शिरोली : तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी मल्टिपल एंट्री-एक्झिटचा पर्याय लागू

शिरोली : तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी मल्टिपल एंट्री-एक्झिटचा पर्याय लागू

तंत्रशिक्षण पदविकाच्या विद्यार्थ्यांना
मल्टिपल एंट्री-एक्झिटचा पर्याय लागू
सकाळ वृत्तसेवा
शिरोली पुलाची, ता. १४ : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने (एमएसबीटीई) वास्तुशास्त्र आणि अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम राबविणाऱ्या संस्थांमध्ये मल्टिपल एंट्री-एक्झिटचा पर्याय लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रथम वर्ष उत्तीर्ण केलेल्या इच्छुक विद्यार्थ्यांसाठी पदविका अभ्यासक्रम सोडण्याचा पर्याय देण्यात आला असून, त्याबाबतच्या नोंदणीसाठी येत्या २० जूनपर्यंत ऑनलाईन दुवा एमएसबीटीईने उपलब्ध करून दिला आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून च्‍या योजनेअंतर्गत प्रथम वर्षाचा सुधारित केलेला पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रम राबविण्यास सुरुवात करण्यात आली. सद्य:स्थितीत द्वितीय वर्षांचा अभ्यासक्रम तयार करण्यात येत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये मल्टिपल एंट्री-एक्झिटचा पर्याय इच्छुक विद्यार्थ्यांना देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे मंडळाशी संलग्न वास्तुशास्त्र आणि अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम राबवणाऱ्या सर्व पदविका संस्थांतील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना पदविका अभ्यासक्रम सोडण्याचा पर्याय लागू करण्यात आला आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रथम वर्ष उत्तीर्ण करणे आणि चार आठवड्यांचे कार्यप्रशिक्षण (इंटर्नशीप) पूर्ण करणे बंधनकारक आहे. तसेच अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम सोडणाऱ्या विद्यार्थ्यांना एमएसबीटीईकडून व्यावसायिक प्रमाणपत्र (सर्टिफीकेट ऑफ व्होकेशन) देण्यात येणार आहे.
अभ्यासक्रम सोडण्यासाठी विद्यार्थ्यांना नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्यासाठी एमएसबीटीईच्या संकेतस्थळावर ‘लर्निंग असेसमेंट स्किम फॉर वन इयर एक्झिट कोर्स’चा ऑनलाईन दुवा २० जूनपर्यंत उपलब्ध करून देण्यात येईल. याबाबत प्राचार्य, संस्थाप्रमुखांनी सर्व विभागप्रमुख तसेच अधिव्याख्याता यांना माहिती द्यावी, असे निर्देश एमएसबीटीईने दिले आहेत. याचबरोबर विद्यार्थ्यांच्या औद्योगिक प्रशिक्षणाबाबत औद्योगिक क्षेत्र ठरवण्याची जबाबदारी संबंधित प्राचार्यावर निश्चित केल्याचे एमएसबीटीईने स्पष्ट केले आहे.
...
रिक्त जागांचा प्रश्न गंभीर बनू शकतो ...
दरम्यान, तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी मल्टिपल एंट्री-एक्झिटचा पर्याय लागू करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्यासाठी फायदेशीर तर संस्थाचालकांना अडचणीत आणणारा आहे, अशा प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहेत. या पर्यायामुळे पदविका महाविद्यालयातील रिक्त जागांचा प्रश्न गंभीर बनू शकतो, अशा प्रतिक्रिया संस्थाचालकांतून व्यक्त होत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com