर होत आहे. वृद्ध तसेच नेतेमंडळींना अपवादात्मक परिस्थितीत कपडे शिवून घ्यावे लागतात.
पूर्वी घरात कोणताही कार्यक्रम अथवा सण असो, महिनाभर अगोदर दुकानातून कापड खरेदी करून टेलरकडे जाऊन माप देऊन २० ते ३० दिवसांची मुदत घेऊन कपडे शिवून घ्यावी लागत असे. यावेळी टेलरसुद्धा भाव खाऊन जात असे. लग्नसराई आणि दिवाळीला टेलर मिळत नसे. त्यावर अनेक कुटुंबांचा उदारनिर्वाह चालत होता. पूर्वी तर बलुतेदारी पद्धतीवर कपडे शिवण्याची प्रथा होती. त्यावर सुई, दोरे, बटन विकणारे व शिलाई मशीन दुरुस्ती करणारे असे व्यवसायही तेजीत चालत असत.
परंतु परिस्थिती बदलली आणि आता रेडिमेड कपड्यांच्या जमान्यात टेलरकडे खासकरून तरुणाईने पाठ फिरवल्याचे चित्र आहे. ऑनलाइनमुळे रेडिमेड कपड्यांकडे ग्राहकांचा कल वाढू लागला आहे. टेलरिंग व्यवसाय अडचणीत येऊ लागल्याने पुढे करायचे काय, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. साठ वर्षांच्या पुढील व्यक्ती टेलरकडून केवळ शर्ट शिवून घेतात. कारण त्यांना धोतर पान रेडिमेड मिळते. त्याखालोखाल सरकारी नोकरी आणि खासगी कंपनीत काम करणारेही विशेषकरून रेडिमेड कपडे वापरतात. त्यामुळे टेलर व्यवसायाला घरघर लागली आहे.
आता केवळ काही अधिकारी आणि नेतेमंडळी टेलरकडून कपडे शिवून घेतात. शाळेचे गणवेश व महिलांची काही कपडे टेलर शिवताना दिसतात. याशिवाय फॅशन डिझायनिंगच्या नावाखाली काही मुली या व्यवसायाकडे वळल्यामुळे त्याला थोडेसे आधुनिक स्वरूप आले आहे.
....
कोट....
जुन्या पिढीतील टेलरच्या हाताखाली विनामोबदला शिवणकामाचे प्रशिक्षण घेतले जात असे. काज, बटन लावण्यापासून ते कापड कापण्यापर्यंत असे हे प्रशिक्षण होते. नंतर प्रशिक्षण घेतल्यानंतर युवा पिढीतील तरुणांनी स्वतःचे दुकान थाटले. ही पिढी आता प्रशिक्षण घेणारी अखेरची पिढी असल्याची दिसून येत आहे. राज्य सरकार कलावंत, वृद्ध व अन्य गरजवंतांना मासिक मानधन देते. परंतु टेलरचा यात विचार केल्यास त्यांना उतारवयात आधार मिळेल.
राजाराम कांबळे, टेलर, गोरंबे
........

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com