रेंगाळलेल्या सहा पदरीकरणामुळे अपघाताचे प्रमाण वाढले ; छोटे मोठे अपघात रोजच, अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी

रेंगाळलेल्या सहा पदरीकरणामुळे अपघाताचे प्रमाण वाढले ; छोटे मोठे अपघात रोजच, अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी
Published on

03826

सहापदरीकरण अन्‌ अपघाताला आमंत्रण
महामार्गावर काम रेंगाळतच; सहा महिन्यांत सतरा अपघात, २० मिनिटांसाठी तासभर प्रवास

अभिजीत कुलकर्णी : सकाळ वृत्तसेवा

नागाव, ता. २२ : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या रेंगाळलेल्या सहापदरीकरणामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. सहा महिन्यांत सतरा अपघात झाले. यामध्ये पाच जणांचा मृत्यू तर अकराजण गंभीर जखमी झाले आहेत. मालवाहतूक अवजड वाहने महामार्गावरून सेवा मार्गावर उलटण्याच्या घटनाही पाच घडल्या आहेत. शिवाय जिल्ह्यांतर्गत औद्योगिक वसाहतींमध्ये पोहोचण्यासाठी वीस मिनिटांच्या अंतरासाठी तास लागत आहे. यामुळे वाहतूकदार, प्रवासी त्रस्त झाले आहेत.
टोपपासून कागलपर्यंतचा महामार्ग जिल्ह्याचा औद्योगिक पट्टा म्हणून ओळखला जातो. पंचवीस किलोमीटरच्या अंतरात शिरोली, गोकुळ शिरगाव व कागल पंचतारांकित अशा तीन औद्योगिक वसाहती आहेत. त्यामुळे या अंतरावरील वाहतूक गजबजलेली असते. मात्र सहापदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीने एकाच वेळी सर्व पुलांचे काम सुरू केले आहे. वास्तविक पुलाचे काम सुरू करण्यापूर्वी बाजूच्या सेवा मार्गाचे रुंदीकरण अपेक्षित होते. पण हे सेवामार्ग एकपदरी ठेवून पुलाचे काम सुरू झाले. यामुळे वाहनधारकांना २५ किलोमीटरच्या अंतरात २५ ठिकाणी वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. शिवाय भरावाचे काम सुरू असल्यामुळे उंच रस्त्याच्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजनाही नाहीत. काही ठिकाणी महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम झाले आहे. परिणामी, वाहनधारकांना रस्त्याचा अंदाज येत नसल्याने वाहने उलटण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. प्रत्येक पाचशे मीटर अंतरावर वाहतुकीची कोंडी होत आहे.
ठेकेदार कंपनीने सांगली फाटा ते तावडे हॉटेलदरम्यानचे काम पूर्णतः थांबविले आहे. तरीही उर्वरित काम त्यांना वेळेत पूर्ण करता आलेले नाही.
टोप, शिरोली औद्योगिक वसाहतीमधील एचएमटी फाटा, नागाव फाटा, सांगली फाटा, केआयटी इंजिनिअरिंग कॉलेज, कणेरी फाटा येथील उड्डाणपूलांची कामे दोन वर्षांपासून सुरू आहेत. या प्रत्येक ठिकाणी चौपदरी महामार्गावरील वाहतूक केवळ एकपदरी सेवा मार्गावर वळविली आहे. याव्यतिरिक्त महामार्गाच्या खालून गावांना जोडले जाणारे अंडरपास टोपजवळ पेठवडगावला जाण्यासाठी, शिये फाटा, शिरोली औद्योगिक वसाहतीमध्ये मयूर व पहिला फाटा, पुलाची शिरोली, तावडे हॉटेल, उचगाव, सरनोबतवाडी, उजळाईवाडी ही सर्व ठिकाणे वाहतुकीच्या कोंडीची केंद्रे बनली आहेत. वेगाने येणारी वाहने अचानक नियंत्रणात आणताना छोटे-मोठे अपघात नित्याचेच आहेत.
संबंधित ठेकेदार कंपनीने परिसरात वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी वाहनधारकांना योग्य पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. पण भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला याचे काहीच देणे-घेणे नाही.

...... ठळक मुद्दे .......

सहा महिन्यांतील चित्र
अपघात १७ मृत्यू ५ गंभीर ११
२ वर्षांपासून ६ ठिकाणी काम सुरू
२५ किमी अंतरात २५ ठिकाणी कोंडी

कोट
कागल पंचतारांकित व गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधून शिरोली औद्योगिक वसाहतीमध्ये पार्ट लोड घेऊन येताना वाहनधारकांना वाहनाचे इंजिन एक - एक तास सुरू ठेवावे लागते. यामध्ये इंधन वेळ आणि पैसा तिन्हीही खर्च होत आहे. असे असताना टोलही भरावा लागतो. जोपर्यंत सहापदरीकरणाचे काम पूर्ण होणार नाही, तोपर्यंत टोल बंद ठेवावा.
- अनिल तराळ, ट्रान्सपोर्ट व्यावसायिक

चौकट
किणी टोल नाका बंद करा
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने संबंधित ठेकेदार कंपनीला मार्च २०२५ पर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत दिली होती. मुदत तर संपलीच आहे. अशा परिस्थितीत वाहनधारकांना आणखी किती महिने वेळ आणि पैसा वाया घालवावा लागणार आहे. याची जबाबदारी स्वीकारून महामार्ग प्राधिकरणाने किणी टोल नाका बंद करावा, अशी मागणी ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com