
संघटनेचा इशारा
वीज दरवाढीस विरोधच
प्रा. जालंदर पाटील; खांब उखडण्याचा इशारा
राशिवडे बुद्रुक, ता. २३ : राज्यातील शेतकऱ्यांसह कृषीवर आधारित उद्योगांना वीज दरवाढ केल्यास वीज वितरण कंपनीचा एकही विद्युतखांब शिवारात शिल्लक ठेवणार नाही. महागाईने कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यावर हा नाहक भुर्दंड ठरणार असून वीज कंपनीला बांधावरही पाय ठेवू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रा. जालंदर पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.
डॉ. पाटील म्हणाले, ‘शेतकऱ्याला रात्री-अपरात्री शिवारात पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. यासाठी दिवसा दहा तास विजेची मागणी आहे. याचा विचार करण्याऐवजी वीज नियामक आयोग व वीज वितरण कंपनीकडून घरगुती वीज ग्राहकासह शेती, औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांना दरवाढीचा शॉक दिला आहे. कंपनी ६७ हजार ६४४ कोटींची तूट भरून काढण्यासाठी दरवाढ ग्राहकांच्या मानगुटीवर ठेवत आहे. स्थिर आकार, वहन आकार, इंधन अधिभार यातून ग्राहकांची लूट होत असतानाच पंधरा टक्के वीज गळती व वीजचोरीचा बोजा ग्राहकांवरच लादला जातो. शेती व उपसा सिंचन योजनेसाठी ३५ ते ४४ टक्के वाढ वीज वितरण कंपनीने सुचवली आहे. ही वाढ कदापिही मान्य करणार नाही.
चार ते पाच वर्षांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून वीज दरवाढीविरोधात आंदोलन करत आहोत. २०१६ पासून २० टक्के वीज दरवाढ झालेली असताना पुन्हा ३७ ते ५९ टक्के दरवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. हा कदापी मान्य करणार नाही.’ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील यांनी शेतीला दहा तास दिवसा वीज मिळावी; अशी मागणी केली. यावेळी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
-----------
चौकट
दिवसा वीज का नाही?
वर्षानुवर्षे गंजलेले खांब, त्याच डीपी, फुटक्या फ्यूज, तीच वितरणप्रणाली आहे. कमकुवत वाहिन्या तुटल्याने शेकडो शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला. तरीही त्यांच्या मागणीप्रमाणे दिवसा वीज देण्याचे धाडस कंपनी करत नाही.