
गांजा
03367
...
तीन किलो गांजासह दोघांना अटक
राधानगरी पोलिसांची पंढरपूर येथे कारवाई
राशिवडे बुद्रुक, ता. २९ : राधानगरी तालुक्यात दोन ठिकाणच्या गांजा छापा प्रकरणाची येथील पोलिसांनी सखोल तपास केल्याने हे जाळे कर्नाटकमार्गे पंढरपुरापर्यंत असल्याचे पुढे आले आहे. यातील दोन मुख्य सूत्रधारांना तीन किलो ६८७ ग्रॅम गांजासह राधानगरी पोलिसांनी पंढरपूर येथून अटक केली आहे. वैभव मच्छींद्र चव्हाण व प्रविण नामदेव चव्हाण अशी त्यांची नावे आहेत. त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.
राधानगरीच्या पोलिस पथकाने मालवेजवळ गांजा विक्री करणाऱ्या टोळक्यावर छापा टाकून गांजासह मोबाईल, मोटारसायकली जप्त केल्या होत्या. पाठोपाठ पुंगाव येथून एकाला पकडले होते. यामुळे गांजा प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचा संशय येथील पोलिस निरीक्षक स्वाती गायकवाड यांना आला. त्या दिशेने त्यांनी तपास सुरू केल्यानंतर गांजा विक्रीचे कनेक्शन कर्नाटकांपर्यत पोहोचल्याचे निदर्शनास आले. तिथून ते पंढरपुरापर्यत पोहोचल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणातील प्रमुख वैभव चव्हाण (वय २७, रा.बावडा ता. इंदापूर, सध्या रा.पंढरपूर ) व प्रवीण चव्हाण (वय ३६, रा.सरवडे. सध्या रा. निपाणी) यांना अटक केली आहे. प्रवीण हा वैभवकडून गांजा आणून तालुक्यामध्ये विक्री करत होता. संशयितांना न्यायालयामध्ये हजर केले असता दोन जूनपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली.