वारणा मैदान

वारणा मैदान

Published on

05134, 05135
वारणानगर : येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानात कुस्ती शौकिनांची झालेली गर्दी. या वेळी लेसर शोने डोळ्यांचे पारणे फेडले.

फोटो
जनसुराज्य शक्ती किताब विजेता सिकंदर शेख याला सन्मानित करताना आमदार डॉ. विनय कोरे, आमदार डॉ. अशोकराव माने, विश्वेश कोरे व समित कदम आदी. (सर्व छायाचित्रे ः मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)
--

वारणेचे मैदान कोल्हापूरने जिंकले

सिकंदर शेख, पृथ्वीराज पाटीलकडून इजिप्तचे दोन्ही मल्ल चितपट; ११ किताबांसह २५० कुस्त्या रंगल्या

वारणानगर, ता. १३ : येथील आंतरराष्ट्रीय मैदानात पहिल्या क्रमांकाच्या ‘जनसुराज्य शक्ती’ किताबासाठी झालेल्या कुस्तीत कोल्हापूरच्या महान भारत केसरी सिकंदर शेखने (गंगावेश) इजिप्तचा जागतिक विजेता अहमद तौफिकचा घिस्सा डावावर चितपट केले. दुसऱ्या क्रमांकाच्या ‘वारणा साखर शक्ती’साठी झालेल्या कुस्तीत कोल्हापूरचा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलने इजिप्तचा जागतिक विजेता सल्लाउद्दीन अब्बासला पाचव्या मिनिटाला बगल डूग काढून नागपट्टी लावून चितपट केले. या दोघांनाही आमदार डॉ. विनय कोरे, विश्वेश कोरे, आमदार डॉ. अशोकराव माने, जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम यांच्याहस्ते किताब व बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.
या दोन्ही कुस्त्यांमध्ये कोल्हापूरच्या मल्लांनी इजिप्तच्या दोन्ही मल्लांना धूळ चारत कुस्ती शौकिनांची वाहवा मिळविली. याशिवाय या मैदानात ११ प्रमुख कुस्त्या अतिशय प्रेक्षणीय झाल्या. दुपारी दोन वाजता युवा नेते विश्वेश कोरे यांच्या हस्ते मैदानाचे पूजन झाले. सिकंदर शेखने सुरुवातीला एकेरी पट काढून घिस्सा मारण्याचा प्रयत्न केला. त्यावर अहमद तौफिकने खालून डंकी मारून फिरण्याचा प्रयत्न केला, पण सिंकदरने त्यावर लगेच ताबा मिळवला. दुसऱ्या मिनिटाला पुन्हा सिंकदरने पुन्हा घिस्सा मारण्याचा प्रयत्न केला. अखेर सहाव्या मिनिटाला सिंकदरने पाय लावून घिस्सा डावावर तौफिकला चितपट करून हजारो कुस्ती शौकिनांची मने जिंकली.
दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटीलने पाचव्या मिनिटाला बगल डूग काढून इजिप्तचा जागतिक विजेता सल्लाउद्दीन अब्बासला खाली घेत पाय लावून घिस्सा मारण्याचा प्रयत्न केला. अखेरीस पृथ्वीराजने नागपट्टी लावून त्याच डावावर त्याला चितपट केले.
