शिरोली : सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची आवश्यकता

शिरोली : सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची आवश्यकता

85521
मंजूर निधी परत, सांडपाणी नदीपात्रात
शिरोलीतील स्थिती; दिरंगाई, श्रेयवाद नडला, प्रकल्पासाठी नव्याने पाठपुरावा आवश्‍यक

युवराज पाटील : सकाळ वृत्तसेवा

शिरोली पुलाची, ता. २३ : प्रशासकीय दिरंगाई व राजकीय श्रेयवादात येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पास मंजूर झालेला ५.५० कोटी रुपयांचा निधी परत गेला आहे. परिणामी सांडपाणी थेट नदीत मिसळत असून, जलप्रदूषण रोखण्यासाठी शिरोलीत प्रकल्प उभारण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून योग्यरीत्या सांडपाण्याचे नियोजन करणे शक्य होणार आहे.
ग्रामीण पायाभूत विकास निधी अंतर्गत ग्रामीण सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पासाठी नाबार्डकडून ५.५० कोटी रुपयांचा निधी तत्कालीन कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांनी मंजूर करून आणला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची तांत्रिक सल्लागार म्हणून नेमणूक केली. १ फेब्रवारी २०१४ ला योजनेच्या तांत्रिक मंजुरीचा आदेश ग्रामपंचायतीस मिळाला; मात्र गायरानातील जागा उंचावर असल्यामुळे तांत्रिकदृष्ट्या ती योजनेसाठी वापरता येत नव्हती. त्यामुळे सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग व जीवन प्राधिकरणच्या परवानगीने ग्रामपंचायतीने गटक्रमांक ४८४/२ मधील जागा खरेदी केली. हा व्यवहार ग्रामपंचायतीने जून २०१७ मध्ये जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून तीस लाख रुपयांचे कर्ज घेऊन पूर्ण केला. यादववाडी भागातील प्रकल्पासाठी ताराराणी आघाडीचे स्वरूप महाडिक यांनी स्वमालकीची जागा देण्याचे जाहीर केले होते. जागेचा प्रश्न सुटल्याने प्रकल्पाचे काम सुरू होणे अपेक्षित होते; परंतु खरेदी केल्या जागेबाबत न्यायालयीन वाद सुरू झाला. त्यामुळे प्रकल्पाचे काम सुरू झाले नाही.
दरम्यान ऑक्टोबर २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत महाडिक गटाचा पराभव करत शाहू आघाडीने ग्रामपंचायतीची सत्ता मिळवली आणि विकासकामांमध्ये श्रेयवाद सुरू झाला. त्यामुळे पुन्हा प्रकल्पाचे काम रेंगाळले. परिणामी प्रशासकीय दिरंगाई व राजकीय श्रेयवादात मंजूर झालेला निधी परत जाण्याची नामुष्की शिरोली ग्रामपंचायतीवर आली.
डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या निवडणुकीत शाहू आघाडीचा पराभव करीत महाडिक आघाडीने एकहाती सत्ता मिळवली आहे. या निवडणुकीत महाडिक आघाडीच्या शिरोलीच्या सर्वांगीण विकासाच्या आश्वासनाच्या बाजूने कौल दिला आहे. त्यामुळे श्रेयवादातून परत गेलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी नव्याने निधी मंजूर करून आणावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
---
चौकट
प्रकल्पाचे फायदे

जलप्रदूषण रोखण्यास मदत
पर्यावरणास फायदेशीर
प्रक्रिया केलेले पाणी शेतीस उपयुक्त
पाण्याची बचत
---
कोट
शिरोलीच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक प्रस्ताव शासनाकडे सादर केले आहेत. यामध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचाही प्रस्ताव आहे. त्याच्या मंजुरीसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.
- पद्मजा करपे, सरपंच.

केंद्रात, राज्यात व ग्रामपंचायतीमध्ये भाजपची सत्ता आहे. यामुळे भाजप नेतृत्वाने सांडपाणी प्रकल्पाच्या निधीसाठी पाठपुरावा करावा.
- शशिकांत खवरे, माजी सरपंच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com