पन्हाळा तालुक्यातील १०७ सरपंच मानधनात वाढ
निर्णय झाला; पण, अंमलबजावणीची प्रतीक्षा
सरपंच-उपसरपंच मानधनवाढ ः पन्हाळा तालुक्यातून मागणी; उपसरपंचही प्रतीक्षेत
सकाळ वृत्तसेवा
माजगाव, ता. ९ ः ग्रामीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारे सरपंच आणि उपसरपंचांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पन्हाळा तालुक्यातील १११ पैकी १०७ सरपंच व उपसरपंचांना मानधनवाढीचा लाभ होईल. चार ग्रामपंचायतींची मुदत संपल्याने तेथे प्रशासक नियुक्त आहे. वाढीव मानधनाची अंमलबजावणी त्वरित करावी, अशी मागणी होत आहे.
ग्रामसभा बोलावणे, अध्यक्ष म्हणून सभेचे कामकाज पार पाडणे, सभेतील पारित ठरावांची अंमलबजावणी, ग्रामपंचायतीच्या मालकीच्या मालमत्ता सुरक्षित असल्याची खात्री करणे, जमा-खर्चाचे विवरण व अंदाजपत्रक तयार करण्याची व्यवस्था करणे अशी जबाबदारी सरपंच पार पाडतात. यावेळी सरपंचांना पदरमोडही करावी लागते. सरपंच. उपसरपंचांना मिळणारे मानधन तुटपुंजे आहे. मानधनवाढीची मागणी सरपंच संघटना अनेक वर्षे करत होत्या. या अनुषंगाने ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या २ हजारपर्यंत आहे; त्या सरपंचाचे मानधन ३ हजारवरून ६ हजार केले. उपसरपंचांचे मानधन १ हजारवरून २ हजार केले आहे. पन्हाळा तालुक्यात १११ पैकी ९५ गावांची लोकसंख्या २ हजारच्या आत आहे. या ९५ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंचांचे मानधन दुप्पट म्हणजे ३ हजारवरून ६ हजार होईल. ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या २ हजार ते ८ हजारपर्यंत आहे त्या सरपंचाचे मानधन ४ हजारवरून ८ हजार तर उपसरपंचाचे मानधन दीड हजारवरून ३ हजार रुपये झाले आहे. तालुक्यात १५ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंचांचे मानधन दुप्पट झाले आहे. ज्या ग्रामपंचायतींची लोकसंख्या ८ हजारपेक्षा जास्त आहे त्या सरपंचाचे मानधन ५ हजारवरून १० हजार, तर उपसरपंचाचे मानधन २ हजारवरून ४ हजार करण्याचा निर्णय झाला आहे. तालुक्यात केवळ, एक ग्रामपंचायत ८ हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली आहे. या सरपंचाचे मानधन १० हजार, उपसरपंचांचे मानधन चार हजार झाले आहे.
....चौकट...
चार ठिकाणी प्रशासक
प्रशासक असलेल्या ग्रामपंचायती तालुक्यातील बोरपाडळे, वाडी रत्नागिरी, पिसात्री, काळजवडे या चार ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे. तिथे प्रशासक म्हणून विस्तार अधिकाऱ्यांची निवड झाली आहे.
....कोट...
गावगाडा सांभाळणाऱ्या सरपंच व उपसरपंच यांच्या मानधनात शासनाने दुपटीने वाढ केली आहे. या निर्णयामुळे सरपंच व उपसरपंच अजून जोमाने काम करतील. मानधन वाढीबरोबरच सरपंच व उपसरपंचांना पेन्शन द्यावी.
- नवनाथ पाटील, उपसरपंच, पडळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

