शिरोली : डॉक्टरांनाही वजन काटय़ाची पडताळणी बंधनकारक

शिरोली : डॉक्टरांनाही वजन काटय़ाची पडताळणी बंधनकारक

99478
रुग्णालयातील वजनकाटे प्रमाणित करून घ्या
वैधमापन शास्त्र खात्याचे आदेश; वैद्यकीय क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया

युवराज पाटील : सकाळ वृत्तसेवा

शिरोली पुलाची, ता. २८ : रुग्णालयामध्ये रुग्णाचे वजन करण्यासाठी वापरले जाणारे वजनकाटे डॉक्टरांनी प्रमाणित करून घ्यावेत, असे निर्देश वैधमापन शास्त्र (वजनकाटा) खात्याने दिले आहेत. किरकोळ दुकानदार व व्यापाऱ्यांप्रमाणेच डॉक्टरांनाही वजन काट्याची पडताळणी करण्याच्या अजब सूचनेमुळे वैद्यकीय क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
व्यवसाय, व्यापारी क्षेत्रामध्ये वजनकाटे वैधमापन शास्त्र विभागाकडून प्रमाणित करून घेणे बंधनकारक आहे. आता रुग्णालयात रुग्णाचे वजन करण्यासाठी वापरले जाणारे डॉक्टरांकडील वजनकाटे वैधमापन शास्त्र विभागाकडून प्रमाणित करून घ्यावे, असे निर्देश वैधमापन शास्त्र खात्याने दिले आहेत. वजनकाटे प्रमाणित करून घेतले नाहीत, तर डॉक्टरांना पाच हजार रुपयांचा दंड होऊ शकतो. त्यामुळे भारतीय वैद्यक संघटनेने त्यांच्या संघटनेच्या सदस्यांना वजन काट्यांची पडताळणी करून घेण्याची सूचना करावी, असे निर्देशपत्रात नमूद केले आहे.
त्यामुळे वैद्यकीय संघटनांमधून नाराजी व्यक्त होत आहे. डॉक्टरांकडे केवळ शरीराचे वजन करणारे यंत्र असते. रुग्णाच्या वजनानुसार आजाराचे निदान करण्याचे शास्त्र नाही. बालरोगतज्ज्ञांना काही प्रमाणात वजन काटयाची गरज पडते. परंतु चुकीचे वजन मोजल्याने रुग्णाचा बळी गेला, असे होत नाही. तरीही वैधमापन शास्त्र विभागाकडून वजनकाटे प्रमाणित करण्याचे निर्देश का, असा सवाल डॉक्टरांकडून उपस्थित होत आहे.
किरकोळ दुकानदार व व्यापाऱ्यांप्रमाणेच डॉक्टरांनाही वजनकाटे हातात घेऊन सरकारी कार्यालयात तिष्ठत बसायचे का? ही अजब सूचना देऊन सरकारला नेमके काय साध्य करायचे आहे, असा प्रश्न वैद्यकीय क्षेत्रातून उपस्थित केला जात आहे.
वजनकाटे प्रमाणित करून घेणे हा सरकारचा आदेशच आहे. त्यामुळे डॉक्टरांनी पडताळणी करून घ्यायला काय हरकत आहे, असा प्रतिप्रश्न वैधमापन शास्त्र विभागातील अधिकाऱ्यांनी उपस्थित केला.
---
कोट
वैद्यकीय व्यवसायास केवळ व्यवसाय म्हणून पाहून व्यापारी तरतुदी लागू करणे योग्य नाही. आदेशातील ‘सुरक्षेसाठी’ हा शब्द आमच्या व्यवसायास लागू होऊ शकत नाही. आधीच १६ प्रमाणपत्रे बंधनकारक केली आहेत. त्यात आणखी एकाची भर पडली आहे.
- डॉ. सुभाष पाटील, अध्यक्ष, शिरोली पुलाची डॉक्टर्स असोसिएशन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com