esakal | आरवचा मृतदेह लपवून बापानेच केला अपहरणाचा बनाव | Kolhapur
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur

कोल्हापूर - आरवचा मृतदेह लपवून बापानेच केला अपहरणाचा बनाव

sakal_logo
By
शाम पाटील

शाहूवाडी : वारणा कापशी (ता. शाहूवाडी) येथील आरव राकेश केसरे (वय ६) याच्या खूनप्रकरणी शाहूवाडी पोलिसांनी आज आरवचा वडील राकेश रंगराव केसरे (वय २७) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले, की पत्नीशी झालेल्या भांडणाचा राग डोक्यात धरून राकेश याने मुलगा आरवच्या छातीवर मारून आणि नंतर गळा दाबून खून केला. त्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मृतदेहावर गुलाल आणि कुंकू टाकले. या सर्व प्रकारची कबुली राकेशने दिल्याचेही पोलिसांनी सांगितले.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी - आरव रविवारी (ता. ३) सायंकाळी गल्लीत खेळत असतानाच बेपत्ता झाला होता. त्याचे अज्ञातांनी अपहरण केल्याची तक्रार वडील राकेश केसरे याने पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानुसार पोलिसांसह ग्रामस्थांनी घातपाताचा संशय घेत गावानजीकचा संपूर्ण परिसर पिंजून काढत आरवचा दोन दिवस शोध घेतला. मात्र, त्याचा ठावठिकाणा लागला नाही. काल (ता. ५) पहाटे मात्र आरवचा मृतदेह त्याच्याच घराजवळ टाकला असल्याचे आढळून आले. त्याचा नरबळी गेला असल्याची चर्चा सर्वत्र होती. मात्र, श्‍वानपथकाने आरवचे घर ते त्याचे गावातीलच आजोळ असा माग काढला होता.

त्यामुळे जवळचे नातेवाईकच आरवच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा संशय पोलिसांनाही होता. राकेशने खुनाची कबुली दिल्याने सर्वांचा संशय खरा ठरला. तो सेंट्रिंगचे काम करीत होता. सध्या काम मिळत नसल्याने तो सरूड येथील एका हॉटेलमध्ये वेटर होता. तो कामानिमित्त सतत बाहेर असायचा. त्यातून त्याचे पत्नीशी सतत खटके उडायचे. त्याचा राग धरून त्याने आरवचा गळा दाबून खून केला. मृतदेह जुन्या घरातच लपवून ठेवला आणि आरवचे अपहरण झाल्याचा बनाव केला. या खून प्रकरणातून बचाव व्हावा, यासाठी त्याने गुलाल व कुंकू टाकले असल्याचे सांगितले.

loading image
go to top