कोल्हापूर : विजय जाधवांचा; सतेज यांच्या सूक्ष्म नियोजनाचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jayashree jadhav

कोल्हापूर : विजय जाधवांचा; सतेज यांच्या सूक्ष्म नियोजनाचा

कोल्हापूर - पालकमंत्री सतेज पाटील व भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या उत्तरच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या श्रीमती जयश्री जाधव यांचा विजय झाला. निकालाने भाजपच्या अवाढव्य प्रचारयंत्रणेला तसेच प्रत्युत्तर दिले तर रोखता येते, हे स्पष्ट झाले. भाजपचा पराभव चंद्रकांत पाटील यांना दणका देणारा, तर सतेज पाटील यांचे बळ वाढविणारा असेल. केवळ ‘हिंदुत्त्व’ या एकाच मुद्द्यावर रिंगणात उतरलेल्या भाजपला वाढलेली मते महाविकास आघाडीच्या दृष्टीने विचार करायला लावणारी आहे. ही निवडणूक कोल्हापुरात काँग्रेसचे सामर्थ्य कायम असल्याचे दाखविते, तसेच शहरातील राजकीय अवकाश बदलत आहे आणि भाजपच्या रूपाने नवा दमदार भिडू मैदानात उतरला आहे, याची जाणीवही करून दिली आहे. दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाने रिक्त जागेसाठी निवडणूक झाली. सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी ‘महाविकास’च्या नेत्यांचे प्रयत्न होते; पण त्याला भाजपकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत मारलेली बाजी, अलीकडेच झालेल्या चार राज्यांतील निवडणुकीत मिळालेले यश यामुळे आत्मविश्‍वास वाढलेल्या भाजपला या ठिकाणीही यश मिळेल, अशी आशा होती. त्यामुळेच भाजपकडून विरोध पक्षनेते देवेंद्रे फडणवीस, विधान परिषेदेच विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, आमदार आशिष शेलार, महिला आघाडीच्या चित्रा वाघ, केशव उपाध्ये, सुधीर कुलकर्णी यांच्यासह राज्यभरातील पक्षांचे २० हून अधिक आमदार, राज्यभरातील सुमारे सात हजार कार्यकर्ते, आरएसएसची कोअर टीम अशा दिग्गजांची फौज मैदानात उतरवली; पण त्यांचा फारसा प्रभाव निकालात दिसला नसल्याचे स्पष्ट झाले.

आघाडीत ही जागा काँग्रेसला मिळाली. त्यामुळे रिंगणात उतरण्याची भाषा करणारे शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांना ऐनवेळी केवळ थांबावे लागले नाही तर ‘मातोश्री’च्या आदेशानुसार सक्रिय व्हावे लागले. दुसरीकडे रिंगणात श्रीमती जयश्री जाधव असल्या तरी आपण स्वतःच रिंगणात असल्याचे समजून पालकमंत्री पाटील यांनी पायाला भिंगरी बांधली. श्रीमती जाधव यांच्या प्रचारासाठीही उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह डझनभर मंत्री, त्यापेक्षा जास्त राज्यभरातील आमदार, नेते, निवडणुकीची सगळी सूत्रे त्यांनी आपल्या हातात घेतली. त्यातून त्यांनी केलेले नियोजन, त्यांना मिळालेली काँग्रेस, राष्ट्र्वादीसह शिवसेना नेते व कार्यकर्त्यांची साथ यामुळे महाविकास आघाडीचा हा विजय सुकर झाला. निवडणुकीत प्रचाराची पातळी मात्र घसरली. विकासाच्या मुद्याऐवजी वैयक्तिक टीका टिप्पणीवर प्रचार झाला. त्यातही भाजपने या शहरात फरसा कधी न चाललेला ‘हिंदुत्वा’चा मुद्दा मध्यवर्ती बनला. प्रचाराने कोल्हापुरात हिंदूत्वाच्या मुद्द्यावर जिंकण्याइतकी मजल मारता येते काय, याबद्दल उत्सुकता निर्माण केली होती. यात भाजपला यश मिळाले नसले तरी इथला प्रयोग भाजपसाठी दीर्घकालीन धडे देणारा आहे. तसेच कोल्हपुरात या प्रकारच्या प्रचारव्यूहाला मिळालेली साथ महाविकास आघाडीला विचार करायला लावणारी आहे. या शहरात निव्वळ हिंदुत्त्वाला फार प्रतिसाद कधी मिळत नव्हता तरी हा मुद्दा लोकांपर्यंत पोहोचवून त्याचे मतात परिवर्तन करण्यात भाजप यशस्वी झाला. यापूर्वीच्या निवडणुकीत भाजपला ४० ते ४५ हजारांच्या पुढे मते मिळाली नव्हती, या निवडणुकीत मात्र तब्बल ७७ हजारांहून अधिक मिळालेली मते ही काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेनेच्यादृष्टीने भविष्यात धोक्याची घंटा वाजवणारी आहेत. भाजपचे ‘हिंदुत्त्व’ त्यांना विजयापासून रोखू शकले असले तरी मतांत मात्र ते वाढल्याचे निकालवरून दिसत आहे. कोल्हापुरात शिवसेनेवर अवंलबून असेलला सेनेमागे फरफट सहन करावी लागणारा भाजप शहरात एक लक्षणीय ताकद बनून पुढे आला ही त्या पक्षासाठी जमेची बाजू. भाजपच्या या ‘हिंदुत्वा’ला शह देण्यात दोन्ही काँग्रेसची अडचण होती, पण शिवसेकडून त्याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात ‘तुम्हाला (भाजपला) सोडले, हिंदुत्‍व नाही’ असे सांगत शिवसैनिकांना अखरेची घातलेली सादही महाविकास आघाडीला विजयापर्यंत नेऊ शकली.

काँग्रेसने शर्थीनं ही जागा राखली त्यात पालकमंत्री सतेज पाटील यांचा वाटा लक्षणीय आहे. निवडणुकीची संपूर्ण यंत्रणा त्यांनी हाताळली. अत्यंत सूक्ष्म नियोजनात भाजपच्या तोडीस तोड उत्तर दिलं. अखेरच्या क्षणापर्यंत कुठेही दगाफटका होणार नाही, याची फिल्डिंग लावली. हीच रचना विजयापर्यंत घेऊन जाणारी होती. त्यात शिवसेनेची साथ मिळेल, याची व्यवस्था थेट मातोश्रीवरूनच झाल्याने काँग्रेसचे काम सोपे झाले. हा विजय राज्यासाठीही महाविकास आघाडीला हवाहवासा आनंदक्षण देणारा आहे. व्यक्तीशः सतेज याचं पक्ष आणि जिल्ह्याच्या राजाकरणातील महत्त्व वाढवणारा आहे, तसाच महाडिक गटासाठी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी झटका देणारा आहे. मालोजीराजे यांची सक्रियता लपणारी नव्हती, काँग्रेसच्या विजयासाठी त्यांनी केलेले प्रयत्न पुन्हा एकदा ते शहराच्या राजकारणात सक्रिय होत असल्याचे दाखवणारे होते. याचा परिणाम अर्थात येणाऱ्या काळात दिसू लागेल. या निवडणुकीत वाढलेले पेट्रोल, डिझेलसह गॅसचे दर, केंद्रीय संस्थांकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर होत असलेली कारवाई, मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्याविरोधात ईडीकडे तक्रार करून थेट ‘मातोश्री’ लाच घातलेला हात याचेही पडसाद उमटत होते. त्याला जोड म्हणून प्रचाराला तीन लाख लोक बाहेरचे आणणार, पैसे घेणाऱ्यांची ईडीमार्फत चौकशी करणार, असे भाजपचे चंद्रकांत पाटील यांची वक्तव्येही रान पेटवत होती; मात्र याचा परिणाम उलटाच झाल्याचे निकाल सांगतो.

