

02955
मलकापूरला ४० टक्केच करवसुली
अकरा महिन्यांतील चित्र; उर्वरित वसुलीसाठी महिन्याचीच मुदत
सकाळ वृत्तसेवा
मलकापूर, ता. १९ ः अकरा महिन्यांत येथील नगरपालिकेची कर वसुली अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. घरफाळा व पाणीपट्टीची केवळ ४० टक्के कर वसुली झाली आहे. एकूण ९८ लाख ८४ हजारपैकी ३९ लाख ५३ हजार वसुली झाली. उर्वरित ५९ लाख ३० हजारांची वसुली मार्चअखेर म्हणजे अवघ्या महिन्यात पूर्ण करण्याचे आव्हान पालिका प्रशासनासमोर आहे. करवसुली विभागाचा नियोजनशून्य कारभार याला जबाबदार आहे.
येथे सुमारे तेराशे मालमत्ता आहेत. त्यांच्या घरफाळा व पाणी पट्टीच्या करातून पालिकेला वार्षिक सुमारे एक कोटीचे उत्पन्न मिळते. चालू वर्षाचे ८२ लाख २३ हजार व मागील थकीत १६ लाख ६१ हजार असे एकूण ९८ लाख ८४ हजार रुपयांचे उत्पन्न यावेळी पालिकेला मिळणार आहे. मात्र स्वउत्पन्नाचे एकमेव स्त्रोत असणाऱ्या या करवसुलीकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष असते. कर वसुलीच्या नियोजनाचा अभाव याला कारणीभूत आहे. नागरिकांकडून पालिकेला करवसुलीसाठी नेहमीच मोठे सहकार्य असते. मात्र मालमत्ताधारकांना करांची बिलेच वेळेत दिली जात नाहीत. प्रतिवर्षी डिसेंबर, जानेवारीत बिले दिली जात आहेत. परिणामी वसुलीअभावी पालिकेच्या स्वफंडात खडखडाट असतो. त्यामुळे दैनंदिन खर्च भागवताना पालिका प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागते. गेल्या सप्टेंबर ते डिसेंबरदरम्यानच्या काळात पालिका फंडात पूर्णतः खडखडाट होता. या काळात पालिकेने दिलेले तीन अंकी रकमेचे धनादेश न वटल्याने दंड भरण्याची नामुष्की पालिकेवर आली होती. पालिकेला विविध साहित्य पुरविणारे वसुलीसाठी फेऱ्या मारत होते. देणी भागवण्यासाठी वारंवार त्यांना पुढच्या तारखा दिल्या जात होत्या.
चौकट
यंत्रणा सुस्तावलेलीच
पालिकेतील कर्मचाऱ्यांना पालिका फंडातून दीपावलीसाठी बोनस दिला जातो. मात्र यावेळी पालिका फंडात पैसे नसल्याने चाळीस कर्मचाऱ्यांनी उठाव करताच अवघ्या आठवडाभरात १२ लाख रुपयांची वसुली करणेबाबतची तत्परता कर विभागाने दाखवली होती. त्यानंतरही वसुलीमध्ये सातत्य राहिले नाही. त्यामुळेच अकरा महिन्यांत केवळ ४० टक्केच वसुली झाल्याचे दिसते. जिल्हाभर सर्वत्र कर वसुलीसाठी मोहिमा राबवल्या जात असताना येथे मात्र अद्यापही करवसुलीची यंत्रणा सुस्तावलेलीच दिसते आहे.
कोट
सध्या ४० टक्के करवसुली झाली आहे. उर्वरित कर वसुलीसाठी वीस कर्मचाऱ्यांची पाच पथके तयार केली आहेत. वसुलीची धडक मोहीम राबवून मार्चअखेर शंभर टक्के वसुली करणार
आहोत. जप्ती किंवा नळतोडणी करण्यापूर्वी कर भरण्याचे सहकार्य नागरिकांनी करावे.
-हृषीकेश पाटणकर, कर प्रशासकीय अधिकारी, मलकापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.