आश्वासनपूर्तीचे संचालकांसमोर आव्हान
आश्वासनपूर्तीचे संचालकांसमोर आव्हान
भोगावती शिक्षण प्रसारक मंडळ ः अभियांत्रिकीसह वैद्यकीय शिक्षणाची गरज
सकाळ वृत्तसेवा
राशिवडे बुद्रुक, ता. ४ : सर्वाधिक सभासद संख्या असलेल्या भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक नुकतीच झाली. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीही झाल्या. आता संचालक मंडळासमोर शिक्षणाचा दर्जा उंचावण्याबरोबरच दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचे आव्हान आहे. पोटनियम बदलून निवडणूक कायमची रद्द करणे यासह अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.
भोगावती सहकारी साखर कारखान्याचे ३० हजार सभासद या शिक्षण संस्थेचे सभासद आहेत. त्यामुळे राज्यातील सर्वाधिक सभासद संख्या असलेली ही शिक्षण संस्था म्हणावी लागेल. गेल्या वीस वर्षांपासून सातत्याने राजकीय डावपेच आणि सत्तेमुळे संस्थेचे वातावरण बदलत राहिले. संस्थेच्या माध्यमातून भोगावती साखर कारखान्यावर भोगावती हायस्कूल आणि कुरुकली (ता. करवीर) येथील माळावर पन्नास वर्षांपूर्वी भोगावती महाविद्यालय सुरू झाले.
जिल्ह्यातील शैक्षणिकदृष्ट्या विकासाच्या दिशेने त्यावेळी खऱ्या अर्थाने या परिसराचा नावलौकिक झाला. मात्र, कालांतराने राजकीय खेळी आणि डावपेच अशा कचाट्यात संस्था अडकली. विस्तीर्ण जागा, अद्ययावत इमारती असूनही अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणाबाबत कोणतेही ठोस निर्णय घेता आले नाहीत किंवा त्या दृष्टीने कोणाचेही प्रयत्न झाले नाहीत. झाले ते केवळ या संस्थेचे राजकारण. अगदी काल परवापर्यंत या संस्थेवर सत्ता कोणाची, त्यासाठी न्यायालयीन वाद सुरू होते. यामध्ये लाखो रुपये खर्च झाले. मानसिकता इतकीच की, ही संस्था आपल्या ताब्यात राहावी. एकानेही ईर्ष्येपोटी शैक्षणिक विकासासाठी प्रयत्न केल्याचे दिसून आले नाही.
नुकत्याच झालेल्या संस्थेच्या निवडणुकीत ईर्ष्येने आघाड्या झाल्या. नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आणि दोन्हीकडून आम्ही या संस्थेच्या माध्यमातून अभियांत्रिकी, वैद्यकीयसह कृषी व अन्य अभ्यासक्रम सुरू करू, अशा आश्वासनांच्या फैरी झडल्या. संस्थेवर निर्विवाद भोगावती साखर कारखान्याच्या सत्ताधाऱ्यांच्या मित्र पक्षाची सत्ता आली. त्यानंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीही पार पडल्या. आता या संचालकांपुढे खरे आव्हान आहे ते निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची. संस्थेच्या पोटनिमात बदल करून निवडणूक कायम रद्द करणे आणि नवनवीन अभ्यासक्रम सुरू आणण्यासाठी प्रयत्न करावेच लागतील; अन्यथा सभासदांसमोर विश्वासार्हतेचे प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे.
......
चौकट :
जिल्हा परिषद निवडणूक डोळ्यासमोर
संस्थेची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड झाली. आगामी जिल्हा परिषदेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिक्षण संस्थेचे अध्यक्षपद करवीर तालुक्याला दिले. दिगंबर मेडशिंगे (कांडगाव, ता. करवीर) यांना अध्यक्षपद, तर उपाध्यक्षपदी शेकापचे मोहन पाटील (आणाजे, ता. राधानगरी) यांची एकमताने निवड झाली. त्यांना आता दिलेल्या शब्दांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करावे लागतील.
...
चौकट....
आधुनिकीकरणाची गरज
भोगावती महाविद्यालयाच्या विद्यार्थी वसतिगृहाची इमारत, बहुद्देशीय क्रीडा हॉल, परिसर सुशोभीकरण याची पाहणी करून त्याचे आधुनिकीकरण व अद्ययावतीकरण करण्याची गरज आहे. यासह भोगावती हायस्कूलच्या वाताहतीकडेही लक्ष द्यावे लागेल किंवा नवे धोरण, नव्या कल्पना पुढे आणून त्याला ऊर्जितावस्था आणून द्यावी लागेल.
......................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

