सरवडे - राधानगरी बिद्री वार्तापत्र

सरवडे - राधानगरी बिद्री वार्तापत्र
Published on

मेहुण्या-पाहुण्यांत रंगतदार लढत
एस. के. पाटील : सकाळ वृत्तसेवा

सरवडे, ता. २७ : दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या (बिद्री) निवडणुकीत चांगला रंग भरला आहे. ऊस दराच्या माध्यमातून सभासदांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या माजी आमदार के. पी. पाटील यांना विरोधी आघाडीने चांगलेच कोंडीत पकडले आहे. राधानगरी तालुक्यात चांगलीच रंगत आली असून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए . वाय. पाटील यांच्यासह मातब्बर नेत्यांच्या प्रतिष्ठेचा डाव आहे. सरवडे आणि कसबा वाळवे या दोन गटांमध्ये तालुक्यातील राजकीय कुस्ती आखाड्यात भलेभले ताकद आजमावत आहेत . कोण कुणाला टांग मारणार आणि कोण धोबीपछाड होणार, हे यातून सिद्ध होईल.
कारखान्याच्या निवडणुकीत सरवडे गटाची आणि राधानगरी तालुक्याची धुरा ए. वाय. पाटील यांच्या खांद्यावर टाकून के. पी. पाटील निर्धास्त असत. मात्र ही निवडणूक एकमेकांच्या विरोधात पै-पाहुणे , मेहुणे-पाहुणे अशी असल्याने तुल्यबळ लढत आहे. आमदार प्रकाश आबिटकर यांना ए. वाय. पाटील यांनी साथ केल्याने अचानक निवडणुकीचा रंगच बदलला. आमदारांना राधानगरी तालुक्यातील दोन गटांमध्ये वर्चस्व सिद्ध करायचे होते. ते ए. वाय. पाटील यांची साथ मिळाल्याने सोपे झाल्याचे चित्र आहे. सध्या या गटाच्या निवडणुकीत नंदकिशोर सूर्यवंशी आणि जनता दलाचे विठ्ठलराव खोराटे यांच्या विरोधात तीन राजेंद्र म्हणजे राजेंद्र पाटील, राजेंद्र मोरे आणि राजेंद्र भाटळे यांनी थेट आव्हान उभे केले आहे. ए. वाय. यांच्यामुळे अजित पवार राष्ट्रवादी गटात पडलेली फूट आणि विठ्ठलराव खोराटे यांच्याशी फारकत घेत शरद पाडळकर यांच्यामुळे जनता दलात पडलेली फूट कुणाच्या फायद्याची ठरणार हे लवकरच दिसेल. आपली बाजू बळकट करण्यासाठी ए. वाय. यांनी हेळेवाडीत महिला आरक्षणामधून संपदा पाटील यांना उमेदवारी दिल्याने बेरजेचे गणितासाठी प्रयत्न केले आहेत. विजयसिंह मोरे यांच्या निधनानंतर राजेंद्र मोरे यांची जनतेतून होणार पहिलीच निवडणूक आहे.
दुसरा गट कसबा वाळवे येथे माजी आमदार नामदेवराव भोईटे यांचे पुत्र उमेश भोईटे व त्यांच्यासोबत डी. एस. पाटील आणि दीपक किल्लेदार यांना के. पी. पाटील गटाकडून तर आमदार व ए. वाय. गटाकडून अशोकराव फराक्टे , विद्यमान संचालक युवराज वारके आणि एकनाथ पाटील यांनी आव्‍हान दिले आहे. ओबीसीतून फिरोजखान पाटील आणि विजय बलुगडे यांच्यात रंगत आहे. के. पी. पाटील आणि दुसरीकडे ए. वाय. पाटील या मेव्हण्या-पाहुण्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निवडणुकीतून लागला आहे. बिद्रीत के. पी. शेतकऱ्यांची प्रगती घोषणा घेऊन बिद्रीची चिमणी खेचण्यात सत्ताधारी गट ताकद लावेल. विरोधी परिवर्तन आघाडीने बिद्रीत परिवर्तन, शेतकऱ्यांचे नंदनवन अशी अटकळ केल्याने निवडणुकीत रंगत येणार हे निश्चित.
-------------
चौकट
जास्त मतदानाची गावे : कंसात मते
पनोरी (५१३), सोळांकूर (७५३), नरतवडे (८३५), कासारपुतळे (५५८), सरवडे (१४६१), मालवे (४२४), ऐनी (३४७), आकनूर (६४६ ), मांगोली (६८६ ), कपिलेश्वर (८१४), तुरंबे (९०९ ), तिटवे ( ५४९), अर्जुनवाडा (६६१), चंद्रे (५०५), कसबा वाळवे (१५८१), चांदेकरवाडी (३५८ ), मजरे कासारवाडा (४६७).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com