टोप : कायमस्वरूपी परीरक्षण भूमापकाची नेमणूक करावी
कायमस्वरूपी परीरक्षण भूमापक द्या
टोपला मागणी; अकरा गावांतील कामांचा खोळंबा
सकाळ वृत्तसेवा
टोप, ता. ४ : येथील नगरभूमापन कार्यालयाचा अतिरिक्त कार्यभार हातकणंगले येथील अधिकारी यांच्याकडे आहे. प्रभारी अधिकारी आठवड्यातून एकच दिवस येत असल्याने, नागरिकांची अनेक कामे खोळंबली असून, नागरिकांना कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत असल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. त्यामुळे कायमस्वरूपी परीरक्षण भूमापकाची नेमणूक करावी, अशी मागणी होत आहे.
टोपच्या भूमापन कार्यालयातील अधिकारी तुषार सोनवणे भेटत नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत होती. त्याचवेळी ऑगस्ट २०२४ मध्ये सोनवणे व त्याचा साथीदार यांच्यावर लाचलुचपत विभागाने कारवाई केली होती. त्यामुळे हे कार्यालय चर्चेत आले. या कारवाईनंतर हे कार्यालय पंधरा दिवस बंद होते. त्यानंतर हातकणंगले उपाधीक्षक कार्यालयाकडून अजय सावंत यांची प्रभारी म्हणून टोपमध्ये नियुक्ती केली आहे. सावंत यांच्याकडे टोपचा अतिरिक्त कार्यभार असून ते आठवड्यातून एकच दिवस कार्यालयात येतात.
पूर्वीचे अधिकारी सोनवणे भेटत नसल्यामुळे तर सावंत यांच्याकडे प्रभारी कारभार असल्यामुळे कार्यालयातील मोठ्या प्रमाणात कामे रखडली आहेत. कार्यालयात अंतर्गत येणाऱ्या ११ गावांतील लोकसंख्येचा विचार करता आणि नागरिकांची प्रलंबित कामे पाहता तत्काळ कायमस्वरूपी नगरभूमापन अधिकारी यांची नियुक्ती करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
---
चौकट
कागदपत्रांचा ढिगारा
प्रभारी अधिकारी असल्याने नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी त्रास होत आहे. बँका, बांधकामे, न्यायालयाशी संबंधित कामांसाठी वारंवार प्रॉपर्टी कार्डची आवश्यकता असते. मात्र प्रॉपर्टी कार्डच वेळेत मिळत नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कार्यालयात प्रलंबित कागदपत्रांचा ढीग साठला आहे. या ढिगातून नागरिकांना कागदपत्रे शोधून काढावी लागत आहेत. शोधूनही कागदपत्रे मिळत नसल्याने नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
अकरा गावांचा कारभार
टोप भूमापन कार्यालयाच्या अंतर्गत टोप, संभापूर, शिरोली पुलाची, कासारवाडी, नागांव, तासगाव, अंबप, अंबपवाडी, मनपाडळे, पाडळी, हालोंडी अशी गावे आहेत. या कार्यालयाकडून नोंदणीकृत खरेदीपत्र, वाटणी पत्र, बँक बोजा नोंद, तसेच वारस नोंदीची व नकलेची कामे केली जातात. यामुळे कार्यालयात नेहमीच वर्दळ असते.
---
कोट
टोप नगरभूमापन कार्यालयाकडे अकरा गावांचा कारभार आहे. अधिकारी नसल्याने नागरिकांची अनेक कामे प्रलंबित आहेत. यामुळे कार्यालयात त्वरित कायमस्वरूपी नगरभूमापन अधिकारी यांची नियुक्ती करावी, यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
-तानाजी पाटील, सरपंच, टोप.
टोप नगरभूमापन कार्यालयात अधिकारी आठवड्यातून एकच दिवस भेटत असल्याने मोठ्या प्रमाणात कामे रखडली आहेत. यामुळे नागरिकांना वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत. परिणामी नागरिकांचा वेळ आणि पैसा खर्च होत आहे.
- नितीन चव्हाण, संचालक, शाहू दूध संस्था, शिरोली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

