शिक्षक बदलीसाठी खोटी प्रमाणपत्रे दिल्यास कारवाई बदलीचे नवीन वेळापत्रक जाहीर

शिक्षक बदलीसाठी खोटी प्रमाणपत्रे दिल्यास कारवाई बदलीचे नवीन वेळापत्रक जाहीर

जि.प. लोगो
...
खोटी प्रमाणपत्रे दिल्यास कारवाई
प्राथमिक शिक्षक बदली प्रक्रियाः नवीन वेळापत्रक जाहीर
सकाळ वृत्तसेवा
फुलेवाडी, ता. ७ : जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया सुरू आहे. या बदलीसाठी संवर्ग तयार केले आहेत. या संवर्गामधील शिक्षकांनी खोटी प्रमाणपत्रे सादर केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी एक पत्राद्वारे सूचित केले आहे.
शिक्षक बदलीत सवलत मिळावी किंवा प्राधान्य मिळावे यासाठी शासनाने संवर्ग तयार केले आहेत. संवर्ग-१ मध्ये पक्षाघाताने आजारी, दिव्यांग शिक्षक, शस्त्रक्रिया झालेले, एकच किडनी असलेले, कॅन्सरने आजारी शिक्षक, मेंदूचे आजार असलेले, विधवा, कुमारिका, परितक्त्या, घटस्फोटीत, स्वातंत्र्यसैनिकाचा मुलगा-मुलगी, नातू आदींचा समावेश आहे. तर संवर्ग-२ मध्ये ३० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर असणाऱ्या पती-पत्नीचा समावेश आहे. या संवर्ग-१ व २ मधील शिक्षकांनी बदलीसाठी जर खोटी प्रमाणपत्रे दिली असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा परिषद प्रशासनाने दिला आहे.
या शिक्षकांनी सादर केलेल्या प्रमाणपत्रांची तालुकास्तरावर गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी यांची समिती पडताळणी करणार आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेने बदलीचे नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार ११ जून रोजी बदली आक्षेपाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. १२ रोजी मुख्याध्यापकांची बदली प्रक्रिया व मुख्याध्यापक पदोन्नतीही होणार आहे. १३ जूनला जिल्हा अंतर्गत बदली पात्र शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध होतील. १८ जूनला तालुकानिहाय रिक्त पदांची समानीकरण यादी जाहीर केली जाईल. १९ जून पासून शिक्षकांच्या बदली प्रक्रियेस सुरुवात होईल. २५ जूनला आंतरजिल्हा बदलीने अन्य जिल्ह्यांतून हजर झालेल्या शिक्षकांना पदस्थापना दिली जाईल. २६ जूनला पवित्र पोर्टलद्वारे शिफारस करण्यात आलेल्या शिक्षकांना पदस्थापना देण्यात येणार आहे. याबाबत बदलीचे नवीन वेळापत्रक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी जाहीर केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com