राधानगरी आयटीआयच्या नामकरणाचे गूढ

राधानगरी आयटीआयच्या नामकरणाचे गूढ

Published on

राधानगरी आयटीआयच्या नामकरणाचे गूढ

कर्नाटकातील दिवंगत मेजर रामा राघोबा राणे यांचे दिले अचानक नाव

मोहन नेवडे ः सकाळ वृत्तसेवा
राधानगरी, ता. १७ ः येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे (आयटीआय) नामकरण कोड्यात टाकणारे आणि अचंबित करणारे ठरले आहे. राधानगरी तालुकाच नव्हे तर जिल्ह्याला अपरिचित असणारे आणि कर्नाटकातील परमवीर चक्र विजेते मेजर रामा राघोबा राणे यांचे नाव आयटीआयला दिले आहे. राज्याच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाने लागू केलेल्या शासन निर्णयानुसार आता संस्थेची परमवीर चक्र विजेते रामा राघोबा राणे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अशी नवी ओळख निर्माण झाली आहे.
राज्यातील १०८ शासकीय आयटीआयच्या नावात बदल करून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती तसेच समाजसुधारकांची नावे देण्याच्या प्रस्तावाला गेल्या महिन्यातील मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. लष्करी सेवेत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या परमवीर चक्र विजेते मेजर राणे यांचे नाव या आयटीआयला देण्यास दुमत असण्याचे कारण नाही. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यातील महनीय व्यक्तींना डावलण्याचे कारण समोर आलेले नाही. यातून नामकरणाचा निर्णय बुचकळ्यात टाकणारा आणि जनभावनेला ठेच पोहोचविणाराच ठरला आहे.
राधानगरी ही राजर्षी शाहूंची कर्मभूमी, तर महाराणी राधाबाईंच्या नावे राधानगरी गाव संस्थानकाळात राजर्षी शाहूंनी वसवले. त्यामुळे आयटीआयला राजर्षी शाहू किंवा महाराणी राधाबाईंचे नाव देणे उचित ठरले असते. आयटीआयचे नामकरण करण्यापूर्वी तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील लोकांची मते आजमावली गेली नाहीत. मेजर राणेंच्या नावाचा प्रस्ताव कोणी दिला, हे नाव कोणी सूचित केले हे गूढच ठरले आहे. अपरिचित आणि तालुक्याशी संबंधित नसणाऱ्या व्यक्तीचे नाव देण्यामागील कारण स्पष्ट झालेले नाही. इतकेच नव्हे तर आयटीआयच्या प्रशासनालाही मेजर राणेंविषयी अजिबातच माहिती नाही. नामकरणाचे हे प्रकरण धक्कादायकच ठरले आहे. यंत्रणेचा हा निर्णय अजबच ठरला आहे. तो चर्चेचा आणि वादाचा विषय ठरण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घाईगडबडीने हा निर्णय घेतल्याचे लपून राहिले नाही.
....
चौकट..
मेजर रामा राघोबा राणे यांच्याविषयी
मेजर रामा राघोबा राणे (२६ जून १९१८-जुलै १९९४) हे भारतीय लष्करात अधिकारी होते. त्यांना भारतातील सर्वोच्च लष्करी परमवीर चक्र करमसिंग यांच्यासोबत प्रदान करण्यात आले. ते पहिले जिवंत प्राप्तकर्ता होते. कर्नाटकातील चेंदिया (जि. कारवार) येथे १९१८ मध्ये जन्मलेल्या राणेंनी दुसऱ्या महायुद्धात ब्रिटीश भारतीय सैन्यात काम केले होते. युद्धानंतरच्या काळात ते सैन्यात राहिले. १५ डिसेंबर १९४७ रोजी भारतीय लष्कराच्या कॉर्स ऑफ इंजिनियर्सच्या बॉम्बे सेपर्स रेजिमेंटमध्ये त्यांना नियुक्त केले. १९४७-१९४८ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान राणे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अनेक रस्त्यांवरील अडथळे आणि खाणक्षेत्रे साफ करून भारतीय सैन्याने राजौरी सेक्टर ताब्यात घेतले. त्यांच्या या कामगिरीमुळे भारतीय रणगाड्यांचा मार्ग मोकळा झाला. राणे यांच्या या शौर्याबद्दल ८ एप्रिल १९४८ रोजी त्यांना परमवीर चक्राने सन्मानित केले. ते १९६८ मध्ये भारतीय लष्करातून मेजर पदावरून निवृत्त झाले. त्यांच्या २८ वर्षांच्या लष्करी सेवेनंतर वयाच्या ७६ व्या वर्षी १९९४ मध्ये त्यांचे निधन झाले.
.................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com