कोल्हापूर : जिकडे कोरेंचा पाठिंबा त्यांचाच होणार अध्यक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

KDCC Bank

कोल्हापूर : जिकडे कोरेंचा पाठिंबा त्यांचाच होणार अध्यक्ष

कोल्हापूर : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत(kolhapur district bank election) प्रक्रिया संस्था व पतसंस्था गटातील सत्तारूढ गटाच्या उमेदवारांच्या पराभवामुळे नाराज झालेले आमदार डॉ. विनय कोरे(mla vinay kore) हे कोणाला साथ देणार त्यावर जिल्हा बँकेचा अध्यक्ष ठरणार आहे. सद्यस्थितीत कोरे हे सत्तारूढ गटासोबत असल्याने विद्यमान अध्यक्ष व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (hasan mushrif)हेच अध्यक्षपदाचे प्रमुख दावेदार आहेत. राष्ट्रवादी व काँग्रेसचा समझोता झाल्यास अडीच वर्षांनंतर काँग्रेसलाही अध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे. पहिल्यांदा अध्यक्ष कोण होणार आणि कोरे कोणासोबत राहणार यावर हे राजकारण अवलंबून आहे.

हेही वाचा: अश्लील ॲप्सचा धोकादायक बाजार

नव्या संचालक मंडळात राष्ट्रवादीचे म्हणून मुश्रीफ यांच्यासह आठ संचालक आहेत. शिवसेनेचे असूनही राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर व माजी खासदार श्रीमती निवेदिता माने हे शिवसेनेचे दोन उमेदवार सत्तारूढ गटातून विजयी झाले. या दोघांचा पाठिंबा राष्ट्रवादीला राहिल्यास संख्याबळ १० वर पोहचते. बँकेच्या राजकारणात मंत्री यड्रावकर व माने श्री. मुश्रीफ यांच्यासोबतच राहतील, अशी शक्यता आहे. शिवसेनेकडून दबाव आल्यास या दोघांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. श्री. मुश्रीफ यांना अध्यक्ष व्हायचे झाल्यास त्यांना श्री. कोरे यांच्या पाठिंब्याची गरज आहे.

दुसरीकडे काँग्रेसच पाच, अमल महाडिक यांच्यासह कोरे यांचे तीन, विरोधी पॅनेलमधून शिवसेनेचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. कोरे विरोधात गेल्यास ही संख्याही ११ वर जाते. पण, कोरे हे सद्यस्थितीत कोणासोबत जातील हे निश्‍चित नाही. सत्तारूढ गटाचे पॅनेल ठरवताना कोरे यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. त्यांच्या आग्रहाखातर प्रक्रिया गटातून प्रदीप पाटील-भुयेकर व पतसंस्था गटातून आमदार प्रकाश आवाडे यांना उमेदवारी देण्यात आली. पण, या दोघांचाही पराभव झाला. सत्तारूढ गटाच्या नेत्यांनी विश्‍वासघात करून सुरूंग लावल्याचा आरोप या दोघांच्या पराभावानंतर व्यक्त करून कोरे यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. त्यांची ही नाराजी कायम राहणार की मुश्रीफ-कोरे यांच्यातील मैत्रीचा सिलसिला जिंकणार यावरही अध्यक्ष पदाचे गणित अवलंबून आहे.

हेही वाचा: नागपूर : चार दिवसांत २५ टक्क्यांवर विद्यार्थी झाले लसवंत

राज्यात दोन्ही काँग्रेससह शिवसेना एकत्र आहे. हीच महाविकास आघाडी कायम राहिल्यास काँग्रेसची राष्ट्रवादीला साथ मिळेल. राष्ट्रवादीचे आठ आणि काँग्रेसचे पाच मिळून संचालकांची संख्या १३ वर जाते. यात अडीच वर्षांसाठी अध्यक्षपद वाटून घेतल्यास यावर तोडगा शक्य आहे. गेल्या निवडणुकीनंतरही अध्यक्षपदाचा असाच फार्म्युला ठरला होता. त्यावेळी पहिली अडीच वर्षे मुश्रीफ तर नंतर पी. एन. यांना अध्यक्ष करण्याचे ठरले होते. पण, तसे झाले नाही. आता हाच फॉर्म्युलाचा दबाव टाकून काँग्रेस पहिल्यांदाच अध्यक्ष पदावर दावा करू शकते. तसे झाल्यास पी. एन. पाटील यांनाही अध्यक्ष पदाची संधी आहे.

वाढदिवसानिमित्त दिलेल्या मुलाखतीतही पी. एन. यांनी अध्यक्ष पद मिळाले तर आनंदच होईल, असे सूतोवाच केले होते. कोरे यांची नाराजी, त्यातून विरोधकांची मोर्चेबांधणी यावर तोडगा म्हणून दोन्ही काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता आहे. पण, त्याचवेळी विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यात कोरे यांनी महत्त्वाची भूमिका घेतली होती. त्यातून कोरे हे पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर दबाव आणू शकतात. आगामी ‘राजाराम’ कारखान्याच्या निवडणुकीचा विचार करता पालकमंत्री पाटील यांनाही कोरे यांचा विरोध परवडणारा नसेल. त्यामुळे कोरे यांची अध्यक्ष निवडीतील भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. अध्यक्ष निवडीची तारीख जाहीर झाल्यानंतर या घडामोडींना वेग येणार आहे.

हेही वाचा: आवाडेंच्या पराभवामागे काँग्रेस की राष्ट्रवादी? सोयीच्या राजकारणात कार्यकर्त्यांचा बळी

उपाध्यक्ष पदावर तोडगा काढण्‍याचा प्रयत्‍न

प्रक्रिया गटातील निकालावर असलेले कोरे यांची नाराजी दूर करण्यासाठी ते म्हणतील त्यांना उपाध्यक्ष पद देऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न होऊ शकतो. काँग्रेसने राष्ट्रवादीला म्हणजे मुश्रीफ यांना साथ दिली तर कोरे यांचेही महत्त्व कमी होणार आहे. ‘झाकली मूठ सव्वा लाखाची’ म्हणत कोरे हेही आपण म्हणेल तो उपाध्यक्ष ठरवू शकतात.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top