सरुड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरुड
सरुड

सरुड

sakal_logo
By

राजकीय फडात, इच्छुक जोमात
जिल्हा परिषद मोर्चेबांधणी; बिगुल वाजण्याकडे लक्ष
डी. आर. पाटील : सकाळ वृत्तसेवा
सरूड, ता. १ : शाहूवाडी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीपाठोपाठ आता जिल्हा परिषदेच्या चार गटांसह पंचायत समितीच्या आठ गणांच्या निवडणुकीची सर्वांना उत्सुकता आहे. यानिमित्ताने गटातटाच्या राजकीय फडात इच्छुक पैलवान शड्डू ठोकत आहेत. फक्त राजकीय सलामीच झडायची बाकी आहे.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने जोरदार राजकीय रणधुमाळी पाहायला मिळणार, हे निश्चित. पदाधिकाऱ्यांची मुदत संपून जवळपास नऊ महिन्यांचा काळ लोटला असल्याने या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम केव्हाही वाजेल हेही तितकेच खरे. म्हणूनच दुसऱ्या फळीतील इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीबरोबरच आरक्षणाचे वेध लागले आहेत. यानिमित्ताने आत्ताच कोण कोणाविरुद्ध लढणार याचे आडाखे बांधले जात आहेत. संभाव्य लढतींच्या चर्चांमुळे तालुक्याच्या ग्रामीण भागातील हवा राजकीयदृष्ट्या ‘टाईट’ आहे.
सद्यस्थितीत जिल्हा परिषदच्या चारपैकी तीन आणि पंचायत समितीच्या आठपैकी सात जागा शिवसेना आणि राष्ट्रवादी या संयुक्त गटाच्या ताब्यात आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीची एक-एक जागा जनसुराज्य-काँग्रेस युतीकडे आहे. तालुक्यात माजी आमदार सत्यजित पाटील आणि मानसिंगराव गायकवाड व आमदार डॉ. विनय कोरे आणि ‘गोकुळ’संचालक कर्णसिंह गायकवाड यांची युती कार्यरत आहे. कोणत्या गट-गणात कोणते आरक्षण जाहीर होणार? यासाठी आरक्षण प्रक्रियेकडे साऱ्यांच्या नजरा लागून आहेत. आरक्षण जाहीर झाल्यानंतरच संभाव्य इच्छुक नावे समोर येणार असली तरी प्रत्यक्ष खडाखडी पूर्वीच अंगावर माती टाकून मैदानात राजकीय मल्ल तयार आहेत. गरज आहे फक्त बिगुल वाजण्याची !
------------
चौकट
मिनी विधानसभेसाठी मल्ल सज्ज
तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतीपैकी सत्यजित पाटील यांच्या पारड्यात सर्वाधिक ग्रामपंचायती पडल्या. सहाजिकच यामुळे या गटाचा आत्मविश्वास वाढला आहे. याच जोरावर पाटील-गायकवाड युतीने मिनी विधानसभेचे मैदान मारण्यासाठी कंबर कसली आहे. त्याचबरोबर प्रतिस्पर्ध्यांनीही तितक्याच जोमाने तयारी केली आहे.