संगणकीकृत सातबारामधील त्रुटींमुळे शेतकरी हतबल
संगणकीकृत सातबाराचा फोटो वापरणे...
.............
संगणकीकृत सातबारामधील त्रुटींमुळे शेतकरी हतबल
मानसिक त्रासाबरोबर आर्थिक भुर्दंड ः तलाठी, तहसील कार्यालयाकडे हेलपाटे
रमेश पाटील ः सकाळ वृत्तसेवा
म्हाकवे, ता. १९ : संगणकीकृत सातबारा होऊन नऊ वर्षे उलटली. मात्र, शेतकऱ्यांना संगणकीय सातबारामधील त्रुटींचा त्रास थांबता थांबेना. सर्वसामान्य शेतकरी संगणकृत सातबारावरील त्रुटीसाठी तलाठी, तहसील कार्यालयाकडे अर्ज, विनंती, अहवाल, पडताळणी, विनासुनवणी, सुनावणी, नोटीस या फेऱ्यांमुळे हतबल झाला आहे. संगणकीकृत सातबारा करताना अधिकाऱ्यांच्या केलेल्या चुकीचा शेतकऱ्यांना मनःस्ताप होण्याबरोबरच आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. संगणकीकृत सातबारामुळे शेतकऱ्यांची सोय कमी आणि गैरसोय अधिक अशी स्थिती निर्माण झाली आहे.
राज्यात सर्वत्र २०१६ मध्ये सातबारा संगणकीकृत मोहीम राबविण्यात आली आणि घरबसल्या शेतकऱ्यांना सातबारा मिळू लागला. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात सोय झाली. डिजिटल सातबारा मिळू लागल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होऊ लागले. मात्र, नंतर सातबारामध्ये असलेल्या त्रुटी लक्षात आल्यानंतर अनेक शेतकऱ्यांच्या पायाखालची वाळूच सरकू लागली. शेतकरी अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे धाव घेऊ लागले. शेतकरी या त्रुटी दूर करण्यासाठी तहसील कार्यालयाकडे हेलपाटे मारत आहेत. सातबारावरील त्रुटी दूर करण्यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण करीत आहेत. तरीही त्या दूर होत नाहीत. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या भेटी घेऊन, प्रयत्न करून त्रुटी दूर होत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. काही शेतकऱ्यांच्या त्रुटी दूर झाल्या आहेत. त्रुटी दूर करण्यासाठी लागणारी कागदपत्रे द्या, अर्ज करा, यांना भेटा, त्यांना भेटा अशी कारणे सांगितली जात आत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९६६ कलम १५५ नुसार तहसीलदार यांच्याकडून चूक दुरुस्ती आदेश काढले जातात. मात्र, त्रुटी दूर करण्याची प्रक्रिया शेतकऱ्यांना त्रासदायक ठरत आहे.
...............
चौकट :
अशा आहेत संगणकीकृत त्रुटी....
संगणकावरील सातबारावर नाव कमी करताना दुसऱ्याचे नाव लागणे, फेरफारमध्ये दुसऱ्याच्या फेरफारवर लावून नाव कमी करणे, सातबाराचा वर्ग बदलला, क्षेत्र बदलले, फेरफार नंबर बदलले, गट नंबर, सातबारावरील नावेच गायब झाली, वारसा गायब झाले, वारस लावताना एकट्याचेच नाव वारस लागले, इतर वारसांची नावे लागलेली नाहीत, खातेफोड केली नसताना आदेश देण्यात आले, पूर्वीप्रमाणे क्षेत्र योग्य नसणे, नावात फरक असणे, एकाच व्यक्तीची दोन खाती होणे, अक्षर फरकामुळे गोंधळ असणे, जमीन किती आहे याची माहिती न होणे, ऑफलाईन बुकात नाव आहे, ऑनलाईनला नाव नसणे, चुकीची नावे असणे, सातबाराला नावच नसणे.
.......
कोट...
शेतकऱ्याच्या संगणकीकृत सातबारामध्ये त्रुटी असतील तर जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १५५ नुसार तहसीलदार यांच्याकडून चूक दुरुस्ती आदेश काढले जातात. या आदेशान्वये शेतकऱ्यांचा संगणकीय सातबारा दुरुस्त केला जातो.
- दिगंबर कांबळे,
ग्राम महसूल अधिकारी म्हाकवे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.