उपमहाराष्ट्र केसरी माऊली कोकाटे (पुणे) हा आजारी असल्याने त्याच्या जागी आलेल्या सेनादलाचा शैलेश शेळके व पंजाबच्या मछवाडा आखाड्याचा भारत केसरी भूपेंद्र अजनाळ यांच्यात वारणा दूध शक्तीसाठी कुस्ती झाली. भूपेंद्रने एकेरी पट काढून घिस्‍सावर फिरवण्याचा प्रयत्न केला व मानेवर घुटना ठेवत शेळकेला चितपट केले. वारणा बॅंक शक्तीसाठी उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर (गंगावेश- कोल्हापूर) विरुद्ध सेनादलाचा हिंद केसरी दिनेश गुलिया (दिल्ली) कुस्ती झाली. डाव प्रतिडावाने २० मिनटे दोघेही झुंझले, पण वेळेअभावी ही कुस्ती गुणावर घेण्यात आली. त्यामध्ये गुलियाने बनकरचा एकेरी पट काढत विजय मिळवला.
‘वारणा दूध-साखर वाहतूक शक्ती’साठीच्या कुस्तीत दादा शेळके (पुणे) याने मनजीत खत्री (हरियाना) याचा घिस्सा डावावर पराभव केला. ‘वारणा ऊस उस वाहतूक शक्ती’साठीच्या कुस्तीत रवी चव्हाण (पुणे) याने प्रवीण चहर (दिल्ली) याच्यावर एकेरी पट काढून खाली घेत समोरून झोळी डावावर विजय मिळवला. ‘वारणा बिलट्यूब शक्ती’साठीच्या कुस्तीत जागतिक विजेता जॉन्टी भाटिया (दिल्ली) याने डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे याच्यावर एकेरी पट काढत घिस्सा डावावर विजय मिळवत कार्तिकची विजयाची मालिका खंडित केली.
वारणा शिक्षण शक्ती किताबासाठीच्या कुस्तीत सांगलीचा संदीप मोटे कुस्तीत जखमी झाल्याने पंजाबच्या पवन कुमार याला विजयी घोषित केले. ‘वारणा बझार व वारणा महिला शक्ती’साठीच्या कुस्तीत समीर शेख (पुणे) याने दुहेरी पट काढत ढाक डावावर सेनादलच्या मुन्नाला चितपट केले. ‘ईडी ॲण्ड एफ मान शक्ती’साठीच्या कुस्तीत वारणा तालमीच्या नामदेव केसरेने दुहेरी पट काढत निकाल डावावर उत्तर प्रदेशचा अमितकुमार याचा काही मिनिटांतच पराभव केला. ‘वारणा नवशक्ती’साठीच्या कुस्तीत गंगावेश तालमीचा कालिचरण सोलणकर याने एकेरी पट काढत टेभूर्णीच्या सतपाल सोनटक्केला घिस्सा डावावार अस्मान दाखविले.
या कुस्त्यांसह २५० वर लहान मोठ्या लढती यावेळी झाल्या यावेळी वारणा कुस्ती केंद्राचे वस्ताद संदीप पाटील, दिलीप महापुरे, हिंदकेसरी दीनानाथ सिंह, महाराष्ट्र केसरी रावसाहेब मगरो, बंडा पाटील रेठरेकर यांच्यासह महाराष्ट्र व कर्नाटकातील मल्ल व कुस्ती शौकिनांची उपस्थिती होती. ईश्वरा पाटील यांनी समालोचन केले.
दरम्यान, मैदानाचे पूजन दुपारी दोन वाजता युवा नेते विश्वेश कोरे यांच्या हस्ते झाले. मैदानात सायंकाळी सहा वाजता आमदार विनय कोरे यांच्यासह इजिप्तचे मल्ल मैदानात उपस्थित झाले. मैदानात आलेल्या इजिप्तच्या तौफिकने सुरुवातीला दोन वेळा उलटी उडी मारून कुस्ती शौकिनांची वाहवा मिळविली. यावेळी समीत कदम, वारणा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव, केडीसी बॅंकेचे संचालक विजयसिंह माने, गोकुळचे संचालक कर्णसिंह गायकवाड, प्रातांधिकारी समीर शिंगटे उपस्थित होते. शाहूवाडीचे पोलिस अधीक्षक आप्पासाहेब पोवार, प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक अरविंद रायबोले यांनी चोख बंदोबस्त ठेवला. प्रा. जीवनकुमार शिंदे, प्रा. नामदेव चोपडे, राजेंद्र पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

