esakal | आमचं जगणं जगावेगळं: दागिने विकूनही भागेना घरखर्च, तृतीयपंथीयांची गाथा

बोलून बातमी शोधा

आमचं जगणं जगावेगळं: दागिने विकूनही भागेना घरखर्च, तृतीयपंथीयांची गाथा
आमचं जगणं जगावेगळं: दागिने विकूनही भागेना घरखर्च, तृतीयपंथीयांची गाथा
sakal_logo
By
संदिप खांडेकर

कोल्हापूर : ""आमचं जगणं जगावेगळं. तृतीयपंथीयाचा शिक्का आमच्या माथ्यावर. आमच्यातले शिकले-सवरलेले असले तरी कोण काम देत नाही. खाण्याचे वांदे असतात, शिवाय घरभाड्याचा प्रश्न डोक्‍यात घुमत असतो. संचारबंदीमुळे घरी बसूनच राहावं लागतंय. दागिने विकून घरखर्च भागवण्याची परिस्थिती आमच्यावर आली आहे. शासनाने आम्हाला पंधराशे रुपये देण्याची घोषणा केली आहे. बॅंकेत अकाउंट नसेल तर आम्हाला पैसे मिळणार कोठून?..'' "मैत्री' संघटनेच्या अध्यक्ष मयुरी आळवेकर सांगत होत्या.

शहरात 120 तर जिल्ह्यात चारशे तृतीयपंथी आहेत. यातले काही जण बारावीपर्यंत शिकलेले आहेत. नोकरी मिळत नसल्याने छोटी-मोठी कामे करून त्यांचा उदरनिर्वाह चालतो. गतवर्षीच्या कोरोनाने सगळ्यांचे हाल झाले. नागरिकांच्या सहकार्यामुळे लॉकडाउनची त्यांना फार मोठ्या प्रमाणात झळ बसली नाही. आता संचारबंदीमुळे पुन्हा त्यांच्या आयुष्याचा संघर्ष सुरू झाला असला तरी एकमेकांच्या साह्याने त्याच्यावर मात करण्याची त्यांची तयारी आहे.

तृतीयपंथीयांसमोर अडचणींचा डोंगर उभा आहे. चूल पेटविण्यासाठी लाकूड नाही, गॅस मिळत नाही, अन्नधान्य उपलब्ध होत नाही, ही स्थिती आहे. गतवर्षी लॉकडाउनमुळे काही तृतीयपंथीयांना जरूर पैसे मिळाले. ज्यांची बॅंकेत खाती नव्हती, त्यांना दारोदार भटकण्याशिवाय कोणताच पर्याय राहिला नाही. आजही हीच स्थिती आहे.

सकाळी उठल्यावर पूजाअर्चा करून एकमेकांची चौकशी करण्यात त्यांचा दिवस सरतो. शहरातल्या विविध भागात ते राहतात. ग्रामीण भागातील तृतीयपंथी शेतात भांगलणीचे काम करतात. त्यांना काही ना काही रोजगार मिळत असला तरी शहरातील तृतीयपंथीय शेजारीपाजारी काही मदत करतात का, याच्या प्रतीक्षेत असतात.

तृतीयपंथीयांकडे आधारकार्ड नाही. बॅंकेत खाते उघडायला गेल्यानंतर तृतीयपंथी असल्याच्या सर्टिफिकेटची मागणी होते. या प्रमाणपत्राची त्यांना गरजच काय, हेच आम्हाला कळत नाही. शासनाने केलेल्या घोषणेचा लाभ मिळावा, एवढीच आमची अपेक्षा आहे.

- मयुरी आळवेकर

Edited By- Archana Banage