कोवाडच्या मसुरीला धुक्‍याचा फटका 

अशोक पाटील
गुरुवार, 16 जानेवारी 2020

चंदगड तालुक्‍यात रब्बी हंगामात कडधान्य पीक सर्वाधिक घेतले जाते, पण या पिकाला धुक्‍याचा मोठा फटका बसला आहे. मसूर, वाटाणे, हरभरे आणि मोहरी पिकावर धुक्‍याचा परिणाम झाला आहे. यामुळे या पिकावर मदार असलेला शेतकरी अडचणीत सापडला आहे. ऐन भरणीच्या वेळेलाच धुक्‍याचा मारा होत आहे. यामुळे मर रोगाचा फैलाव होत असून, उत्पादनात घट होणार असल्याचा अंदाज शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. 

कोवाड : चंदगड तालुक्‍यात रब्बी हंगामात कडधान्य पीक सर्वाधिक घेतले जाते, पण या पिकाला धुक्‍याचा मोठा फटका बसला आहे. मसूर, वाटाणे, हरभरे आणि मोहरी पिकावर धुक्‍याचा परिणाम झाला आहे. यामुळे या पिकावर मदार असलेला शेतकरी अडचणीत सापडला आहे. ऐन भरणीच्या वेळेलाच धुक्‍याचा मारा होत आहे. यामुळे मर रोगाचा फैलाव होत असून, उत्पादनात घट होणार असल्याचा अंदाज शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. 

चंदगड तालुक्‍यात पूर्व भागात कडधान्य पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. भाताची कापणी झाल्यानंतर शेतकरी मसूर, वाटाणे, मोहरी व हरभऱ्याची पेरणी करतात. भाताच्या सरीतून नागरीने ही पेरणी केली जाते. कडधान्य पिकांसाठी जमीन पोषक असल्याने बहुतांशी शेतकरी भात कापणीनंतर कडधान्य पिकाचीच पेरणी करतो. कुदनूर, कोवाड, कागणी, निट्टूर, दुंडगे, राजगोळी, किणी, नागरदळे, कडलगे, होसूर, किटवाड या भागांत विशेषत: कडधान्य पीक मोठ्या प्रमाणावर घेतले आहे. देशी मसुरीचे वाण असल्याने मसुरीला बाजारपेठेत मागणी आहे. उसाचे उत्पादन चांगले मिळत असतानाही बहुतांशी शेतकऱ्यांनी कडधान्य पिकांची पेरणी करून कडधान्यांचे बियाणे जतन करून ठेवले आहे.

कोणत्याही रासायनिक खतांची अथवा कीटकनाशकांची मात्रा न वापरता शेतकरी कडधान्यांचे पिके घेतात. मोठ मोठ्या हॉटेलमधील अक्का मसुरीसाठी येथील मसुरीला प्रचंड मागणी असते. तालुक्‍यातील साधारण 135 हेक्‍टरवर कडधान्यांचे पीक घेतले आहे. सध्या मसूर, वाटाणे, मोहरी व हरभरा भरणीच्या अवस्थेत आहे. फुले आली आहेत, पण गेल्या काही दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला आहे. दिवसभर ढगाळ वातावरण व मध्यरात्रीपासून कडाक्‍याची थंडी व धुके येऊ लागले आहे. धुक्‍यामुळे मर रोगाचा फैलाव होत आहे. मसूर व हरभऱ्याचे पीक वाळून जात आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. धुक्‍याचे प्रमाण कमी झाले नाही, तर यावर्षी कडधान्य पिकाचे उत्पादन घटणार असल्याचा अंदाज आहे 
 

कडधान्य पिकाला मार

धुक्‍याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे कडधान्य पिकाला त्याचा मार बसतो. यातूनच मर रोग फैलावत आहे. शेतकऱ्यांनी वेळीच कीटकनाशकांची फवारणी घेतल्यास उत्पादनात वाढ होईल. 
- एस. डी. मुळे, कृषी सहायक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolkapur kowad Lentils farmer Product loss