

03727
वाशीत बिरदेव जन्मोत्सव उत्साहात
भंडारा, गुलालाची मुक्त उधळण; भाकणूक, महाप्रसादासह विविध कार्यक्रम
सोनाळी, ता. ७ ः वाशी (ता. करवीर) येथील ग्रामदैवत श्रीक्षेत्र बिरदेवाचा जन्मोत्सव उत्साहाने साजरा झाला. ‘बिरदेवाच्या नावानं चांगभलं..’’चा जयघोष भंडारा, गुलाल व फुलांची मुक्त उधळण करत हेडाम, भाकणूक, महाप्रसादासह विविध धार्मिक कार्यक्रम झाले. दरम्यान जन्मोत्सवासाठी ग्रामस्थांसह हजारो भाविकांनी उपस्थिती लावली होती.
सोमवारी रात्री दहाला ढोल-कैताळ, छत्री, निशाण व दिवट्यांचे भार लावून ठिकठिकाणी वालंगाचा गजर करत श्रींचा पाळणा भानुस मंदिरातून मुख्य मंदिरात मंगळवारी सकाळी सहाला गेला. ६ वाजून १० मिनिटांनी श्रींना पाळण्यात घालण्यात आले. यानंतर पाळणा गायन झाले. यावेळी ‘बिरदेवाच्या नावानं चांगभलं..’’ जयघोष भंडारा, गुलाल व फुलांच्या मुक्त उधळणीसह आकर्षक आतषबाजी झाली. यावेळी सुंठवडा वाटपही झाले. जाताना शिवाजी रानगे व येताना गणपती पुजारी यांना पाळणा धरण्याचा मान मिळाला. सरदार पाटील वेशीतले यांच्याकडून गुळाचे रवे देण्यात आले. मेंढी पळवणे स्पर्धा झाली. विजेत्यांना योग्य बक्षीस देण्यात आले. दुपारी ३ वाजता गजनृत्यासह ढोल, कैताळाच्या निनादात सुहासिनी महिला, मुली आंबिलीचे मोगे येऊन मुख्य मंदिरात आल्या. रात्रभर शाहीर म्हाळू अष्टेकर (व्हन्नूर), श्रीपती हजारे, दगडू हजारे (सिद्धनेर्ली), महादेव बुडके, शिवाजी लांडगे, कृष्णात रानगे (वाशी) यांचा धनगरी ओव्यांचा कार्यक्रम झाला.
यावेळी रानगे, पुजारी, काटकर, बनकर, हजारे, लांडगे यांच्यासह धनगर समाजबांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.
चौकट
हेडाम, भाकणूक, धनगरी ओव्या, गजनृत्य
गोरखनाथ बनकर यांनी हेडाम खेळले. भगवान पुजारी यांची भाकणूक झाली. धनगर बांधवांनी गजनृत्याचे सादरीकरण केले. रात्रभर नामवंत शाहिरांचा धनगरी ओव्यांचा कार्यक्रम झाला. सकाळी गोड्या व सायंकाळी खाऱ्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.