
‘बर्की’च्या विकासासाठी प्रयत्न सुरू
कोल्हापूर : ज्येष्ठ समाजसेवक विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव ग्राममंडळ असलेल्या बर्की (ता. शाहूवाडी) गावच्या विकासासाठी ग्रामविकास विभाग सरसावला आहे. आमदार विनय कोरे यांनी गावाचा अनुशेष भरून काढण्यासाठी विशेष बैठकीची मागणी केली होती. ती मागणी मान्य करत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी १५ तारखेस मंत्रालयात बैठक बोलावली आहे. यामध्ये सर्वांगीण विकास आराखड्यावर चर्चा होणार आहे. तत्पूर्वी जिल्हा परिषदेने बर्कीच्या विकासासाठीचे सर्व अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देत आणखी एक पुढचे पाऊल टाकले आहे. ‘सकाळ’ने बर्की तेथील ग्रामदान मंडळ आणि त्याचे वास्तव मांडले होते. यानंतर विविध पातळींवर बर्कीच्या विकासासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
‘सकाळ’च्या २१ फेब्रुवारीच्या अंकात ‘विनोबांच्या भूदान चळवळीचे वारसदार बेदखल’ या विषयावर रिपोर्ताज प्रसिद्ध झाला. भूदान चळवळीत सहभागी होऊन गावाने ग्रामपंचायतीऐवजी ग्राम मंडळ करण्याचा निर्णय घेतला. आपल्या मालकीची जमीन ग्राम मंडळाला दिली. यातील काही जमीन ही भूमिहीन लोकांना दिली. अशा प्रकारे सामाजिक क्रांतीचा विचार देणारे हे गाव मात्र लालफितीच्या कारभाराने विकासापासून कोसोमैल दूर आहे. ग्रामपंचायत नसल्याने शासकीय अधिकारी, कर्मचारी यांची गावाबाबतची भूमिकाही नकारार्थी बनली. त्यामुळे कोणतेही विकासकाम करायचे झाले तर ते कसे होणार नाही, याचाच पाढा वाचला जात होता. याबाबत ‘सकाळ’मधून सविस्तर लेखन झाल्यानंतर याची दखल जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने घेतली. बर्कीसारख्या ऐतिहासिक गावाला सर्वतोपरी मदत करण्याची घोषणा केली. जिल्हा परिषदेच्या विद्यमान सभागृहाचा कार्यकाल संपत असताना बर्कीची माहिती ‘सकाळ’मुळे समजल्याची अनेक सदस्यांनी कबुली दिली. निधी उपलब्ध होईल, तो देण्याची तयारीही सदस्यांनी दर्शवली. सध्या रोजगार हमी योजनेतून गावात रस्ते करणे, सार्वजनिक व वैयक्तिक शौचालयांची उभारणी, शाळा दुरुस्ती, आरोग्य उपकेंद्र, नवीन वर्ग खोल्यांचे नियोजन केले आहे. मंत्री मुश्रीफ यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत ग्रामपंचायतीचे सर्व अधिकारी ग्राममंडळाला देऊन कार्यवाही करण्याची मागणी मंडळाकडून केली जाणार आहे.
जिल्हा परिषदेपासून ग्रामविकास मंत्रालयापर्यंत सर्वांनीच बर्कीच्या विकासाचा निर्धार केला आहे. शासनाची प्रत्येक योजना या गावाला कशी मिळेल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गावाचे प्राथमिक सर्वेक्षण केले आहे. त्याच्या आधारे विकासकामांचे नियोजन सुरू आहे. अधिकारी काम करताना चालढकल करत असल्याच्या तक्रारी आल्या, तर संबंधितांची गय केली जाणार नाही. सर्वांनी बर्कीच्या विकासासाठी दक्ष राहून काम करावे.
- संजयसिंह चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी
बर्कीच्या इतिहासाला ‘सकाळ’ने उजाळा दिला. सांघिक प्रयत्नातून आमचे ग्राममंडळ इतर ग्रामपंचायतीप्रमाणे विकासकामे करू शकेल. ग्रामविकास विभाग व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. मात्र, अजूनही काही स्तरावर अधिकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळत नाही. याबाबतही संबंधितांना सूचना देणे अपेक्षित आहे.
- आनंदा पाटील,अध्यक्ष, बर्की ग्राम मंडळ
Web Title: Vinoba Bhave Bhoodan Movement Development Of Village Barki
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..