
कृषी महोत्सव
02273
चौथ्या दिवशी कृषी महोत्सवात
विविध परिषदांचा खजिना
राशिवडे बुद्रुक, ता. २९ : जिल्हा कृषी महोत्सवात आज सहकार व पणन परिषद, उद्योग परिषद, ग्राम व वन परिषदेमुळे कृषी सहकार ज्ञान खजिना खुला झाला. जिल्ह्यातील सहकाराच्या प्रगतीच्या उद्देशाने परिषदांचे आयोजन केले होते.
पणनचे उपसंचालक सुभाष घुले यांनी पणनमार्फत असलेल्या योजनांची माहिती दिली. जिल्हा उद्योग केंद्राचे रवी साखरे यांनी शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योगातून रोजगारनिर्मितीची माहिती दिली. सनदी लेखापाल सुनील नागावकर यांनी सहकार कायदे व सेवा संस्थांचा गाव विकासामध्ये सहभागाबाबत मार्गदर्शन केले. कृषी पर्यटन सहाय्यक संचालक सुप्रिया करमकर यांनी कृषी पर्यटन उत्पन्न देणारा कृषीपूरक व्यवसाय असल्याचे सांगितले.
विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार यांनी, कृषी महोत्सवांमधून नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळून उत्पादनात वाढ होते, असे सांगितले. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचाही त्यांनी आवाहन केले.
दिवसभरात विविध शाळांचे सांस्कृतिक कार्यक्रम झाले. सायंकाळी ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ कार्यक्रम झाला. आज कृषी महोत्सवात महिलांची गर्दी होती. महोत्सवातील स्टॉल, पशु-पक्ष्यांचे प्रदर्शन आणि खाऊगल्ली दिवसभर गर्दीने फुलली होती.दिवसभर आमदार प्रकाश आबीटकर व जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर यांनी जातीने लक्ष दिले. जिल्हा कृषी अधीक्षक जालिंदर पांगारे यांनी स्वागत, कृषी उपसंचालक रवींद्र पाठक यांनी प्रास्ताविक, सूत्रसंचालन आनंदराव शिंदे यांनी केले.