Women's Day 2022: संघर्षातून समृद्धीकडं; Sub-Inspector अर्चना पाटील यांचा थक्क करणारा प्रवास | Archana Patil Journey | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Archana Patil Journey

संघर्षातून समृद्धीकडं; Sub-Inspector अर्चना पाटील यांचा थक्क करणारा प्रवास

(International Women's Day) : ८ मार्च हा दिवस जगभरात महिला दिन म्हणून साजरा केला जातो. 'भविष्यासाठी स्त्री पुरुष समानता' ही यावर्षीच्या जागतिक महिला दिनाची थीम आहे. लोकसंख्येच्या तुलनेनं कमी संख्या असणा-या महिलांचे आज समाजातील स्थान काय आहे? महिला सुरक्षित आहेत का? त्यांना त्यांचे हक्क मिळतात का? समाजाने सातत्याने महिलांना दुय्यम वागणूक दिली आहे, असे चित्र दिसते. मात्र या सगळ्यावर मात करत महिलेने प्रत्येक क्षेत्रात आज तिच स्वत:च अस्तित्व निर्माण केलं आहे. महिल साक्षर झाल्या, आणि याचं शिक्षणाने त्यांचा जीवनपटलात हळूहळू बदल होत गेला. (Archana Patil Journey)

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा आग्रह धरला. मुलींसाठी शाळा सुरू केल्या. मुलीही आता उच्च शिक्षण घेत पुरूषांच्या बरोबरीने आपलं अस्तित्व सिद्ध करताना दिसत आहेत. अर्चना पाटील या त्यापैकीच एक आहेत. पोलिस उपनिरीक्षक म्हणून त्या सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगाव (ता. हातकणंगले) येथे कार्यरत आहेत. त्यांचे मूळ गाव सांगली जिल्ह्यातील करमाळे (ता. बत्तीस शिराळा) हे आहे. आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जाणून घेऊयात त्यांचा संघर्षातून समृद्ध झालेला जीवन प्रवास.

सांगली जिल्ह्याच्या पश्चिमेकडील दुर्गम डोंगरी तालुक्यातील करमाळे हे त्यांचे जन्मगाव. सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगाव येथे पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. दहा वर्षांच्या संघर्षमय प्रवासानंतर त्यांचा समृद्ध जीवन प्रवास सुरू झाला आहे. २००९ साली महाविद्यालय शिक्षण घेत असतानाच त्यांचा विवाह मुंबई स्थित युवकाशी झाला. पण त्यांना अवघ्या तीन वर्षांचे वैवाहिक जीवन लाभलं. सुरूवातीचे काही दिवस चांगले सुरू असतानाच, कौटुंबिक वाद वाढत गेला आणि पुढे त्याचे रूपांतर विभक्त होण्यात झालं.

पतीचे व्यसन, कौटुंबिक हिंसाचार यामुळे त्या माहेरी निघून आल्या. सोबत चिमुकलीलाही घेऊन आल्या. माहेरी आल्यानंतर त्यांनी शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. ईस्लामपूर येथील कुसुमताई राजारामबापू पाटील या महाविद्यालयातून त्यांनी विज्ञान शाखेतून पदवी घेतली आणि लगेच स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. त्यांचे शिक्षण आणि मागील सर्व परिस्थितीमुळे सुरुवातीला विरोध झाला. मुलीची जबाबदारी एकटीने पेलणं हे वाटतं तितकं सोपं नाही. मात्र याकाळात मुलीला आईजवळ ठेवून सकाळी ७ वाजल्यापासून ते रात्री ७ पर्यंत असे तब्बल १२ तास बाहेर राहून, एसटीचा प्रवास, अभ्यास, घरची जबाबदारी आणि लाडक्या लेकीचा सांभाळ हे त्या खंबीरपणे पेलत होत्या.

जड अंतःकरणाने त्यांनी एक एक पाऊल पुढे टाकत स्वावलंबनाकडे प्रवास सुरू केला. स्पर्धापरीक्षेत सुरूवातीला अपयश आले. पण त्यांनी हार न मानता जिद्दीने संघर्ष सुरू ठेवला आणि अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले. २०१८ मध्ये त्यांची पोलिस उपनिरीक्षक पदासाठी निवड झाली. त्यांचा प्रवास संघर्षातून समृद्ध जीवनाकडे सुरू झाला. १४ महिन्यांचे प्रशिक्षण पुर्ण करुन, २०२० पासून त्या पेठवडगाव येथे कार्यरत आहेत.

आयुष्यात आलेल्या वाईट वेळेवर मात करून त्या आता स्वावलंबी आयुष्य जगत आहेत. पेठवडगाव येथे कार्यरत असताना, त्यांनी आपल्या कार्यातून एक चांगली प्रतिमा तयार केली आहे. मुलीची जबाबदारी आणि काम या दोन्ही जबाबदाऱ्या त्या अत्यंत उत्तम प्रकारे पार पाडत आहेत. महिला दिनाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याला सलाम..

Web Title: Womens Day Archana Patil 10 Years Journey Sub Inspector Of Peth Vadgaon Sangli Karmala

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top