भारतीय महिला क्रिकेट संघ उपांत्य फेरीत (टी-२० विश्‍वकरंडक)

भारतीय महिला क्रिकेट संघ उपांत्य फेरीत (टी-२० विश्‍वकरंडक)

भारतीय महिला सलग
तिसऱ्यांदा उपांत्य फेरीत
आयर्लंडविरुद्ध डकवर्थ लुईसनुसार पाच धावांनी विजय
सेंट जॉर्ज पार्क, ता. २० ः भारतीय महिला क्रिकेट संघाने सलग तिसऱ्यांदा टी-२० विश्‍वकरंडकाची उपांत्य फेरी गाठली. पावसाच्या व्यत्यय आलेल्या सामन्यात भारताने गट दोनमधील अखेरच्या साखळी फेरीच्या लढतीत आयर्लंडवर डकवर्थ लुईस नियमानुसार पाच धावांनी निसटता विजय मिळवला. यामुळे भारतीय संघाने या गटामधून इंग्लंडसह उपांत्य फेरी गाठली हे विशेष. अवघ्या ५६ चेंडूंमध्ये ८७ धावांची खेळी साकारणारी स्मृती मानधना ही सामन्याची मानकरी ठरली.
भारताकडून आयर्लंडसमोर १५६ धावांचे आव्हान उभे ठाकले. पण धावांचा पाठलाग करताना आयर्लंडने अवघ्या एका धावेत दोन फलंदाज गमावले. एमी हंटर धावचीत झाली आणि रेणूका सिंगने ओर्ला प्रेनडेरगास्ट हिला शून्यावरच पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. गॅबी लेविस व लॉरा डेलनी या जोडीने आयर्लंडसाठी ५३ धावांची भागीदारी रचली. दोन्ही खेळाडूंनी भारतीय गोलंदाजांचे आव्हान परतवून लावले. लेविसने २५ चेंडूंमध्ये नाबाद ३२ धावांची आणि डेलनी हिने २० चेंडूंमध्ये नाबाद १७ धावांची खेळी केली. दोघांची जोडी स्थिरावून धावफलक पुढे नेत आहे असे वाटत असतानाच वरुणराजाचे आगमन झाले. आयर्लंडच्या संघाने त्यावेळेस ८.२ षटकांत २ बाद ५४ धावा केल्या होत्या. त्यानंतर खेळ पुन्हा सुरु होऊ शकला नाही.
५९ धावा हव्या होत्या
पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबला तेव्हा आयर्लंडने ८.२ षटकांत २ बाद ५४ धावा केल्या होत्या. त्यानंतर खेळ होऊ शकला नाही. आयर्लंडने या दरम्यान २ विकेट गमावले होते. त्यामुळे विजयासाठी आयर्लंडला ५९ धावांची आवश्‍यकता होती. त्यांचा संघ ५ धावांनी मागे होता. अखेरीस जय - पराजय यामध्ये हेच अंतर महत्त्वाचे ठरले.
स्मृती मानधनाची धडाकेबाज खेळी
याआधी भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सेंट जॉर्ज पार्क येथील लढतीत सोमवारी जोरदार वारे वाहू लागले होते. त्यामुळे फलंदाजी करायला थोड अवघड जात होते. मात्र स्मृती मानधना हिने सुरुवातीला शेफाली वर्मासोबत ६२ धावांची भागीदारी रचली. त्यानंतर स्मृती मानधना हिने स्वबळावर भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. तिने ५६ चेंडूंमध्ये ९ चौकार व ३ षटकारांसह ८७ धावांची खेळी साकारली. भारताने २० षटकांत ६ बाद १५५ धावा फटकावल्या.

संक्षिप्त धावफलक ः भारत - २० षटकांत ६ बाद १५५ धावा (शेफाली वर्मा २४, स्मृती मानधना ८७ - ५६ चेंडू, ९ चौकार, ३ षटकार, हरमनप्रीत कौर १३, जेमिमा रॉड्रिग्ज १९, ओर्ला प्रेनडेरगास्ट २/२२, लॉरा डेलनी ३/३३) डकवर्थ लुईस नियमानुसार विजयी वि. आयर्लंड ८.२ षटकांत २ बाद ५४ धावा (एमी हंटर १, गॅबी लेविस नाबाद ३२, लॉरा डेलनी नाबाद १७, रेणूका सिंग १/१०).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com