हरी पाटील यांना कुस्तीभूषण पुरस्कार
शाहूवाडीचे ज्येष्ठ मल्ल हरी पाटील यांना सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे कुस्तीभूषण पुरस्कार आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते देण्यात आला.
-----
क्षणचित्रे
० सकाळपासूनच महाराष्ट्रासह कर्नाटकातील कुस्ती शौकिन वारणेत दाखल
० वारणा कुस्ती प्रदर्शनासह कुस्त्या पाहण्याचा घेतला आस्वाद
० कुस्ती शौकिनांसाठी खास गॅलरीची सोय
० राजू आवळेच्या हालगी वादनाने कुस्ती शौकिन मंत्रमुग्ध
० ‘लेसर शो’ने मैदानाचे सुशोभीकरण
० मैदानाच्या सांगतेनंतर वारणानगरहून जाणारे रस्ते फुल्ल
० वाठार ते बोरपाडळे दरम्यानची हॉटेल फुल्ल
० कोडोली पोलिसांसह वारणा समूहातील संस्थांच्‍या सुरक्षा रक्षकांचा चोख बंदोबस्त
-----
पुरस्कृत कुस्त्या अशा -
कमलजीत (गंगावेश), वि. वि. संग्राम साळुंखे (पुणे)
शुभम कोळेकर (गंगावेश) वि. वि. विरुद्ध उमेश चव्हाण (शाहू आखाडा)
सुदेश ठाकूर (सांगली), वि. वि. सतीश मेढे (आटपाडी)
शिवय्या पुजारी (बेळगाव) वि. वि. सचिन ठोंबरे (सांगली)
सूरज मुंडे (शाहू कुस्ती केंद्र) वि. वि. सतपाल शिंदे (पुणे)
अमर पाटील (बिळाशी) वि. वि. शिवानंद दड्डी ( कर्नाटक)
रोहन रंडे (मुरगूड) वि. वि. प्रदीप ठाकूर (सांगली)
प्रथमेश गुरव (वारणा), वि. वि. अक्षय तांबे (शाहूपुरी)
शशिकांत बोंगार्डे (शाहूपुरी), वि. वि. सुनील नवले (पुणे)
सनी मदने (कुंडल), वि. वि. गणेश मुंडे (शाहू कुस्ती केंद्र)
नाथा पवार (बेनापूर) वि. वि. प्रमोद सूळ (कुर्डुवाडी)
अजित पाटील (सावे), वि. वि. सतीश खरात (शाहू आखाडा)
अजय शेडगे (शेडगेवाडी) वि. वि. तेजस मोरे (शाहू कुस्ती केंद्र)
पांडुरंग शिंदे (सेनादल), वि. वि. गौरव हजारे (पुणे)
अतुल डावरे (मोतीबाग), वि. वि. भारत पवार (कुंडल)
किरण जाधव (शाहू आखाडा) वि. वि. विश्वचरण सोलनकर (गंगावेश)
रामा माने (वारणा) वि. वि. अजय कवडे (गंगावेश)
शंकर माने (वारणा), वि. वि. अशिन नायकवडी (इचलकरंजी)
विनय चन्ने (कुंडल) वि. वि. सोहेल शेख (शाहू आखाडा)
तुषार देशमुख (पुणे), वि. वि. सूरज पाटील (शित्तूर)
बसू जगदाल (बेळगाव) वि. वि. सचिन माने (कुंडल)
ओंकार जाधव (चिंचोळी) वि. वि. रणजित राजमाने (इचलकरंजी)
कर्ताळ कांबळे (पेरीड) वि. वि. धुळदेव पांढरे (नातेपोते)
साईराज पवार (वारणा) वि. वि. कृष्णात लवटे (कोल्हापूर)
भगतसिंग खोत (माळवाडी) वि. वि. सचिन महागावकर (पेरीड)
विग्नेश केसरकर (वारणा), वि. वि. वरद पाटील (न्यू मोतीबाग)
विवेक लाड (येळापूर), वि. वि. राजवर्धन पाटील (देवठाणे)
चपन्ना दावनगिरी (कर्नाटक) वि. वि. विशाल जाधव (रेड)
इर्शाद पठाण (वारणा) वि. वि. प्रशांत पवार (कोल्हापूर)
भारत चव्हाण (शाहू कुस्ती केंद्र कोल्हापूर वि. वि. प्रतीक म्‍हेतर(राशिवडे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com