
दत्त औद्योगिक प्रशिक्षण इमारतीचे उद्घाटन मंत्री गडकरी यांचे हस्ते
78768
....
दत्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या
वास्तूचे गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन
शिरोळ, ता.२८ : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दत्त सहकारी साखर कारखाना आणि दत्त उद्योग समूहाला भेट दिली. मंत्री गडकरी यांच्या हस्ते श्री. दत्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नूतन वास्तूचे उद्घाटन तसेच दत्त भांडार येथे तांदूळ महोत्सव, सियान ॲग्रोच्या उत्पादनांचा विक्री शुभारंभ आणि शेडशाळ येथील महिलांनी सुरू केलेल्या देशी वाण बीज बँकेचे उद्घाटन करण्यात आले.
कारखान्याच्या वतीने चेअरमन गणपतराव पाटील, व्हा. चेअरमन अरुणकुमार देसाई, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, अशोक शिंदे यांनी गडकरी यांचे स्वागत केले.
नागपूर येथील सियान अॅग्रो इंडस्ट्रीज ॲन्ड इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी गेल्या एक दशकापासून साखरेपासूननिर्मित पर्यावरणपूरक अशा शुगर सरफेक्टंटवर संशोधन करीत आहे. आजचा जगाचा पर्यावरणपूरक उत्पादनाकडील कल आणि देशातील साखरेचे वाढते उत्पादन बघता साखरेतील स्वच्छतेसाठी असलेल्या रासायनिक गुणधर्मावर संशोधन करून सियान कंपनीने शुगर सरफेक्टंटची निर्मिती केली आहे. यापासून दैनंदिन जीवनात उपयोगी असलेल्या डिटर्जंट पावडर, डिश वॉश लिक्विड, साबण आणि अन्य स्वच्छतेला पूरक अशी उत्पादने तयार केली आहेत. या उत्पादनांचा विक्री शुभारंभ मंत्री नितीन गडकरी, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक व मान्यवरांच्या उपस्थितीत फीत कापून करण्यात आले.
दत्त उद्योग समूहामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती मंत्री गडकरी यांनी यावेळी घेतली. यावेळी खासदार संजयकाका पाटील, धैर्यशील माने, माजी आमदार सुरेश हाळवणकर, हिंदुराव शेळके, जि. प. सदस्य राजवर्धन नाईक-निंबाळकर, संजय पाटील तसेच कारखाना संचालक अनिलकुमार यादव, शेखर पाटील यांच्यासह सर्व संचालक, खातेप्रमुख उपस्थित होते.
...
राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी राजू शेट्टी यांच्या कुटुंबीयांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी गडकरी व शेट्टी यांच्यादरम्यान शिरोळ तालुक्यांतील महापुरास कारणीभूत असणाऱ्या मांजरी पुलाचा भराव कमी करून बॅाक्स बांधकाम करणे , संकेश्वर ते बांदा या रस्त्याच्या भूसंपादनाबाबत चर्चा झाली. यावेळी शेट्टी यांच्या मातोश्री रत्नाबाई यांचा गडकरी यांनी आशीर्वाद घेतला. यावेळी त्या भावुक झाल्या आणि म्हणाल्या, ‘मैत्री कायम राहू दे, राजूच्या पाठीशी राहा.’