मुळात श्री. पाटील हे पक्के राजकारणी नाहीत, भावनेच्या भरात केलेली त्यांची विधानं विरोधकांना हत्यार पुरवणारी ठरतात. भाजपच्या अवाढव्य यंत्रणेचा गाजावाजा तितकाच विरोधात यंत्रणा उभी करणारा होता. त्याचबरोबर माजी खासदार धनंजय महाडिक यांनी महिलांविषयी केलेले वक्तव्य, चित्रा वाघ यांच्या सभेत झालेली कथित दगडफेक, रांगोळीवर ओतलेले पाणी, त्यावरून झालेले आरोप-प्रत्यारोपात कोल्हापूरचा स्वाभिमान दुखावल्याचा आरोप झाला. प्रचाराच्या केंद्रस्थानी हेच मुद्दे राहिले. एरवी निवडणुकीत प्रचाराचा बाज ठरवण्यात भाजप आघाडीवर असतो. कोल्हापुरात मात्र काँग्रेस तोडीस तोड होती. समाजमाध्यमी प्रचारात आणि पडद्याआडच्या जोडण्यातही हे चित्र होते. त्यातून श्रीमती जाधव यांचा विजय सुकर झाला. राज्यात २०१४ मध्ये भाजपची सत्ता आली. त्यानंतर जिल्ह्यातही भाजपने जिल्हा परिषदेवर सत्ता मिळवत पाय रोवले. महापालिकेतही प्रभावी विरोधी पक्षनेता म्हणून स्थान मिळवले, पण राज्यात सत्तांतर झाले आणि भाजपची जिल्ह्यातील हवाच निघाली. भविष्यात महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीसह नगरपालिकांच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांच्या तोंडावरच काँग्रेसला मिळालेल्या या विजयाने काँग्रेससह महाविकास आघाडीचाही आत्मविश्‍वास वाढला आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत भाजप म्हणजे महाडिक गट असे समीकरण झाले आहे. विधान परिषद, लोकसभा, विधानसभा, गोकुळ अशा सलग पराभवापाठोपाठच ‘उत्तर’च्या निकालाने महाडिक गटाचीही मोठी पीछेहाट झाली आहे.

भाजपच्या मतांत वाढ

२०१९ मध्ये दोन्ही काँग्रेस व शिवसेना-भाजप युती असा सामना झाला होता. त्यात काँग्रेसच्या जाधव यांना ९१ हजार ५३, तर श्री. क्षीरसागर यांना ७५ हजार ८५४ मते मिळाली होती. त्या वेळी भाजपची मते काँग्रेसला गेल्याचा आरोप झाला होता. या वेळी काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र असून, श्रीमती जाधव यांना ९६ हजार २२६ मते मिळाली, त्याचवेळी एकटा लढत असलेल्या भाजपला ७७ हजार ४२६ मते मिळाली. भाजपची वाढलेली मते कोणाची, तीन पक्ष एकत्र असताना भाजपला या शहरात मिळालेल्या मतांमुळे त्यांचाही आत्मविश्‍वास वाढला आहे.

जाधव यांच्या विजयाची कारणे

  • अण्णांविषयीची सहानुभूती तिन्हीही पक्षांचे प्रामाणिक प्रयत्न

  • पालकमंत्री सतेज पाटील यांची ‘फिल्डिंग’ महिला उमेदवार म्हणून मिळालेली

  • महिलांची साथ राज्यात असलेली महाविकास आघाडीची सत्ता

कदम यांच्या पराभवाची कारणे

  • नेत्यांकडून झालेली वादग्रस्त वक्तव्ये बालेकिल्ल्यातच त्यांचे घटलेले मताधिक्य

  • यंत्रणा प्रभावी असून, ती निष्प्रभ ठरली उपरा म्हणून भाजपमधील अंतर्गत नाराजी

  • केंद्राकडून होणाऱ्या संस्थांच्या गैरवापराचे आरोप, महागाई.

Web Title: Victory Of Jadhav Satej Meticulous Planning

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top