Sangli News: सांगलीत भर रस्त्यात वार करून तरुणाला संपवल

सांगलीत भर रस्त्यात वार करून तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Pune Crime News
Pune Crime Newssakal

फक्त एकमेकांकडे रागात बघणे अनर्थाकडे नेणारे ठरले. आज शहरात महाविद्यालयीन तरुणावर धारधार शस्त्राने हल्ला चढवत निर्घृण खून करण्यात आला. राजवर्धन रामा पाटील (वय १८, रा. मतकुणकी, ता. तासगाव) असे या तरुणाचे नाव आहे. वसंतदादा साखर कारखाना परिसरात सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, संशयित तीन हल्लेखोरांना पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतल्याचे समजते आहे. उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते..(young man was stabbed to death on the road Sangli )

घटनास्थळ आणि पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की राजवर्धन पाटील हा सांगलीतील आयटीआयमध्ये शिक्षण घेतो. तो मूळचा तासगाव तालुक्यातील मतकुणकी येथील रहिवासी आहे. तो शिक्षणानिमित्त बुधगाव येथील नातेवाईकांकडे राहत होता. महाविद्यालय सुटल्यानंतर तो मित्रांसह कारखाना परिसरातून नित्याने जायचा.

कारखाना एसटी थांब्यावर तो दररोज बसने घरी जात होता. संशयित हल्लेखोर आणि राजवर्धन यांच्यात दोन दिवसांपासून एकमेकांकडे बघण्यावरून राग होता.

दरम्यान, राजवर्धन आज (ता. १३) नेहमीप्रमाणे महाविद्यालयात आला होता. सायंकाळी साडेपाच्या सुमारास औद्योगिक वसाहतीतून कारखान्यात त्याने प्रवेश केला. यावेळी त्याचा मित्रही सोबत होता. संशयित हल्लोखोर आणि राजवर्धन यांच्या पुन्हा एकमेकांकडे बघण्यावरून वाद निर्माण झाला.

राग टोकाला गेल्यानंतर हल्लेखोरांनी राजवर्धन यास कारखाना प्रवेशद्वाराजवळ गाठले. जोरदार वादावादी करत धारधार हत्याराने राजवर्धन याच्या मानेवर आणि छातीवर वर्मी वार केले. राजवर्धन हा रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले.

घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. राजवर्धन यास गंभीर जखमी अवस्थेत तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. संजयनगर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक संजय क्षीरसागर, शहरचे निरीक्षक अभिजित देशमुख, उपनिरीक्षक महेश डोंगरे यांच्यासह फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.

पोलिसांनी पंचनामा करून रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे हलवत रात्री उशिरा तिघा संशयित हल्लेखोरांना ताब्यात घेतल्याचे समजते आहे.

आठवड्यात दुसरा खून

शहरात पाच दिवसांपूर्वी वानलेसवाडी येथे एक गुंठ्यांच्या जागेवरून महिलेचा निर्घृण करण्यात आला. ही घटना ताजी असताना साखर कारखाना परिसरात दिवसाढवळ्या महाविद्यालयीन तरुणाचा खून झाला. आठवड्यात खुनाची दुसरी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

शस्त्रे येतात कोठून?

विशीतील तरुणांच्या हातात चाकू, सुरे, कोयते, तलवारींसह घातक शस्त्रे दिसून येत आहेत. किरकोळ कारणातून शस्त्रे बाहेर काढत हल्ले चढवले जात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. ही शस्त्रे तरुणाईच्या हातात येतात कोठून, त्यांना पुरवणारे कोण आहेत, मिळतात कोठे, याचा शोध घेत त्याबाबातर पोलिसांनी ठोस कारवाई करण्याची गरज आहे.

महाविद्यालयीन तरुणांनो राग आवरा

एकमेकांकडे रागात बघणे, शिवीगाळ करणे अशा शुल्लक कारणातून तरुण एकमेकांचा जीव घेत आहे. ही गोष्ट समाजासाठी नक्कीच चिंताजनक आहे. मुले शिकून आई-वडिलांच्या हाताशी येत असताना अशा शुल्क कारणावरून मृत्युमुखी पडणे याच्याऐवढे मोठे दुःखदायक काही नाही. तरुणाईतील ही हिंसक प्रवृत्ती कमी करण्यासाठी महाविद्यालयीनस्तरावर समुपदेशनाची गरज आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com