जगात भारी, चप्पल "कोल्हापुरी'

लुमाकांत नलवडे
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

'स्लोव्हाकिया'चे निर्माते कोल्हापुरात; जगभरातील "चप्पल' विषयावर बनविणार माहितीपट
कोल्हापूर - जगभरातील चपलांच्या यादीत कोल्हापूरचे स्थान अढळ असल्याचे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले. जगभरातील चपलांच्या वैशिष्ट्यावर आधारित होणाऱ्या माहितीपटात आता कोल्हापूरी चप्पलचा समावेश केला जात आहे. याच्या चित्रीकरणासाठी युरोपातील स्लोव्हाकिया देशातील दोन निर्माते कोल्हापुरात दाखल झाले आहेत. देशात केवळ कोल्हापूर आणि कोलकाता या ठिकाणीच चित्रीकरण होणार आहे.

जगभरात चपलांचे अनेक नमुने आहेत. त्यांची वेगळी वैशिष्ट्ये आहेत. किंबहुना काही गावांची नावे चपलांवरून ओळखली जातात. याचाच अभ्यास आणि संशोधन करण्याचा प्रयत्न स्लोव्हाकिया देशातील पीटर केरेकेश आणि मार्बिल कोलार या निर्मात्यांनी सुरू केला आहे. जगभरातील चपलांची माहिती, त्यांचा इतिहास जाणून ती दोघे माहितीपट तयार करीत आहेत. त्यानंतर तो जगभरात प्रसारित केला जाणार आहे. दोघांनी आज कोल्हापुरी चप्पलचे कारखाने असलेल्या सुभाषनगरातील काही कारखान्यांना भेट दिली. त्याचे चित्रीकरणही ते करणार आहेत. यासाठी फ्रान्सवरून त्यांचे आणखी दोघे सहकारी येणार आहेत.

कोल्हापुरी चप्पल कशी तयार केली जाते. चामडे कमावणे आणि रासायनिक प्रक्रिया काय असते, याची ही माहिती ते घेत आहेत. सुभाषनगरातील अरुण सातपुते यांच्याबरोबरच शिवाजी सातपुते, सचिन गाडेकर, प्रमोद गाडेकर यांच्या कारखान्यात जाऊन चपलांवरील कलाकुसरीचीही माहिती त्यांनी घेतली. चामडे कमाविण्याविषयी माहिती घेण्यासाठी ते कळे (ता. करवीर), उत्तूर (ता. आजरा) येथेही जाणार आहेत. कर्नाटकातील लिंगणूरमध्येही अधिक माहिती घेणार आहेत. यानंतर ते थेट कोलकाता येथे चित्रीकरण करणार आहेत. त्यांना समन्वयक म्हणून पुण्यातील आर्या रोठे आणि कोल्हापुरातील अरुण नाईक हे काम करीत आहेत.

'कोल्हापुरी'साठी 12 टप्पे
एक कोल्हापुरी चप्पल तयार होण्यासाठी साधारण 12 टप्पे असतात. चामडे कमावण्यापासून ते चप्पल तयार होण्यापर्यंत एक चप्पल किमान 12 जणांच्या हातातून जाते. अखेरचा हात फिरविताना त्याला गोंडे आणि इतर कलाकुसर केली जाते. कोल्हापुरी चपलांतील वेगवेगळे प्रकार आणि त्यांची वैशिष्ट्ये याचीही माहिती केरेकेश व कोलार यांनी घेतल्याचे अरुण सातपुते यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.

Web Title: kolhapuri chappal best in global