
राज्यात सरकार आहे तरी कोठे? आघाडीवर आरोग्यमंत्र्यांची टीका
कोल्हापूर : परीक्षांचे पेपर फुटतात, एस. टी.चा संप मिटत नाही, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळत नाही, सरकार कोणत्याच प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नाही, महाविकास आघाडीच्या केवळ घोषणाच आहेत, कृती काहीच नाही, अशी खरमरीत टीका केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Bharti Pawar) यांनी केली. आपल्या खासगी दौऱ्यासाठी डॉ. पवार कोल्हापुरात (Kolhapur) आल्या होत्या. काल(ता.२६) त्यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली.
आरोग्य विभागाच्या प्रश्नपत्रिका फुटल्याच्या प्रकाराबद्दल डॉ. पवार म्हणाल्या, ‘‘आरोग्य विभागाचे पेपर फुटल्यावर मला विद्यार्थ्यांचे फोन आले. पेपरला बसल्यावर पेपर फुटल्याचे त्यांना सांगितले. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. राज्यात आतापर्यंत अशा तीन घटना घडल्या. पण, सरकारने कोणतेच ठोस पाऊस उचललेले नाही. जी कंपनी ब्लॅकलिस्टमध्ये आहे, तिलाच परीक्षेच्या नियोजनाची जबाबदारी दिली जाते. सरकारचे प्रश्नांकडे लक्षच नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे पैसे मिळाले नाहीत. एस. टी. कर्मचाऱ्यांचा संप अजून मिटला नाही. पेपर फुटीच्या घटना घडतात. पण, निर्णय होत नाही. राज्यात सरकार आहे तरी कोठे? या सरकारच्या नुसत्या घोषणाच आहेत. प्रत्यक्ष कृती नाही.’’ या वेळी माजी खासदार धनंजय महाडिक, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, राहुल चिकोडे, विजय जाधव, गायत्री राऊत, विजय अग्रवाल यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा: अटकसत्र थांबवा अन्यथा मोर्चा काढू: नारायण राणेंचा इशारा
तुम्ही सुरक्षित, तर सर्व सुरक्षित
नागरिकांना आवाहन करताना डॉ. पवार म्हणाल्या, ‘‘लसीकरण करून घ्या. मास्क, सॅनिटायझरचा वापर करा. तुम्ही सुरक्षित असाल तर सर्व सुरक्षित असतील. गर्दी टाळा. तुमची आणि इतरांची काळजी घ्या. लहान मुलांसाठीही लवकरच लस उपलब्ध करून दिली जाईल. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुढील लसीकरण होईल.’’
Web Title: Union Minister Of State For Health Bharti Pawar Visit In Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..