शिये अत्याचार प्रकरणी वेगळीच माहिती पुढे आली ; दूसरा संशयितच मुख्य आरोपी असण्याची शक्यता
दोन्ही संशयितांनी दिली गुन्ह्याची कबुली
शिये चिमुकली अत्याचार प्रकरण ः पोलिसही चक्रावले, मूळ आरोपीबाबत प्रश्नचिन्ह
सकाळ वृत्तसेवा
नागाव, ता. २७ : शिये (ता. करवीर ) येथील परप्रांतीय चिमुकलीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला अटक केलेला संशयित आरोपी आणि नंतर अटक केलेला आरोपी दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यामुळे मूळ आरोपी कोण, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिवाय पीडित मुलीवर अत्याचार करण्यापूर्वी तिचा गळा दाबून एक डोळाही बाहेर काढल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे डोळा काढण्यासाठी कोणते हत्यार वापरले याचाही शोध आता तपास पथकाला घ्यावा लागणार आहे. पीडितेला इतक्या क्रुरतेने मारण्याचे कारण अद्याप गुलदस्त्यातच आहे.
पोलिसांनी अटक केलेला दुसरा संशयित आरोपी हा १९ वर्षीय बिहारी मजूरच आहे. तो त्याच्या आई, वडील आणि भावासोबत श्रीरामनगर, शिये येथेच दोन वर्षांपासून राहात असून, तो दिव्यांग आहे, शिवाय त्याच्यावर वैद्यकीय उपचारही सुरू आहेत. त्याच्या उपचारासाठी हे कुटुंबीय काही दिवसांपूर्वी बिहारला गेले होते. पीडित मुलगी गुरुवारी (ता.२२) दुपारी बेपत्ता झाली. त्याचवेळी दुसरा संशयित आरोपी त्याच्या कुटुंबीयांसमवेत बिहारहून शियेत आला होता. घरात येताच त्याने आईला दोन दिवस रेल्वेत व्यवस्थित जेवता आले नाही. आता जेवण तयार कर तोपर्यंत मी फिरून येतो, असे सांगून घरातून बाहेर पडला. थोड्या वेळाने तो घरातही आला. याच दरम्यान त्याने पीडितेवर अमानुष अत्याचार करत तिचा निर्घृण खून केला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पीडितेला घेऊन जाणारी व्यक्ती पायाने लंगडत चालताना दिसते. त्यामुळे पोलिसांनी दुसऱ्या संशयित आरोपीलाही घटनास्थळी फिरवले आहे. महत्त्वाचे जबाब नोंदवले आहेत. सीसीटीव्ही फुटेजसाठी परिसरातील काही डीव्हीआरही तपास पथकाने जप्त केले आहेत. पहिल्या संशयित आरोपीची पोलिस कोठडीची मुदत उद्या (बुधवार) संपत आहे, तर दुसऱ्या आरोपीला ३० आगस्टपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.
चौकट
मी माझ्या मुलीला कशी भेटू?
दोन्ही संशयित आरोपींचे नातेवाईक आरोपींना भेटण्यासाठी आज बराच वेळ शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात बसून होते. पण, पीडितेच्या आईने मी माझ्या मुलीला कशी भेटू हा प्रश्न उपस्थित करत संशयितांच्या नातेवाइकांना स्तब्ध केले.
कोट
दोन संशयित आरोपी पोलिस कोठडीत आहेत. दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यामुळे अपराधी नसताना एखाद्याला शिक्षा होऊ नये आणि मुख्य आरोपीला भक्कम पुराव्यानिशी न्यायालयात हजर करण्यासाठी विशेष तपास पथक काम करत आहे.
- सुजितकुमार क्षीरसागर, उपविभागीय पोलिस अधिकारी व तपास पथकाचे प्रमुख
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

