esakal | पाच वेळा आंघोळ मगच घरात प्रवेश; स्मशानभूमीतील कोविड योद्ध्यांची कहाणी
sakal

बोलून बातमी शोधा

पाच वेळा आंघोळ मगच घरात प्रवेश; स्मशानभूमीतील कोविड योद्ध्यांची कहाणी

पाच वेळा आंघोळ मगच घरात प्रवेश; स्मशानभूमीतील कोविड योद्ध्यांची कहाणी

sakal_logo
By
संदीप खांडेकर

कोल्हापूर : 'कोरोना मृतदेहांवर (covid-19) अंत्यसंस्कार करण्याचे काम वडिलांकडे (father) आले. त्या आधी अस्वस्थता वाटत नव्हती. हे जोखमीचे काम असल्याने आम्ही हादरलो. वडील मात्र निश्‍चिंत होते. त्यांनीच आम्हाला धीर दिला. पीपीई (ppe kit) किट घालून अंत्यसंस्कार करावे लागत असल्याने घाबरण्याचे कारण नाही. अन्यथा हे काम करणार कोण, असे ते सांगायचे. स्मशानभूमीतून घरी आल्यावर आंघोळ करूनच ते घरात येतात. दिवसात पाच-सहा वेळा आंघोळ करतात. सॅनिटायझर (sanitizer)लावून घरात वावरतात. त्यांच्या वेगळ्या कामाचा मला अभिमान वाटतो. ते खरोखरच माझ्यासाठी महान आहेत,' बी. ए. ची (B.A graduate) पदवी मिळवून यूपीएससीच्या (UPSC) अभ्यासाची तयारी करणारा प्रज्ज्वल भोसले सांगत होता.'

'आमच्या परिसरातील प्रत्येकाला वडिलांच्या कामाची माहिती आहे. "स्मशानभूमीतले भोसले,' याबद्दल त्यात विशेष काही वाटत नाही. उलट अभिमानच वाटतोय. वडील स्मशानभूमीत कोविड मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे काम करत आहेत. ते कुटुंबाचा आधार आहेत. शांत व प्रेमळ असा त्यांचा स्वभाव आहे. ते आमची काळजी घेतात. धैर्यानं जगण्याचे धडे त्यांनी त्यांच्या कृतीतून दिले आहेत. तेच भविष्याला आकार देतील'. मुलगी प्रेरणा वडिलांविषयी भरभरून बोलू लागली.'

हेही वाचा: कोल्हापुरात सकल मराठा समाजाचा आत्मक्लेश; नव्या लढ्याचा संकल्प

उचगावमधील (kolahpur Uchgaon) बाबासाहेब भोसले हे दोघांचे वडील. 24 वर्षे पंचगंगा स्मशानभूमीत ते काम करतात. भोसले यांची ऑर्डर स्मशानभूमीत निघाल्यानंतर नोकरीचा पहिला दिवस चांगला गेला. त्या दिवशी एकही मृतदेह स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी नव्हता. दुसऱ्या दिवशी मृतदेह आल्यानंतर मात्र त्यांची अस्वस्थता वाढली. ज्येष्ठ कर्मचाऱ्यांनी (corporation emplyees) त्यांना धाडसाने काम करण्यास सांगितले. ते गेले वर्षभर कोविड मृतदेहांवर अंत्यसंस्काराचे काम करतात. तिथला प्रत्येक प्रसंग त्यांच्यासाठी हेलावणारा आहे. थिजलेली माणुसकी ठसठशीत दाखवणारा आहे.

'कोरोनाचा मृतदेह (dead Body) शववाहिकेतून आणला जातो. पावती नसेल तर अंत्यसंस्कार कसे करायचे, असा प्रश्‍न उभा राहतो. शववाहिकेच्या चालकाकडून संबंधित नातेवाईकांचे नंबर चुकीचे असल्याचे प्रकार घडले आहेत. त्या मृतदेहांचे अंत्यसंस्कार आम्हीच केले आहेत. रक्षाविसर्जनाच्या दिवशी काही नातेवाईक फिरकतही नाहीत. त्यावेळी आम्हीच नैवेद्य ठेवून रक्षाविसर्जनाचा विधी आटोपतो. नैवेद्य म्हणून शिरा, उपीट, कांदा पोहे, इडली असे पदार्थ ठेवतो. ज्या नातेवाईकांना रक्षा हवी असते, ती त्यांना देतो,' भोसले भावनिक होऊन सांगत होते.

हेही वाचा: Rashmi Rocket चे एडिटर अजय शर्मांचे कोरोनाने निधन

'कोरोनाचा मृतदेह आल्यावर पीपीई किट घालतो. मृतदेहावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर लगेच आंघोळ करतो. दिवसात पाच ते सहा वेळा आंघोळ करावीच लागते. घरी गेल्यावर अंगणातच आंघोळ करून घरात प्रवेश करतो. स्वतःला सॅनिटाईझ केल्याशिवाय घरात जात नाही. माझ्या आईचं वय 70 आहे. घरात पाऊल ठेवल्यानंतर मात्र स्मशानभूमीतलं सारे विसरून जातो,' असेही त्यांनी स्पष्ट केले. साहजिकच प्रत्येक कर्मचाऱ्याला याच प्रसंगांतून सामोरे जावे लागते, असेही त्यांनी सांगितले.

पंचगंगा स्मशानभूमीतील कोरोना योद्धे...

अरविंद कांबळे (आरोग्य निरीक्षक), बाबासाहेब भोसले, सुनील कांबळे, तुलसीदास कांबळे, प्रदीप बानगे, अनिल चौगले, विलास कांबळे, विल्सन दाभाडे, राजेंद्र कांबळे, करण बानगे, हिंदुराव सातपुते, अशोक गवळी, रवी कांबळे, जयदीप कांबळे, वैभव लिगडे, प्रसाद सरनाईक, अमोल कांबळे, आशिष बानगे, राजू कांबळे.