‘सर्जा-राजा’ची जोडी ठरतेय कालबाह्य

‘सर्जा-राजा’ची जोडी ठरतेय कालबाह्य
Published on

बैलांचा फोटो वापरणे...
......
‘सर्जा-राजा’ची जोडी ठरतेय कालबाह्य

आधुनिक युगात सर्व कामे यंत्राद्वारे ः बैलांसह गाड्यांच्या किमती गगनाला

रमजान कराडे ः सकाळ वृत्तसेवा
नानीबाई चिखली, ता. ११ ः शेतकऱ्याच्या घरासमोरील अंगणाची शोभा वाढविणारी बैलगाडी यांत्रिकीकरणाच्या युगात कालबाह्य होत चालली आहे. शेतीसाठी आधुनिक यंत्रांचा वाढलेला वापर, तरुणांचा बदललेला दृष्टिकोन, वाढत्या महागाईच्या काळात गगनाला भिडणारी बैलांची आणि बैलगाड्यांची किंमत, तसेच त्यांच्या खुराकाचा वाढलेला खर्च यामुळे सर्जा-राजाची जोडी कालबाह्य होत आहे.
ग्रामीण भागात अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून शेतीकडे पाहिले जाते. शेतीसाठी शेतकरी सुरुवातीपासूनच बैलांचा वापर करत आला आहे. जमीन नांगरणी, औत करणे, कुळव मारणे, पेरणी करणे, ऊस भरणी आदी कामे बैलांच्या सहाय्याने केली जातात. तसेच पिकांची मळणी करणे, वाहतूक करणे यासाठी बैलगाडीचा वापर परंपरागत होत असे. खेड्यापाड्यातील प्रत्येक गल्लीतून दोन-चार बैलगाड्या पाहायला मिळत असत.
काळ बदलला, परिस्थिती बदलली तशी शेतीची पद्धतही बदलली. आज यंत्रांच्या सहाय्याने शेती केली जाऊ लागली. शेतीसाठी ट्रॅक्टर, पॉवर ट्रिलर यांचा वापर होऊ लागला. ट्रॅक्‍टरच्याच सहाय्याने नांगरणी, सऱ्या सोडणे, पेरणी करणे तसेच पिकांची मळणी यंत्राच्या सहाय्याने केली जाऊ लागली. या सर्व गोष्टी कमी वेळेत, कमी मनुष्यबळात करतानाच जास्त काम, जास्त दाम मिळवून देऊ लागल्या.
एकीकडे यंत्राचा वापर शेतीसाठी मोठ्या प्रमाणात होत आहे, तर दुसरीकडे बैलजोडीची व गाडीच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. बैलजोडीची किंमत सध्या एक लाख ते दीड लाखाच्या आसपास आहेत. वाढत्या महागाईच्या काळात शेतकऱ्याला बैलगाडी न परवडणारी झाली आहे. याशिवाय शेतीसंबंधित कामे करावयाची म्हटले तरी तसे भाडेही मिळत नाही. त्यामुळे अंगणाची शोभा वाढवणारी बैलगाडी दुर्मीळ होत चालली आहे.
...
चौकट...
शर्यतीसाठी बैलांचा वापर
शेतीसाठी बैलांचा वापर करण्यात आजचा युवक उदासीन दिसत असला तरी शर्यतशौकीन युवकांची संख्या वाढत आहे. शर्यतीचा छंद जोपासण्याबरोबरच व्यवसाय म्हणून त्याकडे पाहणारे युवकही आढळतात. यासाठी लागणाऱ्या बैलांच्या किमती तीन-चार लाखांच्या आसपास असून, छकड्याची किंमत पंचवीस-तीस हजारांपर्यंत आहे. इतक्या किमतीच्या बैलजोडी, छकडा आपणास दारात पाहायला मिळतात, परंतु त्यांचा वापर शेतीसाठी नसून शर्यतीसाठी होत असलेला दिसतो.

कोट...
दहा वर्षांपूर्वी गावात चाळीस-पन्नास बैलजोड्या पाहावयास मिळत होत्या. आता फक्त पंधरा बैलजोड्या आहेत. सध्याच्या महागाईच्या काळात बैलगाडी सांभाळतोय याचे सर्वांना कौतुक आहे. मात्र, बैलं सांभाळणे, त्यांच्याकडून शेतीची कामे करून घेणे परवडत नाही. तरीही घरात पूर्वीपासून असलेली बैलजोडी आजही आवडीने सांभाळतोय.
- सुशांत पोवार, बैलगाडी मालक, चिखली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com